राम दातीर माहूर (प्रतिनिधी)माहूर शहरातील वाढती मोकाट कुत्र्यांची संख्या आणि त्यामुळे नागरिकांसह भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी माहूर नगरपंचायत प्रशासनाने आता पुढाकार घेतला असून, शहरातील मोकाट कुत्र्यांची नसबंदी (Sterilization) व लसीकरण (Vaccination) करण्यासाठी एक विशेष मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेमुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.शहरातील विविध प्रभागांमध्ये मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांकडून तक्रारी येत होत्या. याची दखल घेत नगरपंचायत प्रशासनाने ही मोहीम युद्धपातळीवर राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या तांत्रिक आणि वैद्यकीय कामासाठी प्रशासनाने परभणी येथील 'अमनाह फाउंडेशन' या संस्थेची निवड केली आहे.
ही मोहीम शहराच्या सर्व प्रभागांमध्ये टप्प्याटप्प्याने राबविली जाणार आहे.
प्रशिक्षित पथकाद्वारे मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचे योग्य आरोग्य परीक्षण केले जाईल.नियमांनुसार कुत्र्यांची नसबंदी व रेबीज विरोधी लसीकरण करण्यात येईल.
पुनर्वसन: उपचार व शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित कुत्र्यांना त्यांच्या परिसरात सोडण्यात येणार आहे.“नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देऊन ही मोहीम राबविण्यात येत असुन मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच त्यांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी नसबंदी व लसीकरणाची प्रक्रिया केली जाणार आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.नागरिकांना त्यांच्या परिसरात मोकाट कुत्र्यांबाबत काही समस्या असल्यास किंवा तक्रार नोंदवायची असल्यास त्यांनी तातडीने नगरपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी केले आहे.

COMMENTS