◾कृषीपंप वीज तोडणी थांबवली तरिही 748 शेतकऱ्यांनी भरले वीज बील*
◾पंधरा दिवसात संपूर्ण थकबाकीमुक्त होत केला 1 कोटी 14 लाखांचा भरणा*
◾कृषीपंप धारक शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन*
नांदेड दि. 30 मार्च : महावितरणने थकबाकीदार कृषीपंपाची वीज तोडणी पुढील तीन महिने थांबवली असली तरीही गेल्या पंधरा दिवसात नांदेड परिमंडळातील 748 शेतकऱ्यांनी 1 कोटी 40 लाख रूपयांचा उत्सफूर्तपणे भरणा करत कृषीपंप वीजजोडणी धोरणाच्या पन्नास टक्के माफीचा लाभ घेतला आहे. विलंब आकार आणि व्याजातील सुट दिल्यानंतर सुधारीत थकबाकीनुसार 50 टक्के माफीचा लाभ घेण्यासाठी आता केवळ एकच दिवस शिल्लक राहीला आहे. महावितरण कृषीपंपाची वीज जोडणी तोडणार नसली तरीही आपल्या गावातील वीजयंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी थकबाकीदार शेतकऱ्यांनी धोरणाचा लाभ घेत थकीत वीजबील भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी केले आहे.
कृषीपंपांच्या थबाकीतून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून कृषीपंप वीजजोडणी धोरण राबविले जात आहे. त्यानुसार कृषीपंपाची वीज जोडणी खंडीत न करण्याची घोषणा केल्यानंतर 16 मार्च पासून नांदेड परिमंडळातील 748 कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी तब्बल 1 कोटी 14 लाख रूपयांचा भरणा केला आहे. यामध्ये नांदेड जिल्हयातील 364 शेतकऱ्यांनी 62 लाख रूपयांचे वीजबील भरले आहे. तर परभणी जिल्हयातील 271 शेतकऱ्यांनी 37 लाख रूपयांचा भरणा केला आहे. त्याचबरोबर हिंगोली जिल्हयातील 113 शेतकऱ्यांनी 14 लाख रूपयांचा भरणा केला आहे. एकीकडे वीजबिलांच्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते जनमित्रांपर्यंत सर्व विभागाचे अधीकारी, कर्मचारी रणरणत्या उन्हात घरोघरी धडक मोहीम राबविली जात आहे. या पार्श्वभुमीवर कृषीपंपधारक शेतकऱ्यांचा उत्सफुर्त सहभाग कौतुकास्पद आहे.
महाकृषीऊर्जा अभियानाच्या माध्यमातून आज पर्यंत नांदेड परिमंडळातील 3 हजार 927 शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत. नांदेड जिल्हयातील भोकर विभागातील 675 शेतकरी, देगलूर विभागातील 253 शेतकरी, नांदेड शहर विभागातील 256 शेतकरी तर नांदेड ग्रामीण विभागातील 835 शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत. त्याचबरोबर परभणी विभाग क्रमांक एक मधील 411 शेतकरी तर विभाग क्रमांक दोन मधील 604 शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत. हिंगोली जिल्हयातील 893 शेतकऱ्यांनी शंभर टक्के थकबाकी भरत वीजबील कोरे केले आहे.
कृषीपंप वीज जोडणी धोरणाच्या माध्यमातून वीजबिलांच्या वसुलीतून प्राप्त झालेला ६६ टक्के आकस्मिक निधी हा प्रत्येकी ३३ टक्के निधी ग्रामपंचायत व जिल्हास्तरावर विकास कामांसाठी खर्च करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. जमा झालेला निधी त्या-त्या ग्रामपंचायत व जिल्ह्याच्या क्षेत्रातच स्थानिक वीजयंत्रणेच्या पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्यात येत आहे. नवीन उपकेंद्र, नवीन रोहित्र व क्षमतावाढ तसेच नवीन वीजजोडण्या यासह वीज वितरण व उपकेंद्रातील विविध यंत्रणेचे पायाभूत सक्षमीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे कृषिपंपांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना आणखी दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. या ऐतिहासिक योजनेत सहभागी होऊन कृषिपंपाचे वीजबिल कोरे करावे तसेच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
*फोटो ओळ : बेरळी (खु) ता. लोहा येथील शेतकरी श्री मुक्तीराम विश्वनाथ सुर्यवंशी यांनी कृषीपंपाची 1 लाख 10 हजाराची थकबाकी भरून थकबाकीमुक्त झाले. याप्रसंगी कार्यकारी अभियंता श्री आर. पी. चव्हाण, राजकुमार सिंदगीकर, कार्तिक जाधव व इतर अधिकारी*

COMMENTS