लातूर, दि. ३० : हेल्मेटचा वापर स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि परिवाराच्या
हितासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे लातूरच्या सुजाण नागरिकांनी पोलीस
प्रशासनाला हेल्मेटच्या वापरासाठी सक्ती करण्याची वेळच येऊ देता कामा
नये, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले.
माझं लातूर परिवार , राधिका ट्रॅव्हल्स आणि लातूर प्रादेशिक परिवहन
विभागाच्या वतीने मंगळवारी सायंकाळी प्रसार माध्यमात कार्यरत
सहकाऱ्यांसाठी हेल्मेट वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी अध्यक्षपदावरून निखिल पिंगळे बोलत होते. यावेळी उप प्रादेशिक
परिवहन अधिकारी विजय भोये, ज्येष्ठ पत्रकार अरुण समुद्रे,अभय मिरजकर,
जिल्हा परिषदेचे लेखा अधिकारी आनंद ऐनवाड, उद्योजक आदित्य भुतडा, शाम
तोष्णीवाल, सुनील देशपांडे, महेंद्र पारडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे म्हणाले की,
रस्ता अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांत प्राधान्याने तरुण - युवकांची
संख्या अधिक असल्याचे आढळून येते. आजमितीस हेल्मेटचा वापर करणाऱ्यांची
संख्या अत्यंत नगण्य असल्याचे दिसून येते. हेल्मेट सुरक्षेसाठी अत्यंत
उपयोगी आहे. मात्र, त्याचा वापर करा, असे सांगण्याची वेळ प्रादेशिक
परिवहन विभाग व पोलीस प्रशासनावर येते, ही बाब योग्य नाही. स्वतःच्या आणि
परिवाराच्या सुरक्षेसाठी प्रत्येक जागरूक नागरिकाने किमान यापुढील काळात
तरी नियमितपणे हेल्मेटचा वापर करावा,अशी अपेक्षा पिंगळे यांनी व्यक्त
केली.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांनी यावेळी बोलतांना नागरिकांनी
स्वतःच्या सुरक्षेचे महत्व जाणून घेऊन हेल्मेटचा कटाक्षाने उपयोग
करण्याची सवय लावून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. वास्तविक पाहता,
हेल्मेट वापर अथवा वाहतुकीच्या नियमांचे पालन करा,असे सांगण्याची पाळी
प्रशासनावर येणार नाही, याची काळजी सगळ्यांनी घ्यायला हवी. रस्ता
सुरक्षा अभियानादरम्यान आपल्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध
उपक्रमांना सहकार्य करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केले. ज्येष्ठ
पत्रकार अरुण समुद्रे, सुनील देशपांडे, महेंद्र पारडे यांनीही आपले
विचार व्यक्त केले. या कार्यक्रमात खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या आणि
दहा वर्षाहून अधिक काळ विनाअपघात सेवा देणाऱ्या वरिष्ठ वाहन चालकांचा
प्रशस्ती पत्र , शाल - श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी १०१
हेल्मेटचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक दीपरत्न निलंगेकर यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी माझं
लातूर परिवाराच्या वतीने राबविण्यात आलेल्या व राबविण्यात येणाऱ्या विविध
उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जुगलकिशोर तोष्णीवाल
यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माझं लातूर परिवाराच्या सर्व
सदस्यांनी परिश्रम घेतले.
-----------------------------

COMMENTS