रामायणाचार्य हभप नामदेव महाराज लबडे यांचे प्रतिपादन.....
ईज्जतगाव येथील भव्य दिव्य धार्मिक कार्यक्रमाची काल्याच्या कीर्तनाने सांगता.....
नरेंद्र येरावार
उमरी प्रतिनिधी
कितीही संपत्ती असो, कितीही पैसा असो, कितीही बंगले धन दौलत असून चालणार नाही त्यापेक्षा आपली संतती चांगली असावी लागते. त्यामुळे लहानपणापासूनच आपल्या मुली मुलांवर चांगले संस्कार घडवा. तरच तरुणपिढी बिघडणार नाही असे प्रतिपादन रामायणाचार्य प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प नामदेव महाराज लबडे पंढरपूरकर यांनी केले आहे.
उमरी तालुक्यातील श्रीक्षेत्र ईज्जतगाव भवानी येथील काल्याच्या कीर्तनातून ते समाज प्रबोधन करीत होते.
हभप नामदेव महाराज लबडे पुढे म्हणाले, चांगले संस्कार नसल्याने
तरुणपिढी बरबाद होत आहे. वयात आलेल्या मुली पळून जात आहेत. लव जिहादचे प्रकार वाढले आहेत कारण त्यांच्यावर चांगले संस्कार नसल्यामुळे तरुण मुलं मुली वाईट मार्गाला लागत आहे. महाराष्ट्रात आज चिमुकलीवंर अत्याचार होतात. त्यांचा निष्पाप बळी घेतल्या जातो. परंतु अशा नराधमाना कठोर शिक्षा होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना कठोर शिक्षा होती. सध्या घटस्फोटाचे प्रकार वाढलेत. याला जबाबदार कोण. असा प्रश्न उपस्थित करून लबडे महाराजांनी अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचा कायदा सरकारने मंजूर करावा अशी मागणी करून न्यायालयात असलेली भगवत गीता पाठ्यपुस्तकात घालावी. तरच चांगले संस्कार घडतील असे सांगितले.
श्रीक्षेत्र ईज्जतगाव भवानी माता मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद् देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, भव्य कीर्तन महोत्सव, हरीजागर, कलशारोहण आदी धार्मिक कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.
कथाकार अंजलीताई केंद्रे उदगीरकर यांची श्रीमद् देवी भागवत कथा झाली. महोत्सवात हभप कु.अनुष्काताई ढगे इज्जतगावकर, हभप गणेश महाराज वारंगे बीड, हभप गोपीनाथ महाराज जरांगे, साध्वी महंत सोनालीदीदी करपे, हभप गोपीचंद शास्त्री सारसेकर, महादेव महाराज राऊत, भागवताचार्य प्रसिद्ध कीर्तनकार शिवानंद शास्त्री त्रिकूटधाम पैठण यांचा सहभाग होता तर 3 मे रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रामायणाचार्य हभप नामदेव महाराज लबडे पंढरपूरकर यांचे काल्याचे किर्तनाने सांगता झाली दरम्यान गावातून ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली श्री श्री 108 शांतीब्रह्म महंत यदुबन महाराज कोलंबीकर यांच्या हस्ते कलशारोहण झाले. या धार्मिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ईज्जतगाव पट्टी, आबादी, बर्डी, अमदापुर, वाडी यासह पंचक्रोशीतील समस्त गावकरी मंडळीनी परिश्रम घेतले.
कलशारोहण, काल्याच्या किर्तनानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. जवळपास पंचवीस हजार भाविक भक्तांनी हजेरी लावून भवानी मातेचे दर्शन घेतले.
.......

COMMENTS