वसई (ठाणे) येथील लेखिका-कवयित्री संगीता अरबुने यांचे 'प्रतिबिंब' (२००१), 'ओंजळीतलं चांदणं' (२००७), 'स्वतःला आरपार ओवताना...
वसई (ठाणे) येथील लेखिका-कवयित्री संगीता अरबुने यांचे 'प्रतिबिंब' (२००१), 'ओंजळीतलं चांदणं' (२००७), 'स्वतःला आरपार ओवताना' (२०१५) आणि 'बायका झुळझुळत ठेवतात आयुष्याचा पदर' (२०२२) हे चार कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. 'चौकट' (२०१५) हा त्यांचा कथासंग्रह असून 'मनीमानसी' हा त्यांचा ललित लेखसंग्रह २०१८मध्ये प्रकाशित झाला आहे. याशिवाय विविध नियतकालिकांमधून त्यांचे विपुल लेखन प्रकाशित झाले आहे.
'एकसोबीस हरी पत्ती लौंग आणि मी' हा त्यांचा नवीन ललित लेखसंग्रह शब्दालय प्रकाशनाने २०२५मध्ये प्रकाशित केला आहे.
ह्या पुस्तकात एकूण नऊ लेख आहेत. हे सगळे लेख म्हणजे लेखिकेच्या आत्मकथनपर आठवणी आहेत. लेखिकेने आपल्या बालपणीच्या क्लेशदायक आठवणींचे खोदकाम करून ललित लेखांचे सर्जनशील बांधकाम केले आहे. लेखिकेने ह्या लेखांतून स्वतःच स्वतःला रेखाटण्याचा फार छान प्रयत्न केला आहे. हे करताना लेखिकेला मानसिक स्तरावर त्रास झालाच असणार. हे ललितलेखन म्हणजे लेखिकेने आपल्या पोरक्या बालपणावर घातलेली फुंकर आहे. लेखिका केवळ सहा वर्षांची असताना आणि थोरली बहीण आठ वर्षांची असताना त्यांची जन्मदात्री शकूआई वारली. त्यानंतर वडलांनी दुसरी पत्नी केली. तिला तीन लेकरं झाली. आपल्या नातींना सावत्रपणाची आच लागू नये, म्हणून आजीआजोबांनी (आईच्या आईवडलांनी) ह्या दोन बहिणींचा सुरुवातीची दहा वर्षे सांभाळ केला. मरताना आपल्या लेकीला त्यांनी तसे वचनच दिले होते. आपल्या नातींच्या पोरकेपणाबद्दल आजी नेहमी म्हणायची, 'माज्या लेकीच्या पोरी आभाळातून पडल्या नि धरधरीनं वाडवल्या'. इतक्या कमी वयात पोरकेपण आल्यावर जी आबाळ आणि उपेक्षा वाट्याला येते, तिची दाहकता लेखिकेने सर्वार्थाने अनुभवली आहे. परिस्थितीचे चटके सोसले आहेत. त्या सोसण्या-भोगण्याचे विविध काटेरी कंगोरे ह्या लेखांतून अभिव्यक्त झाले आहेत. ह्या लेखनात वस्तुनिष्ठता आहे, तटस्थता आहे, अलिप्तता आहे आणि तर्कसंगताही आहे. आजीआजोबांच्या निधनानंतर लेखिकेला आईवडलांकडे जावे लागले. सावत्र आईच्या सोबत असताना आपली कशी उपासमार झाली, याबद्दल लेखिकेने लिहिले आहे, 'त्या काळात कितीतरी कावळे माझ्या पोटात ओरडून मरून गेले. त्या काळात मी एकच स्वप्न बघायचे, ज्या घरात भरपूर खायला- प्यायला असेल आणि खाताना आपला हात धरणारं कुणी नसेल त्या घरातला मुलगा असावा'.
किती किमान अपेक्षा आहेत, पाहा.
हे लेखन जसे आत्मपर आहे, आत्मनिष्ठ आहे, तसेच अतिशय आत्मीयतेने केलेले हे लेखन आहे. त्यामुळेच हे संपूर्ण लेखन अतिशय उत्कट आणि भावस्पर्शी उतरले आहे. कोवळ्या वयात लेखिकेला, सावत्र आईच्या हाताखाली घरातली सगळी धुणीभांडी करावी लागत. सार्वजनिक नळावरून हजार लिटर पाणी भरावे लागत असे. थोरली बहीण लग्न होऊन सासरी गेल्यावर कामांचा सगळा भार एकट्या लेखिकेवरच पडला.
त्या काळात लेखिकेला वाटायचं, की सणवार तर नकोच यायला. कारण त्या कोवळ्या वयात लेखिकेला एकटीला पुरणाचा स्वयंपाक करावा लागत असे. इतके करूनही पोटाला पोटभर अन्न मिळत नसे. या सगळ्या संदर्भात लेखिकेने फारच सूचक विधान केले आहे, 'सिंड्रेला झाली होती माझी अगदी!' या एकाच वाक्यात सर्व काही दु:खभोग आले. अशा पराधीन आणि पोरक्या वातावरणात पोरवयातील लेखिका आपल्या दिवंगत आईला काळीज कुरतडणारा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत असे, 'आई का गं गेलीस मला सोडून?'
आईविना भिकारीपण काय असतं ते मी अनुभवत होते' ह्या एकाच वाक्यात लेखिकेने आपल्या अंतःकरणात सलणारे दु:ख मांडले आहे. लेखिकेला आईचा सहवास फारसा लाभलाच नाही. स्वतःच्या पहिल्या बाळंतपणात लेखिकेला मातृसुखाचा हा अभाव प्रकर्षाने जाणवला. बाळाच्या जन्मानंतर कडकडीत भूकही लागली होती. पतीने तत्परतेने वरणभात करून दोन घास भरवले. त्या प्रसंगाविषयी लेखिकेने लिहिले आहे, 'त्या वेळी नव-याच्या डोळ्यांत अक्षरशः मला माझी आई दिसली. मला दुधाचा आणि त्याला प्रेमाचा पान्हा फुटला होता. तो आई झाला होता माझीही आणि आमच्या बाळाचीही'.
'आई तू का गं गेलीस?' ह्या लेखाचा समारोप कवितेच्या ओळींनी केला आहे :
'आईला नसते सुरुवात, नसतो अंत
ते असतं अनादी अनंत
आई कधीच निवर्तत नसते
आपल्याच लेकरांच्या पोटी
ती पुन्हा पुन्हा जन्म घेते'.
ह्या कवितेत लेखिकेने एक शाश्वत सत्य सांगितले आहे.
अशा प्रकारे लेखिकेच्या सर्व दु:खांची मुळं थेट आईचा अभाव आणि त्यातून आलेलं पोरकेपण इथपर्यंत जाऊन पोहोचली आहेत, असे ह्या पुस्तकाच्या पानोपानी जाणवते.
लेखिकेच्या आजीआजोबांनी आत्मीयतेने ह्या दोन अनाथ नातींचे संगोपन केले असले, तरी त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. आजोबा पोलीस खात्यात नोकरीला होते. पन्नास वर्षांपूर्वी पोलिसांचा पगार तो किती असणार! लवकरच ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर एका धरणावर वॉचमन म्हणून नोकरी धरली. तुटपुंज्या पेन्शनवर चार माणसांची उपजीविका करणे अवघड जात होते, म्हणून त्यांनी पानटपरी टाकली. त्यांचे खोलीभाडे पस्तीस रुपये होते. घरमालक चाळीस रुपयांसाठी अडून बसला होता. वरच्या पाच रुपयांची जुळवणी करताना त्यांना किती यातायात करावी लागली, याची हकीगत 'गोष्ट पाच रुपयांची' ह्या लेखात सांगितली आहे. त्या प्रसंगाने लेखिकेला आयुष्यभरासाठी प्रामाणिकपणाचा धडा शिकवला. गरीब, पण नीतिमान माणसांच्या ओढाताणीची ही गोष्ट वाचताना संवेदनशील वाचकाच्या काळजाला चरे पडतात.
लेखिकेच्या एका मावशीने पोरपणात पळून जाऊन मुसलमानाशी लग्न केले होते. त्यामुळे ती माहेरपणाला कायमची मुकली होती. तिला त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागली. आई, वडील, भाऊ ह्या सगळ्यांनी तिच्याशी असलेले संबंध संपवून टाकले होते. सगळ्यांनीच तिला आपल्या आयुष्यातून वजा करून टाकले होते. किंबहुना ती त्यांच्यासाठी मेल्यातच जमा होती. तिला 'माहेरजिव्हाळा' किंवा 'माहेरगंध' कधी लाभलाच नाही. लेखिकेने वापरलेले हे दोन्ही शब्द फारच अन्वर्थक आहेत. तिच्या उभ्या आयुष्याची झालेली फरफट आणि ससेहोलपट लेखिकेने 'हिरवं बोडकं गोंदण आणि काळं ठसठशीत मंगळसूत्र' ह्या लेखात फारच तटस्थपणे आणि तितक्याच आत्मीयतेने चितारली आहे. लेखाचे शीर्षक लांबलचक वाटत असले, तरी नायिकेचे हुबेहूब चित्र उभे करण्यासाठी ते अतिशय समर्पक आहे. हा लेख म्हणजे जिवंत व्यक्तिचित्रणाचा एक उत्कृष्ट नमुना आहे! लेखिकेची मूळ प्रकृती कवयित्रीची असल्यामुळे ह्या लेखनात कमालीची काव्यात्मता आहे आणि सखोल चिंतनशीलताही आहे.
लेखिकेला पोरवयात दर गुरुवारी काही वेळ आजोबांच्या पानटपरीवर बसावे लागत असे. ही गोष्ट लेखिकेला अजिबात आवडत नसे. याचे एक कारण, पानटपरी हे मुलींनी चालविण्याचे दुकान नव्हे. तिथे नाना त-हेची माणसे येतात. दुसरी गोष्ट, त्या उमलत्या वयात, रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांच्या विखारी नजरा झेलाव्या लागत. त्या नजरा झेलताना लेखिकेला खूप त्रास होत असे. ती गोष्ट लेखिकेला मुळीच सहन होत नसे. दुकानात बसल्यावर लेखिकेचा त्रागा होत असे. आजीआजोबांचा धाक असल्यामुळे त्यांना ते काम टाळताही येत नसे. उपजीविकेसाठी ते गरजेचेही होते. त्यामुळे लेखिका दुहेरी कातरीत सापडली होती. सांगताही येत नाही आणि सोसवतही नाही, अशी त्यांची मनोवस्था झाली होती. लेखिका एकान्तात, आपले हे दु:ख स्वर्गस्थ आईला कळवळून सांगत असे. एका गुरुवारी हे काम टाळण्यासाठी लेखिकेने बाजारतळावरील शेण गोळा करण्याचे किळसवाणे काम केले. तो सगळा अनुभव आणि मानसिक द्वंद्व लेखिकेने 'एकसोबीस हरी पत्ती लौंग आणि मी' ह्या लेखात तपशीलवार कथन केले आहे.
शौचालयांची गोष्ट ही काही सांगण्यासारखी गोष्ट नव्हे. खरंतर ती 'न सांगण्याची गोष्ट' आहे. ह्याच शीर्षकाच्या एका लेखात त्यांनी ही न सांगण्याची गोष्टसुद्धा अतिशय खुमासदार शैलीत सांगितली आहे. ह्या लेखात ग्रामीण भागातील स्त्रियांच्या शौचविधीची होणारी कुचंबणा अतिशय धीटपणे सांगितली आहे. एखाद्या शहरी वाचकाला ती किळसवाणी वाटू शकते, पण ते एक कटू वास्तव आहे, हे कोणालाही नाकारता येत नाही.
'प्रिय' हा एका हळव्या भावबंधाविषयीचा लेख अतिशय उत्कटतेने उतरला आहे. पौगंडावस्थेत मुलांना मुलींविषयी आणि मुलींना मुलांविषयी आकर्षण असते. मानसशास्त्रानुसार ते स्वाभाविकच आहे. भावविश्वाचा अविभाज्य भाग बनलेल्या, शाळकरी वयातील एका मित्राला पत्ररूपाने हा लेख लिहिला आहे. इतर लेखांपेक्षा ह्या लेखाची धाटणी जरा वेगळी आहे. ह्या लेखात स्मरणरंजनात्मक अभिव्यक्ती आहे. पत्ररूप संवाद साधताना लेखिकेचे शब्द खूपच हळवे झाले आहेत. ह्या लेखात लेखिकेने म्हटले आहे, 'पुरुष मित्र ही स्त्रीची एक आंतरिक गरज होऊन राहिली आहे. ती भागली नाही, तर एक पोकळी निर्माण होते रे तिच्या आयुष्यात'. (पृष्ठ ९५)
ह्या संदर्भात लेखिकेने श्रीकृष्ण आणि द्रौपदीच्या नात्याचा दाखला दिला आहे. पौगंडावस्थेतील लेखिकेचे आणि त्या मित्राचे नाते एखाद्या मुग्ध कळीसारखे राहिले आहे. ते कधी उमललेच नाही. म्हणून काही बिघडले नाही. आपल्या मनाची समजूत घालताना लेखिका लिहिते, 'उमलण्याला कोमेजण्याचा शाप असतोच'.
हे लेखन वाचकालाही विचार करायला भाग पाडते.
लेखिकेचे लग्न होऊन सासरी आल्यानंतरचे भलेबुरे अनुभव 'घर असतंच की सोबत' ह्या लेखात आले आहेत. सासरी सासू-सुनेचे सूर फारसे जुळले नाहीत, हे काही वाक्यांवरून वाचकांच्या लक्षात येते. सासूबाई ऊठसूट जे टोमणे मारायच्या, त्याचे वर्णन लेखिकेने 'ब्ला ब्ला ब्ला' ह्या तीन शब्दांत करून शब्दांचा मितव्यय केला आहे. 'आई नसणाऱ्या आणि आजीकडे लाडाकोडात वाढलेल्या मुलींना वळण नसतं' हे पालूपद त्यांना वारंवार ऐकून घ्यावे लागत असे. सासू-सुनेच्या अशा 'मधुर' नात्याचे वर्णन लेखिकेने एका सूचक वाक्यात केले आहे, 'आम्ही दोघी जातीच्या सासू - सुना होतो'.
'आठ दहा हाताचं किचन वीतभर पोटासाठीच्या खंडीभर सामानानं व्यापलेलं' अशा समर्पक शब्दांत लेखिकेने आपल्या सासरच्या घराचे वर्णन केले आहे.
लेखिका काळजी करू लागल्यावर त्यांचे यजमान नेहमी म्हणत, 'घराला असते घरातल्यांची काळजी'. पतीच्या ह्या वाक्याची लेखिकेला वेळोवेळी प्रचिती आली आहे. म्हणूनच घराविषयीची कृतज्ञता व्यक्त करताना लेखिकेने लिहिले आहे, 'आमच्या आयुष्यात सगळ्यांच्या वाट्याला जे काही यश, कीर्ती, ऐश्वर्य, मान-सन्मान येत गेले, ती या घराचीच देन म्हटली पाहिजे'. (पृष्ठ १३२)
लेखिकेने जपलेले हे कृतज्ञतामूल्यही तितकेच महत्त्वाचे आहे! घर, अंगण, मी आणि ती' ह्या लेखात लेखिकेने घरकाम करणाऱ्या आपल्या बाईची अतिशय सह्रदयतेने ओळख करून दिली आहे. त्यांच्या वसईतील घरी चित्रा नावाची मोलकरीण येत असे. तिच्या कामातील उरक, स्वच्छता आणि नीटनेटकेपणा पाहून लेखिकेने लिहिले आहे, घरकाम हे नुसतंच कंटाळवाणं किंवा श्रमाचं काम नाही, तर त्यातूनही सर्जनशीलतेचा आनंद घेता येतो'. (पृष्ठ १३९)
त्या दोघींतील नाते केवळ मालकीण आणि मोलकरीण असे नव्हते, तर दोघी एकमेकींच्या सखी बनल्या होत्या. चित्राला कुष्ठरोगाचे निदान झाल्यावर लेखिकेची अस्वस्थता शब्दांत मावत नाही. आपल्या कुष्ठरोगाचा संसर्ग इतरांना होऊ नये, म्हणून चित्राने लेखिकेच्या घरचे काम सोडले. त्या परिस्थितीत झालेली आपल्या मनाची घालमेल वर्णन करताना लेखिकेने लिहिले आहे, 'आयुष्याच्या वाटेवरचे प्रसंगच आपल्याला आपली खरी ओळख करून देत असतात. प्रत्येक वेळी आपलाच आपल्याला नव्याने शोध लागत असतो'. (पृष्ठ १४६)
लेखिकेने ह्या लेखांतून स्वतःला अभिव्यक्त करत असतानाच आपली जन्मदात्री शकूआई, आजी गोदाबाई दळवी, आजोबा काशीनाथ दळवी, सुलू मावशी, कामवाली बाई चित्रा आणि आपल्या शालेय जीवनातील बालमित्र यांची अतिशय ठसठशीत व्यक्तिचित्रे आणि स्वभावचित्रे रेखाटली आहेत.
ह्या व्यक्तिचित्रांतून आप्तस्वकीयांचे जीवनघटित अतिशय नेमकेपणाने मांडले आहे. आजी ही एक देवभोळी बाई असून येल्लूबाई हे तिचे श्रद्धास्थान आहे. तिचं मन पापभीरू आहे. लेखिकेचे आजीआजोबा ही अतिशय सरळमार्गी माणसे आहेत. सातारा, कराड, लोणंद, वाठार कॉलनी इ. परिसरातील लोकजीवन आणि लोकसंस्कृतीवर छान प्रकाश टाकला आहे. ग्रामीण समुदायातील लागीर होणे, दृष्ट लागणे, दृष्ट काढणे इ. रुढी, प्रथा, परंपरा आणि लोकधारणा अधोरेखित केल्या आहेत. यात व्यक्तींच्या स्वभावाचे वेगवेगळे नमुने पाहायला मिळतात. ग्रामीण माणसांच्या संवादातील तिरकसपणाही पाहायला मिळतो.
खाद बोकडाची आणि कळा माकडाची' यांसारख्या ग्रामीण बोलीभाषेतील लोकोक्ती येतात.
ह्या लेखनात ५० वर्षांपूर्वीच्या ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील चालीरीतींचे यथातथ्य दर्शन घडते. शेण गोळा करण्याच्या निमित्ताने लेखिकेने वाचकांना सातारच्या बाजारतळावर फिरवून आणले आहे. ह्या लेखनात एक प्रकारचा प्रांजळपणा आहे. लेखिका आपले दु:ख सांगत असतानाही समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करते. माणूस म्हणूनही हे लेखिकेचे मोठेपण नजरेत भरते. ह्या सबंध वाटचालीत लेखिकेच्या मनाचा नितळपणा दिसून येतो.
सुरुवातीला सावत्र आईने आणि नंतर सासूबाईंनी छळ केला असेल, तरी ह्या लेखनात कुठेही कटुता व्यक्त झालेली नाही. कुठेही आपल्या शब्दांचा तोल ढळू दिला नाही. सगळ्या प्रतिकूल गोष्टींचा समंजसपणे स्वीकार केला आहे. यातून लेखिकेचे समृद्ध, सभ्य, सुसंस्कृत आणि क्षमाशील मन प्रतिबिंबित झाले आहे.
लेखिकेने भलेही दु:खद आठवणी जागवल्या असल्या, तरी त्या दु:ख कुरवाळता बसल्या नाहीत. त्यांनी आपल्या खाजगी दु:खाचा बाजार मांडला नाही. आपल्याच दु:खांना त्यांनी तळहातावर घेऊन तटस्थपणे न्याहाळले आहे.
लेखिकेची मैत्रीण शशी हिच्या तोंडी सहजच एक वाक्य आले आहे. लेखिकेची समजून घालताना ती म्हणते, 'अगं, पुरुषांच्या नजरेतून बाईच्या जातीची सुटका नाय. कुठंबी जा'. (पृष्ठ ७७)
ह्या वाक्यातून लेखिकेने सनातन मानवी प्रवृत्तीकडे अंगुलीनिर्देश केला आहे.
'हिरवं बोडकं गोंदण आणि काळं ठसठशीत मंगळसूत्र' ह्या लेखातील मावशीच्या आंतरधर्मीय लग्नाच्या निमित्ताने गंगाजमनी संस्कृतीचे दर्शन घडविले आहे. मावशीच्या दरिद्री राहणीमानातील बकाल बारकावे अतिशय ताकदीने टिपले आहेत.
ह्या लेखनात कुठेही आत्मप्रदर्शन नसून चिंतनात्मकता मात्र आहे. ह्या लेखनाच्या निमित्ताने लेखिकेने केलेले आत्मनिष्ठ चिंतन अतिशय लोभसवाणे आहे. यातील प्रत्येक लेखात लेखिकेचे चिंतनशील व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित झाले आहे. जेव्हा एखाद्या प्रश्नाविषयीचे विविध पैलू लेखिकेसमोर उलगडतात, तेव्हा लेखिका 'काय की!' असे म्हणून तो विचारांचा चेंडू वाचकाच्या हाती सोपविते.
लेखिकेची लेखनशैली फारच बहारदार आहे!
वाठार कॉलनी येथील घरांचे वर्णन करताना लिहिले आहे :
'विटांच्या भिंती आणि वर ॲसबेस्टॉसचे पत्रे असलेल्या, अंगावर जाईजुई, गुलाबाच्या वेली पांघरलेल्या आणि पायात चिनी गुलाबाचे पैंजण बांधून गुलबक्षीचे गजरे गुंफत, समोरासमोर तोंड करून पायरीवर गप्पा मारत बसलेल्या लांबलचक चाळी हे त्या गावाचं वैशिष्ट्य होतं'. (पृष्ठ २३)
हे चित्रदर्शी वर्णन म्हणजे एकाच वेळी स्वभावोक्ती आणि चेतनगुणोक्ती अलंकाराचे उत्तम उदाहरण आहे.
'ऑफिस टाईम' नावाच्या फुलांविषयी लेखिकेने लिहिले आहे :
'ऑफिस टाईम. कारण ती फुलं सकाळी दहा वाजता उमलायची आणि सहा वाजता कोमेजून जायची. मला तर ऑफिसला जाताना आईने पाळणाघरात ठेवलेली ती मुलंच वाटायची'. (पृष्ठ १२२)
ऑफिस टाईमची अल्पजीवी फुले आणि पाळणाघरात ठेवलेली मुले यांची किती छान संगती लावली आहे! ह्या रसिकतेबद्दल आणि जीवनदृष्टीबद्दल लेखिकेला दाद दिलीच पाहिजे!
वसई परिसरातील तत्कालीन 'एव्हरशाईन' सिटीमधील गैरसोयींवर भाष्य करताना लेखिकेने तिरकसपणे लिहिले आहे :
'एव्हरशाईन ऐवजी नेव्हरशाईन हे नाव जास्त सार्थ वाटलं असतं त्या सिटीला'. (पृष्ठ १२३)
लेखिकेने आयुष्यात 'किसी भी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुमतक लाने में जुटी रहती है' ह्या विधानाचा पुरेपूर अनुभव घेऊन त्या अनुभवाचे दृढीकरण वाचकांपर्यंत आत्मविश्वासाने पोहोचविले आहे.
ललितलेखांचे यशापयश ब-याच अंशी लेखकाच्या भाषाशैलीवर अवलंबून असते. लेखिका वाणिज्य शाखेची पदवीधर असली, तरी भाषा अतिशय समृद्ध आहे. त्यांची भाषाशैली अतिशय प्रसन्न आहे! ह्या भाषेला मिश्कीलपणाची जरतारी झालर लाभलेली आहे. त्यामुळे हे ललित लेखन अतिशय टवटवीत आहे! लेखिका वेगळे काही लिहीत नसून वाचकांशी थेट संवाद साधते आहे, असेच वाटत राहते. संगीता अरबुने यांची लेखनशैली अतिशय ओघवती, लालित्यपूर्ण, खेळकर आणि लडिवाळ आहे. दु:ख देखणे करण्याची क्षमता ह्या लेखनात आहे आणि हेच या लेखनाचे खरे सामर्थ्य आहे.

- एकसोबीस हरी पत्ती लौंग आणि मी' (ललित लेखसंग्रह)
- लेखिका : संगीता अरबुने (वसई, ठाणे)
- प्रकाशक : शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर
- मुखपृष्ठ : सरदार जाधव
- पृष्ठे १४७ किंमत रु. ३००
- पुस्तक परिचय :
- डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
- sureshsawant2011@yahoo.com

COMMENTS