स्त्रियांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक वेदनांकडे कळत-नकळत आपण दुर्लक्ष करीत आलो आहोत, पण स्त्रियांच्या वेदनांना ऐकून घेणं हा विलक्षण अनुभव आहे. या वेदनांना समजून घेत केलेले लेखन अधिक सकस ठरते, असे प्रतिपादन प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. किशोर अतनूरकर यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा, वाड्मय व संस्कृती अभ्यास संकुलाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘मराठवाड्यातील लेखन’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या दुसऱ्या सत्रात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. सत्राचा विषय ‘मराठी साहित्यातील डॉक्टरांचे योगदान: मी व माझे लेखन’ हा होता. यावेळी मंचावर प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. नंदकुमार मुलमुले, डॉ. अच्युत बन, डॉ. रवींद्र तांबोळी, डॉ. राजेंद्र गोणारकर व भाषा संकुलाच्या संचालिका डॉ. शैलजा वाडीकर उपस्थित होत्या.
डॉ. नंदकुमार मुलमुले म्हणाले की, मी मूलत: लेखक आहे व व्यवसायाने डॉक्टर आहे. सत्य हे कल्पिताहून अद्भुत आहे. तेव्हा डोळे उघडे ठेवून पाहायला शिकले पाहिजे. माहितीपर लेखनापेक्षा मला माणसांच्या कहाण्या सांगायला अधिक आवडते, असे सांगून आपल्या लेखनात चिरंतनाची चिमूटभर माती असायलाच हवी, त्याखेरीज लेखनाला उंची प्राप्त होत नाही, असे ते म्हणाले.
डॉ. रवींद्र तांबोळी यांनी आपल्या उपहास आणि विनोदी लेखनासाठी जीवनाकडे पाहण्याच्या निगर्वी दृष्टीची मदत झाली. ‘पत्नीपुराण’ लिहिणारा मी धाडसी लेखक आहे, असे ही ते विनोदाने म्हणाले. लेखन होण्यासाठी जाणीवा व्यापक हव्यात. त्यासाठी खूप वाचन करा, असे उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी आहवान केले.
डॉ. अच्युत बन यांनी आपल्या प्रवासवर्णनपर लेखनाचे मर्म उलगडून सांगितले. वैद्यकीय व्यवसाय करताना तसेच जगभरचा प्रवास करताना असंख्य माणसे भेटली. त्यांना समजून घेण्यातून आयुष्य समृद्ध झाले. हे लोक हीच माझ्या लेखनाची प्रेरणा आहेत, असे ते म्हणाले
सत्राचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले. यावेळी शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पी.टी. जमदाडे, डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. योगिनी सातारकर, डॉ. पी. विठ्ठल, डॉ. संयोजक डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. रमेश ढगे व विद्यार्थी विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS