माहूर (प्रतिनिधी)कुंभकोणम दुर्घटनेच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची व जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक )यांनी दि. 05 ऑक्टो. 2009 रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात दिलेल्या 20 निर्देशाची माहूर शहरासह तालुक्यातील अनेक इंग्रजी शाळांकडून अंमलबजावणी होत नसल्याचा गंभीर आरोप जेष्ठ समाजसेवक विनायक उर्फ नंदू संतान व शिवसेनेचे तालुका संघटक विनोद सूर्यवंशी यांनी दि. 30 एप्रिल रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनातून केला आहे.
जीनियस किड्स इंग्लिश स्कूल, मॉडर्न इंग्लिश स्कूल, सह्याद्री इंग्लिश स्कूल, बालकृष्ण इंग्लिश स्कूल, साई इंग्लिश स्कूल, पोतदार इंग्लिश स्कूल, गुरुकुल इंग्लिश स्कूल (माहूर ), द रायझिंग इंग्लिश स्कूल, सुभद्राबाई केशवे इंग्लिश स्कूल, के. रतनलाल राठोड इंग्लिश स्कूल (वाईबाजार) आदी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत आवश्यक उपाययोजना नसल्याचे निदर्शनास आले असल्याचा उल्लेख संतान व सूर्यवंशी यांनी आपल्या निवेदनात केला आहे. या शाळांकडे इमारत बांधकामासाठी आवश्यक असलेले नॅशनल बिल्डिंग कोड ऑफ इंडियाचे निकष पूर्ण नाहीत. अग्निशमन यंत्रणा, पाण्याचा साठा यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत आहे. तसेच शाळांमध्ये खेळाच्या सुविधा, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा यांचाही अभाव असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.याशिवाय, शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित वातावरणात शिक्षण घेण्याचा अधिकार असतानाही संबंधित शाळांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप त्यातून करण्यात आला आहे. या प्रकरणी शिक्षण विभागाने तातडीने चौकशी करून संबंधित शाळांवर कारवाई करावी, अन्यथा न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.तसेच, माहिती अधिकारांतर्गत शाळांच्या शुल्क संरचनेबाबत माहिती मागविण्यात आली असून प्रवेश फी, शिक्षण फी, इव्हेंट फी याबाबतही पारदर्शकता नसल्याचे निवेदनातून सांगण्यात आले आहे. या सर्व बाबींमुळे पालक व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.या प्रकरणी संबंधित विभागाने त्वरीत लक्ष घालून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केली आहे.

COMMENTS