मुलांना वाचतं-लिहितं करताना' : एका प्रयोगाची फलश्रुती डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

महाराष्ट्रात जे काही उपक्रमशील शिक्षक आहेत, त्यातील एक महत्त्वाचे नाव आहे समाधान शिकेतोड. समाधान हे धाराशिव जिल्हा परिषदेच्या सेवेत प्राथमिक...

महाराष्ट्रात जे काही उपक्रमशील शिक्षक आहेत, त्यातील एक महत्त्वाचे नाव आहे समाधान शिकेतोड. समाधान हे धाराशिव जिल्हा परिषदेच्या सेवेत प्राथमिक शिक्षक आहेत. ते एक उत्तम लेखक-कवी आहेत. त्यांची 'पोपटाची पार्टी', 'जादुई जंगल', 'गावाकडची मजा', 'संघर्षयात्री', 'चला, कोरोनामुक्त होऊ या', 'माझा विद्यार्थी' इ. पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 'गावाकडची मजा' हे त्यांचे पुस्तक इंग्रजीत अनुवादित झाले आहे. अलीकडेच त्यांचे 'मुलांना वाचतं-लिहितं करताना' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक म्हणजे त्यांनी मुलांच्या वाचन-लेखन विकासासाठी केलेल्या प्रयोगांचा कार्यअहवाल आहे. समाधान शिकेतोड हे पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. सेवेच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी नांदेड जिल्ह्यातील, भोकर तालुक्यातील बल्लाळ ह्या सीमावर्ती गावात निष्ठेने काम केले आहे. ते इथे कार्यरत असताना विद्यार्थ्यांची बोलीभाषा वेगळी असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनात त्यांना अडथळे जाणवत. तो अध्ययन अवरोध दूर करण्यासाठी त्यांनी 'बोलीभाषा-प्रमाणभाषा शब्दकोश' तयार केला होता.

समाधान शिकेतोड यांनी वाचनसंस्कृतीच्या विकासासाठी 'लोकसहभागातून ग्रंथालय समृद्धी' हा उपक्रम राबविला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी त्यांच्या विद्यार्थ्यांनी साहित्य अकादमीच्या अध्यक्षांना शेकडो पत्रं लिहिली होती. शिकेतोड यांनी मराठी भाषेच्या प्रचार, प्रसार, समृद्धी आणि अभिवृद्धीसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. हल्ली विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील गोष्ट हरवली आहे, गाणे हरवले आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या गडबडीत शिक्षकांना गोष्टी सांगायला वेळच मिळत नाही. अशा रूक्ष होत चाललेल्या कालखंडात समाधान शिकेतोड यांचा 'गोष्ट सांगणारा गुरुजी' असा लौकिक झालेला आहे. गोष्टी सांगणारा शिक्षक विद्यार्थ्यांना विशेष आवडतो, हे एक उघड गुपित आहे. धाराशिव जिल्ह्यातील हाडोंग्री ह्या गावी शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थ्यांसाठी कवितालेखन कार्यशाळा घेतल्या. त्यामुळे शिकेतोड गुरुजींचे विद्यार्थी शब्दांसोबत खेळू लागले. कथा-कविता लिहू लागले. 

विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांना सदैव तयार असावे लागते. एकदा डी. एड्. बी. एड् झालो, म्हणजे तहहयात शिकविण्याचा परवाना मिळाला, असे होत नाही. शिक्षणप्रक्रिया आनंददायी आणि सर्जनशील होण्यासाठी शिक्षकाला आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे लागते. न्यूझीलंड देशातील सिल्ल्व्हिया ॲस्टन वॉर्नर ह्या शिक्षिकेने लिहिलेले 'टीचर' हे पुस्तक वाचल्यावर आपल्याला विद्यार्थ्यांसाठी आणखी काम करण्याची प्रेरणा मिळाली, असे शिकेतोड यांनी प्रांजळपणे लिहिले आहे. एखादे पुस्तक काय बदल करू शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. वर्षा सहस्रबुद्धे यांनी लिहिलेले 'मराठी भाषा आणि शिक्षक' हे पुस्तक वाचल्यावर त्यांना विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याची प्रेरणा मिळाली.

कृष्णकुमार यांचे 'शिकवण्यासारखे काय आहे?', रमेश पानसे यांचे 'भाषाग्रहण आणि भाषाशिक्षण', हेरंब कुलकर्णी यांचे 'बखर शिक्षणाची', नामदेव माळी यांचे 'चला, लिहू या', नीलेश निमकर यांचे 'शिकता शिकविता' आणि मंजिरी निमकर यांचे 'मुलांचे सृजनात्मक लिखाण' ह्या पुस्तकांनी समाधान शिकेतोड यांना ऊर्जा दिली आहे. शिक्षकांनी पुस्तके वाचणे किती आवश्यक आहे, हेच जणू समाधान अनुभवाने सांगतात. 

समाधान शिकेतोड यांनी शिक्षक प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. 'क्वेस्ट' ह्या संस्थेचे संचालक नीलेश निमकर यांनी आयोजित केलेला भाषा शिक्षणाचा कोर्स त्यांनी केला आहे. स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी समाधान शिकेतोड यांनी केलेली धडपड वाखाणण्याजोगी आहे. तशीच ती इतर शिक्षकांसाठी अनुसरणीय आहे. 

शिकेतोड यांचे नाव जरी समाधान असले, तरी ते आपल्या कामावर कधीच समाधानी नव्हते. म्हणजे ते 'आत्मसंतुष्ट' नव्हते. ते निरंतर नवीन काही शिकण्यासाठी धडपडत होते. शिक्षण क्षेत्रातील नवेनवे प्रयोग जाणून घेण्यासाठी ते नेहमीच उत्सुक राहिले आहे. त्यासाठी त्यांनी कुमठे बीटचा दोन वेळा अभ्यासदौरा केला. तेच उपक्रम त्यांनी आपल्या शाळेत सुरू केल्यामुळे त्यांचेही विद्यार्थी वाचू लागले, लिहू लागले. त्यासाठी त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसोबत कृतियुक्त गाणी आणि कविता म्हणायला सुरुवात केली. मनमोकळ्या गप्पागोष्टी करायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट सांगून ती अपूर्ण गोष्ट पूर्ण करायला शिकविले. चित्रमालिकेवरून गोष्ट तयार करायला शिकविले. विद्यार्थ्यांसोबत चित्रवाचन, चित्रवर्णन आणि चित्रगप्पा मारायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांसोबत भाषिक खेळ सुरू केले. विद्यार्थ्यांना अनुभवकथन करण्याची संधी दिली. 

त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्यातला आनंद मिळू लागला. परिणामी विद्यार्थ्यांची अध्ययन प्रक्रिया सुधारली. 

समाधान शिकेतोड यांनी 'शिक्षण संवाद' नावाचा ब्लॉग लिहायला सुरुवात केली. त्यात त्यांनी विद्यार्थ्यांसोबत घडत असतानाचे वेगवेगळे अनुभव सांगितले आहेत. 'अंकुरती साक्षरता' म्हणजे काय, हे त्यांनी आधी समजून घेतले. कृतीतून भाषाशिक्षण द्यायला सुरुवात केली. चित्रवाचनातून भाषाशिक्षण द्यायला सुरुवात केली. अशा प्रयोगांतून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला भरपूर वाव दिला. विद्यार्थ्यांच्या वाचनात सहभागी होत 'सहभागी वाचनाचा' प्रयोग केला. त्यासाठी आधी स्वतः पूर्वतयारी केली. विशिष्ट अक्षरांचे गट तयार करून विद्यार्थ्यांवर वाचनाचे सातत्याने प्रयोग केले. हे प्रयोग करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या घरच्या भाषेचा नेहमीच आदर केला. विद्यार्थ्यांच्या वाचन-लेखनाचा विकास हातात हात घालून होत असतो. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गोष्टींची पुस्तके वाचून दाखवायला हवीत. शाळेत वाचन-लेखन कोपरा हवाच, अशी निरीक्षणे समाधान शिकेतोड यांनी नोंदविली आहेत.

समाधान शिकेतोड यांनी विद्यार्थ्यांच्या अर्थपूर्ण वाचनासाठी जाणीवपूर्वक अक्षरगट आणि वाचनपाठ तयार केले. बहुभाषिक परिस्थितीसाठी स्वतंत्र वाचनपाठ तयार केले. एकदा वाचनकौशल्य आत्मसात केले, की पुढचा टप्पा असतो तो लेखनकौशल्याचा. विद्यार्थ्यांचे लेखनकौशल्य विकसित करण्यासाठी शिकेतोड यांनी वेगवेगळे प्रयोग केले. विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय देऊन त्यांना त्यांचे स्वतःचे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा दिली. कंटाळा न करता त्यांच्याकडून अनेक वेळा पुनर्लेखन करवून घेतले. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना अनेक पुस्तके वाचून दाखवली. विद्यार्थ्यांना स्वतःचे पुस्तक तयार करण्याचा आनंद मिळवून दिला. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना वाचलेल्या पुस्तकावर 'प्रतिसादात्मक लेखन' करण्याची दृष्टी दिली. त्यासाठी त्यांनी माधुरी पुरंदरे यांच्या 'सख्खे शेजारी' ह्या पुस्तकाची निवड केली. विद्यार्थ्यांना ह्या पुस्तकावर पहिले, दुसरे, तिसरे प्रतिसादात्मक लेखन करण्याची संधी दिली. त्यातून विद्यार्थ्यांच्या लेखनात कशी सुधारणा होत गेली, याची निरीक्षणे नोंदविली आहेत. 

मुलांसोबत काम करण्याचा हा प्रवास समृद्ध करणारा होता, असे मत लेखकाने नोंदविले आहे. 

समाधान शिकेतोड यांचे 'मुलांना वाचतं-लिहितं करताना' हे पुस्तक म्हणजे प्रांजळ असे अनुभवकथन आहे. ह्या लेखनात लेखकाची संवेदनशीलता आणि प्रयोगशीलता दिसून येते. सध्या आपल्या शिक्षणव्यवस्थेत' अध्ययन संकट' आलेले आहे. ही कोंडी फोडण्यासाठी अशा प्रेरणादायी शिक्षकांची आणि पुस्तकांची नितांत आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता शिक्षकाने सतत शिकत राहिले पाहिजे, हा संदेश ह्या पुस्तकातून मिळतो. विद्यार्थ्यांना शिकविणे म्हणजे आधी आपण शिकणे, ह्या विधानाची खातरी पटते. ह्या अनुभवाधारित पुस्तकाला शिक्षणतज्ज्ञ नीलेश निमकर यांची प्रस्तावना लाभली असून शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी ह्या पुस्तकाची पाठराखण केली आहे. रणजीत पाटील, डॉ. इब्राहिम नदाफ, 

डॉ. राजेश बनकर, डॉ. दयानंद जटनुरे, डॉ. विशाल तायडे आणि व्यंकटेश चौधरी यांचे अभिप्राय प्रेरणादायी आहेत. ज्या शिक्षकांना शिक्षण क्षेत्रात जीव ओतून काही करायचे आहे, त्यांनी हे पुस्तक अवश्य वाचलेच पाहिजे. 

  • 'मुलांना वाचतं-लिहितं करताना'
  • लेखक : समाधान शिकेतोड 
  • मुखपृष्ठ : संतोष घोंगडे 
  • प्रकाशक : हरिती पब्लिकेशन्स, माण, जि. पुणे 
  • पृष्ठे : ९६      किंमत रु. १५०
  • पुस्तक परिचय :
  • डॉ. सुरेश सावंत, नांदेड. 
  • sureshsawant2011@yahoo.com

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group