नांदेड. (प्रतिनिधी)
अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचा कोंडा तोडून घरातील नगदी ७० हजार रूपयांसह तब्बल २ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिनेही चोरून नेले. ही घटना ६ एप्रिल रोजी पहाटे नांदेडच्या 'हडको' परिसरात घडली. मात्र, ग्रामीण पोलीस ठाण्यात अखेर २५ एप्रिल रोजी याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, नांदेडच्या 'हडको' परिसरातील रहिवासी तथा सेवानिवृत्त पर्यवेक्षक शकुंतलाबाई हरिश्चंद्र मानकरी आणि सेवानिवृत्त प्रा. हरिश्चंद्र मानकरी यांचा एकुलता एक मुलगा प्रफुलचंद्र मानकरी व्यवसायानिमित्त पुणे येथे वास्तव्यास आहे. दरम्यान, प्रफुलचंद्र मानकरी यांना त्यांचे आई-वडील शकुंतला मानकरी व प्रा. हरिश्चंद्र मानकरी यांची प्रकृती ठीक नसल्याचे समजले. आई-वडीलांची प्रकृती ठीक नसल्याचे समजताच त्यांना भेटण्यासाठी प्रफुलचंद्र मानकरी हे पुणे येथून १ एप्रिल रोजी नांदेड येथे आले. दरम्यान, त्यांना आपल्या आई-वडीलांची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी आई-वडिलांना अधिक उपचारासाठी ३ एप्रिल रोजी नांदेडहून रूग्णवाहिकेने औरंगाबाद येथील एका खाजगी रूग्णालयात घेवून गेले. याशिवाय, प्रफुलचंद्र मानकरी हे त्यांच्या आई-वडीलांच्या देखभालीसाठी औरंगाबाद येथील रूग्णालयात थांबले.
विशेष बाब म्हणजे, मानकरी दांपत्य हे अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात दाखल असल्याची सुवर्णसंधी साधत अज्ञात चोरट्यांनी ६ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास मानकरी यांच्या घराच्या दरवाजाचा कोंडा तोडून आत प्रवेश मिळविला. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी घरातील डब्यात ठेवलेले रोख ७० हजार रूपये व कपाट तोडून आतील सोन्याचे दागिने असा एकूण सुमारे दोन लाख रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
प्रफुलचंद्र मानकरी यांच्या शेजारील मंडळींनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी घरफोडी झाली असल्याची माहिती देवूनसुद्धा प्रफुलचंद्र मानकरी यांना औरंगाबाद येथील रूग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या आई-वडिलांना एकटे सोडून नांदेडला येणे शक्य झाले नाही. अखेर १६ एप्रिल रोजी सायंकाळी पाच ते रात्री आठवाजेच्या सुमारास शकुंतला मानकरी व सेवानिवृत्त प्रा. हरिश्चंद्र मानकरी यांचाही मृत्यू झाला. परिणामी, प्रफुलचंद्र मानकरी यांना उपरोल्लेखित घरफोडी प्रकरणाची रितसर तक्रार देण्याकरिता त्वरित येणे अशक्य झाले.
याप्रकरणी प्रफुलचंद्र हरिश्चंद्र मानकरी यांच्या तक्रारीआधारे २५ एप्रिल रोजी नांदेड ग्रामीण ठाण्यात अखेर अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस ठाणे अंमलदार ज्ञानोबा गिते तसेच मदतनीस पो. कॉ. जनार्दन महाले यांनी दिली आहे.
प्रभारी पो. नि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो.नि. सुरेश थोरात व त्यांचे सहकारी कर्मचारी हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

COMMENTS