माहूर (प्रतिनीधी) रखरखत्या उन्हात जीवसृष्टीला दिलासा देण्याच्या उद्देशाने माहूर शहरात एक सामाजिक जाणीवेचा उपक्रम राबविण्यात आला आहे. पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी शहर परिसरातील अनेक ठिकाणी झाडांवर जलपात्र ठेवण्यात आले आहेत.
यासोबतच, उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन स्व. आमदार मा. प्रदीपजी नाईक यांच्या स्मरणार्थ, माहूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने टी-पॉईंट व बसस्थानक परिसरात प्रवासी, नागरिक तसेच तीर्थक्षेत्र माहूर येथे ग्रामीण भागातून येणाऱ्या भाविकांसाठी थंड पाण्याच्या पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे. या पाणपोईचे उद्घाटन जिल्हा परिषद शाळेतील सहशिक्षक देशपांडे सर व सुनील कांबळे सर यांच्या हस्ते संपन्न झाले.
सध्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या उन्हामुळे नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. उदरनिर्वाहासाठी अनेकांना घराबाहेर पडणे अपरिहार्य असते. माहूर परिसरात विविध गावांचा संपर्क असल्याने शेतमजूर, कामगार, प्रवासी व भाविकांची सतत वर्दळ असते. अशा परिस्थितीत प्रत्येकाला बाटलीबंद पाणी विकत घेणे शक्य नसते. त्यामुळे अनेकांची तहान आर्थिक अडचणींमुळे भागत नाही.
याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. स्व. आमदार प्रदीप नाईक यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेली ही पाणपोई नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.या प्रसंगी नगराध्यक्ष फिरोज दोसानी, सभापती विजय कामटकर, सभापती प्रतिनिधी माजी नगरसेवक रफीक सौदागर, नगरसेविका प्रतिनिधी इरफान सय्यद अफसर अली, आकाश कांबळे, जावेद दोसानी, चेतन जाधव, सुनील आडे, गजानन जैस्वाल, तानू भाई आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून उष्णतेत होरपळणाऱ्या नागरिकांना दिलासा देत सेवाभाव जपण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS