नांदेड. (विशेष प्रतिनिधी) एका स्कॉर्पिओ कारच्या जबर धडकेने ऑटोरिक्षाचालकासह दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना २७ मार्च रोजी दुपारी एक ते सव्वाएक वाजेदरम्यान, नांदेडच्या हडको परिसरातील नांदेड ते उस्मान नगर रस्त्यावरील 'साई' बारसमोरील मुख्य रस्त्यावर घडली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडच्या हडको भागातील नांदेड ते उस्माननगर महामार्गावरील साई बारच्यासमोरील रस्त्याने २७ मार्च रोजी दुपारी एक ते सव्वाएक वाजेचेदरम्यान (एमएच-२६ टी-७४७१) ऑटोरिक्षा जात होता. दरम्यान, उपरोल्लेखित रस्त्याने जाणाऱ्या एमएच-४३, एएल-१२८२ या स्कॉर्पिओ कारचे चालकाने त्याच्या ताब्यातील कार निष्काळजीपणे चालवून समोरील ऑटोला पाठीमागून जबर धडक दिली.या अपघातात ऑटोरिक्षाचालकासह दोघेजण गंभीर जखमी झाले. प्रत्यक्षदर्शींनी उपरोक्त अपघातातील गंभीर जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असल्याचे समजते. विशेष बाब म्हणजे, उपरोल्लेखित ठिकाणच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांचे नावे अद्यापही समजू शकले नसले तरी या घटनेची माहिती समजताच पोउपनि. महेश कोरे व त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याशिवाय, पोलिसांनी घटनास्थळावरील स्कॉर्पिओ कार व ऑटोरिक्षाही नांदेड 'ग्रामीण' ठाण्यात नेवून लावले असल्याचेही विश्वसनीय वृत्त आहे.
विशेष म्हणजे, अपघात झाल्यानंतर 'स्कॉर्पिओ' कारचा चालक हा त्याच्या ताब्यातील कार उपरोल्लेखित घटनास्थळीच सोडून फरार झाला असल्याचीही माहिती पोउपनि. महेश कोरे व पोलीस नाईक संतोष जाधव यांनी रविवारी सायंकाळी उशिरा प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.

COMMENTS