मायलेकींचा पत्रसंवाद' : दृढ नात्याचा सुंदर गोफ डॉ. सुरेश सावंत, नांदेड. राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक (नि.), साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक-कवी.

सांगली जिल्ह्यातील एक उपक्रमशील शिक्षक कृष्णात पाटोळे यांनी संपादित केलेले 'मायलेकींचा पत्रसंवाद' हे पुस्तक नांदेडच्या सायास पब्लिके...

सांगली जिल्ह्यातील एक उपक्रमशील शिक्षक कृष्णात पाटोळे यांनी संपादित केलेले 'मायलेकींचा पत्रसंवाद' हे पुस्तक नांदेडच्या सायास पब्लिकेशन्सने अतिशय आकर्षक स्वरूपात प्रकाशित केले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत पोचले पाहिजे, असे हे आगळेवेगळे पुस्तक आहे. हे पुस्तक म्हणजे, शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील वेगळा प्रयोग म्हणून याकडे पाहिले पाहिजे. प्रकाशक डॉ. माधव जाधव यांनी ह्या पुस्तकाला 'प्रकाशकीय पत्रसंवाद' लिहिला आहे. ज्येष्ठ साहित्यिक तथा शिक्षण खात्यातील प्रयोगशील अधिकारी (नि.) श्री. नामदेव माळी यांची ह्या पुस्तकाला पाठराखण लाभली आहे. ह्या पुस्तकाला मी लिहिलेली प्रस्तावना इथे देत आहे. 

सांगली जिल्ह्यातील समडोळीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री कृष्णात पाटोळे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी बहुविध उपक्रम कार्यान्वित केले आहेत. 'मायलेकींच्या पत्रसंवादा'चा उपक्रम हा त्यापैकीच एक अभिनव आणि नावीन्यपूर्ण असा उपक्रम आहे. शाळेत आयोजित हळदी- कुंकवाच्या कार्यक्रमात 'वाण' देण्याचा भाग म्हणून ही पत्रं लिहिली आहेत. 'वाण' म्हणून एकमेकींना पत्र लिहिण्याची कल्पनाच किती मजेशीर आहे! ह्या उपक्रमाअंतर्गत शाळेतील मुलींनी आपापल्या आईंना पत्र लिहून आपल्या अव्यक्त भावना व्यक्त केल्या आहेत. आईंनीही आपल्या लेकींच्या पत्रांना छान छान उत्तरं लिहिली आहेत. दोघींनीही ही पत्रं एकमेकींना मुद्दाम लिहिली असली, तरी यात औपचारिकतेपेक्षा अनौपचारिकताच अधिक आहे. यांतून दोघींचीही अंतःकरणं उलगडतात. ह्या सगळ्या मायलेकी आपल्याला परिचित नसल्या, तरी आपल्या भावविश्वात त्या सहज प्रवेश करतात. आपल्या नात्यातल्याच होऊन जातात. 

पत्रलेखन हे जसे शास्त्र आहे, तशीच ती एक कलासुद्धा आहे. हल्ली मोबाईलमुळे पत्रलेखन कमी झाले असले, तरी पत्र हे भावना व्यक्त करण्याचे सगळ्यात प्रभावी माध्यम आहे. ज्या गोष्टी समोरासमोर प्रगटपणे सांगता येत नाहीत, त्या गोष्टी पत्रांतून सांगणे सोयीचे असते. 

ह्या पुस्तकातील मायलेकींच्या पत्रसंवादातून स्त्रीजगताचे फार मोठे अलक्षित भावविश्व, विचारविश्व आणि अनुभवविश्व उजागर झाले आहे. 

चौथीत शिकणारी कु. दूर्वा विशाल कांबळे ही आपल्या आईला पत्र लिहून शाळेतील परिपूर्ण परिपाठासह चांगल्या शिक्षणाचे कौतुक करते. शिक्षकांच्या मेहनतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. कोरोना काळातील घरीच भरलेल्या शाळेचेही ती वर्णन करते. आपल्या कविता लेखनाविषयी सांगते. वडलांच्या तंबाखू खाण्याच्या सवयीबद्दल फक्त नाराजी व्यक्त करून ती थांबत नाही, तर प्रयत्नपूर्वक त्यांची ती सवय सोडवतेच! जे आपल्याला जमले नाही, ते आपल्या मुलीने करून दाखविले, याचा तिच्या आईला अभिमान वाटतो. आईच्या त्यागाची आणि समर्पणाची दूर्वाला जाणीव आहे, म्हणूनच ती आपल्या आईला तिची सगळी स्वप्नं पूर्ण करण्याचे आणि भविष्यात तिची काळजी घेण्याचे अभिवचन देते.

चौथीतील कु. पलक वैभव पाटील हिला आपले आईवडील निवडणुकीत विजयी झाले, याचा आनंद आहे आणि अभिमानही. तिला आपल्या आईच्या कल्पकतेचे कौतुक वाटते. पलकने जैन धर्मातील विधानपूजेविषयीही लिहिले आहे. पप्पांचे घड्याळ हरवल्यावर आईने आपले आवडते घड्याळ वापरणे सोडून दिले, ही गोष्ट पलकच्या मनात चांगलीच बिंबली आहे. ह्या मायलेकीला एकमेकींशिवाय करमत नाही, हे रात्री दोन वाजता फोन केल्याच्या प्रसंगातून लक्षात येते. पलकच्या पत्रामुळे आपल्याला पत्राचे उत्तर लिहिण्याची संधी मिळाली, याचा आनंद तिच्या आईने आपल्या पत्रात व्यक्त केला आहे. मुलगी आजारी पडली, तर आईला करमत नाही आणि आई आजारी पडली, तर मुलगी अस्वस्थ होते. नात्यांतील ही भावनिक गुंतवणूक फारच महत्त्वाची आहे!

विशेष म्हणजे, ह्या सर्व मातापालकांना आपल्या गावातील शाळेचा अभिमान वाटतो. पलकच्या आईला तिची शाळा राजवाड्यासारखी दिसते. पलकची आई (शैलजा) पलकला लिहिते, 'निवडणुकीत निवडून येणं हे एक जबाबदारीचं काम आहे'. हे एक वाक्य म्हणजे लोकशाही मूल्यांचा सुगम संस्कार आहे.

कु. अक्षरा किरण परीट हिला आई अभ्यासासाठी आपल्याला रागावते, ती आपल्या भल्यासाठीच, याची जाणीव आहे. ह्या शाळेत जी मुलगी इंग्रजीचे जास्तीत जास्त शब्द लिहील, ती 'इंग्रजीची राणी' होते. जी मुलगी जास्तीत जास्त गणितं सोडवील, ती  'गणिताची राणी' होते. ही माहिती अक्षराच्या पत्रातून मिळते. अक्षरा एकदा 'इंग्रजीची राणी' झाली आणि एकदा 'गणिताची राणी' झाली. अक्षराला आधी तांदुळग्याची भाजी आवडत नसे, पण आई तांदुळग्याची भाजी चविष्ट करते, म्हणून तिला ती भाजी आवडायला लागली, हेही ती प्रांजळपणे कबूल करते. आपली आई समजूतदार असल्यामुळे आपण समजूतदार झालो, हे सांगायलाही ती विसरत नाही. 

अक्षराची आई, स्वप्नाली यांनी लिहिलेल्या पत्राच्या उत्तरात 'तू आशा सोडू नकोस. नकारात्मक विचार करू नकोस. प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने बघत जा. विश्वासाने पुढे जा' असा छान संदेश दिला आहे. 'तुझ्यासारखी लहान मुले आपल्या देशाचे भवितव्य आहेत. गाडी, बंगला, पैसा यापेक्षा आपली खरी प्रॉपर्टी आपली मुलेच असतात', अशा शब्दांत अक्षराला विश्वास दिला आहे. 

कु. प्रगती प्रशांत आंबी ही तिसरीत शिकणारी विद्यार्थिनी आपल्या आईला लिहिलेल्या पत्रात म्हणते, 'मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही'. प्रगतीने आपण गोव्याला गेल्यावर तिथल्या बीचवर हरवल्याचा प्रसंग वर्णन केला आहे. एकदा प्रगती इंग्रजी कविता पाठांतर स्पर्धेत जिल्ह्यात पहिली आली होती. आपली आई दिवसभर खूप कामे करते आणि वेळ काढून आपला अभ्यास घेते, याचा अभिमान वाटतो. यापुढे मी हट्टीपणा करणार नाही, असा विश्वास ती आपल्या आईला देते. 

प्रगतीची आई श्रुती यांनी 'मायलेकींचा पत्रसंवाद' घडवून आणल्याबद्दल शाळेतील शिक्षकांचे आभार मानले आहेत. आपल्या पोटी प्रगतीने जन्म घेतल्यामुळे आईने स्वतःला 'भाग्यवान' म्हटले आहे. आईने प्रगतीला मुळूमुळू रडण्याचा गुण सोडून देण्याची सूचना केली आहे. प्रगतीने शाळेतील प्रत्येक कार्यक्रमात भाग घ्यावा, असे आईला वाटते. 'मी तुझी आई आहे, यापेक्षा मी तुझी मैत्रीण आहे. तुझ्या सर्व अडचणीत मी तुझ्या पाठीशी आहे', असा विश्वास ह्या आईने आपल्या मुलीला दिला आहे. हा विश्वास फारच महत्त्वाचा आहे. प्रगती म्हणजे आजीची 'अंबाळ बाहुली' आहे, असा उल्लेख ह्या येतो. 

चौथीत शिकणारी कु. जान्हवी कुलदीप अडसूळ ही गायन स्पर्धेत कवठेपिराण केंद्रात पहिली आली होती. त्या वेळी तिच्या आईने तिला चाफ्याचे फूल देऊन तिचा सत्कार केला होता. एकदा जान्हवीने आकाशवाणी सांगली केंद्रावर गाणे म्हटले होते. ते गाणे ऐकून एका आजीने जान्हवीचे कौतुक केले होते. मिरजेच्या विद्यार्थी साहित्य संमेलनात जान्हवीने 'प्रज्वल माझा भाऊ' ही कविता सादर केली होती. तिथे तिचे खूप कौतुक झाले होते. लहानपणी जान्हवीला, दिसेल त्या वस्तूला धडक द्यायची सवय होती. त्यामुळे ती अनेकदा जखमी व्हायची. जान्हवीची आई आपल्या घरसंसारासाठी पिशव्या शिवण्याचे काम करते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिच्या पत्रातून समजतात. 

जान्हवीची आई सोनाली यांनी आपल्या पत्रात मुलीच्या सद्गुणांचे कौतुक करतानाच तिला तिच्या दुर्गुणांची जाणीव करून दिली आहे. ह्या दुर्गुणांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. 

मोठी बहीण या नात्याने लहान भावंडांना समजून घेण्याची शिकवण दिली आहे. जेव्हा गावात जान्हवीचे पोस्टर लागले होते, तेव्हा आईवडलांना तिचा अभिमान वाटला होता. 

तिसरीत शिकणारी कु. सिद्धी सतीश पाटील आपल्या आईला लिहिलेल्या पत्रात 'खिळा' ह्या शब्दासाठी 'मोळा' हा बोलीभाषेतला शब्द वापरते. एकदा हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी सिद्धीची आई शाळेत आली होती. त्या वेळी सिद्धीने आपल्या आईचे पाय धुतले होते. ते पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले होते. एकदा अभ्यास पूर्ण न झाल्याबद्दल खोटेच कारण सांगितले होते. तिचा तो खोटारडेपणा लवकरच उघड झाला. त्यामुळे सिद्धीला पश्चात्ताप झाला. पुन्हा कधीच खोटे बोलणार नाही. तुझा अपमान होईल, असे कधीच वागणार नाही, असा आईला विश्वास दिला आहे. सिद्धीने आपल्या आईवर छान कविता लिहिली आहे. 

एकदा सायकल चालवायला शिकताना सिद्धी पडली. त्यामुळे ती सायकल शिकायला घाबरत होती. 'पडल्याशिवाय सायकल शिकता येत नाही' असे सांगून आईने सिद्धीला धीर दिला. कारण सिद्धीच्या मनातील भीती घालवणे गरजेचे होते. पुन्हा न पडता सिद्धी सायकल चालवायला शिकली. हे सिद्धीच्या आईच्या पत्रावरून आपल्या लक्षात येते. याच पत्रात आई सिद्धीला वडीलधा-यांचा आदर करण्याची आणि सगळ्यांशी प्रेमाने वागण्याची शिकवण देते. सिद्धीसारखी सुंदर, हुशार आणि प्रामाणिक मुलगी दिल्याबद्दल आईने देवाचे आभार मानले आहेत. 

चौथीत शिकणाऱ्या कु. वेदिका रमेश जाधव हिची आई पुठ्ठ्याच्या कारखान्यात कामाला जाते, हे तिच्या पत्रावरून समजले. आपण एकदा आईला उलट बोललो, याचा तिला पश्चात्ताप होतो आहे. यापुढे आईला उलटून बोलायचे नाही, असे तिने मनाशी ठरवले आहे. आपला वाढदिवस साजरा केला जातो, पण आपली आई आणि पाटोळे सर यांचा वाढदिवस साजरा का केला जात नाही, हा प्रश्न तिला सतावतो आहे. वेदिकाने आय. पी. एस. व्हावे, हे तिच्या पप्पांचे स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार वेदिकाने केला आहे. 

आपला वाढदिवस का साजरा केला जात नाही, याचे उत्तर आईने आपल्या पत्रात दिले आहे. आईच्या लहानपणी सगळे आपापल्या कामात व्यग्र असत. तेव्हा खेड्यात वाढदिवस साजरा करण्याची पद्धत नव्हती आणि परिस्थितीही नव्हती. इतर लोक मुलगा व्हावा, म्हणून नवस करतात. वेदिकाच्या आजीने मुलगी व्हावी, म्हणून नवस केला होता. त्यामुळे वेदिका सगळ्यांची लाडकी होती. आईने वेदिकाला हट्टीपणा सोडण्याची सूचना केली आहे. 

चौथीत शिकणारी कु. सृष्टी राजेंद्र मस्कर हिला आपली आई आपल्या शिक्षणासाठी खूप झटते, याची जाणीव आहे. आर्थिक अडचणीवरून आपल्या आईवडलांची भांडणे होतात, हे ती रोज पाहते. म्हणून तिने आईच्या आधाराची काठी बनण्याची इच्छा आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. आपली आई राजकारणात गेली, तर लोकांसाठी चांगली कामे करू शकेल, असे सृष्टीला वाटते. एके दिवशी आपली आई आपल्या आजीला भांडली, हे मात्र सृष्टीला अजिबात आवडलेले नाही. त्याबद्दल तिने आपल्या पत्रात नाराजी व्यक्त केली आहे. या चुकीबद्दल आपले आईवर १०० टक्के नसून ९९ टक्के प्रेम असल्याचे तिने आईला स्पष्टपणे कळविले आहे. 

सृष्टीची आई एका कापड दुकानात कामाला जाते. रविवारची सुट्टी असल्यामुळे सृष्टी घरी असते, पण तिच्या आईला सुट्टी नसते. त्यामुळे तिला कामावर जावेच लागते. 'सुट्टीच्या दिवशी तू कामावर जाऊ नकोस', म्हणून सृष्टी रडायची. पण आईचा नाइलाज असायचा. राजकारणात जाणं हे आपलं काम नाही, असे आई सृष्टीला स्पष्टपणे सांगते. 

चौथीत शिकणारी कु. संस्कृती रवींद्र चौगुले हिचे दीर्घ पत्र वाचताना आपल्या काळजाला चरे पडतात. संस्कृतीचा जन्म तिच्या वडलांना आवडलेला नव्हता, कारण त्यांना मुलगा पाहिजे होता. त्यांना मुलगा का पाहिजे होता, हे मात्र संस्कृतीला समजलेले नाही. संस्कृतीची आई सविता ही तिची एकल पालक आहे. आई घटस्फोटित असल्यामुळे ह्या दोघीच मायलेकी एकमेकींना धीर देत राहतात. आईवडलांचा घटस्फोट झाला, हे बरे झाले, असे तिला वाटते. 'रोजची कटकट मिटली', ही तिची भावना आहे. आईवडलांच्या भांडणांमुळे संस्कृतीचे बालपण किती करपून गेले असेल, याची आपण कल्पना करू शकतो. आपल्याला वडलांचे प्रेम कधीच मिळाले नाही, ही तिच्या अंतरीची सल आहे. उपजीविकेसाठी गावाकडून मुंबईत आणि मुंबईतून पुन्हा गावाकडे असा ह्या मायलेकीचा जीवनसंघर्ष चालू आहे. एव्हाना आई हीच आपला पहिला गुरू आहे, हे संस्कृतीला समजलेले आहे. आईवडलांचा घटस्फोट कोवळ्या जीवांसाठी किती घातक ठरतो, हे ह्या पत्रातून जाणवते आणि मन पोकळ होते. 

संस्कृतीची आई सविता हिने तिच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. आईच्या आजारपणात मुलीला दूर ठेवावे लागले होते, याची खंत ह्या पत्रातून व्यक्त झाली आहे. शारीरिक आणि मानसिक छळाचा अतिरेक झाला, तेव्हा आईने नाइलाजाने घटस्फोट घेतला होता. सविता आणि संस्कृती ह्या मायलेकींचा पत्रसंवाद वाचकाला अस्वस्थ करून जातो. 

कु. निकिता धनंजय शिंदे हिने आपल्या पत्रात आईचा अपघात आणि आजोबांच्या निधनाच्या घटनेविषयी हळहळ व्यक्त केली आहे. ह्या संवेदनशीलतेबद्दल आईलाही तिचे कौतुक वाटते. आईने तिच्या पत्रात लिहिले आहे, जशी पृथ्वीवर झाडं महत्त्वाची आहेत, तशीच प्रत्येक घरात एक मुलगी असणं गरजेचं आहे. 

तिसरीत शिकणारी कु. कृष्णा अनिल शिंदे ही शिक्षणासाठी, तिच्या आजोळी समडोळीत राहते आणि तिची आई त्यांच्या गार्डी ह्या गावी राहते. इतक्या लहान वयात आईपासून दूर राहात असल्याने एकमेकींची आठवण होणे साहजिकच आहे. वास्तविक मायलेकींचा फोनवर संवाद होतो, पण पत्रात्मक संवादाची मजा काही औरच! एके दिवशी कृष्णाच्या घशात व्हिक्सची गोळी अडकली होती. आजीने तिच्या पाठीत बुक्क्या मारून ती गोळी बाहेर काढली. कृष्णाने तोच अनुभव आपल्या पत्रात कथन केला आहे. या घटनेतूनही तिचे शिक्षण झाले आहे. म्हणून ती लिहिते, 'असा प्रसंग पुन्हा कधी घडला, तर काय करायचं, ते मला कळलं आहे'. एक अनुभव हजार शब्दांपेक्षा प्रभावी असतो, असे म्हणतात, ते या अर्थाने! 

हल्ली टपालाने पत्रांचे चलनवलन कमी झाले आहे. कृष्णाने पाठविलेले पत्र घेऊन पोस्टमन काका खूप वर्षांनी तिच्या आईच्या घरी गेले. तेव्हा साहजिकच आईलाही आनंद झाला. कृष्णाला लिहिलेल्या पत्रात आईने सर्वांशी मिळून मिसळून प्रेमाने वागण्याचा सल्ला दिला आहे. अभ्यासाइतकीच ही गोष्टही महत्त्वाची आहे! 

पहिलीत शिकणारी कु. आरुषी अभिजीत कामू ही आपल्या आईला पत्र लिहिते, ही केवढी मोठी गोष्ट आहे! तिने आपल्या पत्रात समुद्रात बुडण्याचा प्रसंग वर्णन केला आहे. तिला लिहिलेल्या उत्तरात आई स्नेहलने हे प्रांजळपणे कबूल केले आहे, की तिला पहिली मुलगी झाली, तेव्हा खूप वाईट वाटले होते. कारण तिला पहिला मुलगा पाहिजे होता. पण आता तिची काहीच तक्रार नाही. आता ती आपल्या मुलीलाच मुलगा मानते. हा पत्रात्मक संवाद साधण्याची संधी मिळाली नसती, तर कदाचित आईच्या ह्या भावना मनातच राहून गेल्या असत्या. 

दुसरीत शिकणाऱ्या श्रावणीच्या आईचे शिक्षण कन्नडमध्ये झाल्यामुळे आपल्या मुलीचा अभ्यास घेता येत नाही, याची तिला खंत आहे. पण ती आपल्या मुलीसाठी मराठी शिकणार आहे. 

तिसरीत शिकत असलेल्या कु. आकांक्षा दगडू गवळी हिचा धाकटा भाऊ विजेचा शॉक लागून गेला. तो धक्का त्या कुटुंबासाठी किती जबरदस्त असेल, याची आपण कल्पना करू शकतो. आकांक्षाच्या पत्रात त्याचे पडसाद उमटले आहेत. चिमुरडी आकांक्षा पत्रातून धीर देत आपल्या आईला सावरण्याचा प्रयत्न करते आहे. विशेष म्हणजे आकांक्षाच्या पत्रामुळे आईलाही खूप धीर आला आहे. आई आकांक्षाला म्हणते, 'आता माझा मुलगाही तूच आणि मुलगीही तूच!' हे आहे पत्रात्मक संवादाचे सामर्थ्य! 

तिसरीत शिकणारी कु. आरोही नवनाथ तोडकर ही मूळची घालवाड ह्या गावची. पण तिला शिक्षणासाठी तिच्या आजोळी, म्हणजे समडोळीच्या शाळेत घातले आहे. ह्या शाळेत झालेली आपली प्रगती तिने आपल्या आईला पत्राद्वारे कळविली आहे. आपली आई जवळ नसल्यामुळे यंदा आरोहीने रंगपंचमी साजरी केलीच नाही. आरोहीने आपल्या शाळेतील विविध उपक्रमांविषयी लिहिले आहे. कोरोना काळातील शाळेविषयी लिहिले आहे. आपण वडलांना आदरार्थी बोलतो आणि आईला मात्र एकेरी संबोधतो, ही गोष्ट आरोहीला खटकते आहे. ती म्हणते, आईलाही आदरार्थी बोलले पाहिजे. आरोहीच्या मनातील ही समानतेची आणि आदराची भावना प्रशंसनीय आहे! 

नवीन शाळेमुळे आरोहीत झालेले बदल पाहून आई सुखावली आहे. आपण बालपणी ज्या शाळेत शिकलो, त्याच शाळेत आता आपली मुलगी शिकते आहे, याचा आनंद आहे. आरोहीची आई सावित्री, ही घालवाड ह्या गावची पोलीस पाटील आहे. आरोहीच्या लहानपणी कौटुंबिक अडचणींमुळे आपल्याला आरोहीचे फारसे लाड करता आले नाहीत, याची खंत त्यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. आपल्या माहेरची शाळा, आपल्या मुलीच्या अंगच्या सुप्त गुणांचा विकास करत असल्याबद्दल त्यांनी आपल्या पत्रात गौरवोद्गार काढले आहेत. 

चौथीत शिकणारी कु. भूमी प्रमोद देवर्षी हिला आपले पणजोबा स्वातंत्र्यसैनिक होते, याचा अभिमान वाटतो. आपल्या आईवडलांना आम्ही दोन्ही मुलीच असलो, तरी ते आमच्यावर प्रेम करतात, याचा तिला आनंद आहे. आपल्याला खाजगी शाळेत न टाकता जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकले, याचे तिला समाधान आहे. 

आपली मुलगी कु. भूमी ही कराटे ह्या खेळात प्रावीण्य मिळविते आहे, याचा तिच्या आईला आनंद आहे आणि अभिमानही! आपल्या कुटुंबाला स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा असल्यामुळे भूमीने आपल्या गावासाठी आणि देशासाठी काही तरी केले पाहिजे, असे भूमीच्या आईला वाटते. तुझ्या जन्मामुळे मी धन्य झाले, असे सांगायलाही आई विसरत नाही. अशा सांगण्यातून मुलीला जो विश्वास वाटतो, तो फार महत्त्वाचा असतो. 

दुसरीत शिकत असलेली कु. नर्वी गोविंद मस्कर हिला आपण जेवताना आईला फारच दमवतो, हीच भाजी पाहिजे, ती भाजी नको, असा हट्टीपणा करतो, याची जाणीव झाली आहे. असा हट्टीपणा न करण्याचे तिने मनोमन ठरविले आहे. तिने हा हट्टीपणा सोडला, तर आपल्याला आवडेल, असे तिच्या आईलाही वाटते. 

कु. राजनंदिनी अनिलकुमार जाधव ही आपल्या आईला एक नाजूक प्रश्न विचारते, 'आई, माझा जन्म झाला, तेव्हा तुला काय वाटलं? बाबांना, मामाला, काकीला, आबांना सगळ्यांना खूप आनंद झाला का गं?' तिला लिहिलेल्या पत्रात आईने म्हटले आहे, 'तुझ्या जन्माचा सगळ्यांनाच खूप आनंद झाला होता, म्हणूनच तर मोठं बारसं केलं होतं. राजनंदिनी हे नाव मी आधीच ठरवून ठेवलं होतं'. 

सगळ्यांनी आपल्या जन्माचे स्वागत केले, हा विश्वासही बळ देणारा असतो. 'तू माझ्यासाठी खास आहेस', हे वाक्य हिंमत वाढवणारे असते. राजनंदिनीच्या आईने याच वाक्यात तिचा विश्वास वाढवला आहे. 

कु. स्वरा महेश पाटील हिला जितकी आई आवडते, तितकीच शाळा आवडते. स्वराची शाळा म्हणजे शैक्षणिक राजवाडा आहे, असे तिच्या आईला वाटते. आपल्या घरात भांडण झाल्यामुळे आपली शाळा चुकत होती, हे कु. प्राप्ती संदेश देसाई हिने बिनधास्तपणे लिहिले आहे. तरीसुद्धा आपलं एकत्र कुटुंब टिकलं पाहिजे, असं तिला मनापासून वाटतं. 

पहिल्या दिवशी आपली आई एकटीला शाळेत सोडून गेली होती. तो पहिला दिवस कु. निधी अमित पाटील हिला आजही आठवतो. 

कु. रूपल राकेश उपाध्ये, कु. वेदिका विक्रम लोंढे, कु. आसिया महमद हनीफ मुजावर, कु. विजया प्रकाश कट्याप्पा, कु. अधिरा अभिजीत पाटील, कु. भूमी संदेश पाटील, कु. राजनंदिनी जितेंद्र कोरे, कु. गार्गी राहुल टिंगरे, कु. भार्गवी नितीन ओतारी ह्या विद्यार्थिनींची आणि त्यांच्या मातांची पत्रं आटोपशीर असली, तरी भावनेने ओथंबलेली आहेत. भूमीला लिहिलेल्या पत्रात तिच्या आईने तिचा स्वभाव चिडचिडा झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तिला स्वभावात बदल करण्याची सूचना केली आहे. 

कु. राजनंदिनी जितेंद्र कोरे हिच्या आईने आयुष्यात कधीच पत्र पाहिले नव्हते, वाचले नव्हते आणि लिहिलेही नव्हते. आपल्या लेकीमुळे आयुष्यात पहिल्यांदाच पत्र वाचण्याची आणि लिहिण्याची संधी मिळाली, याचा आनंद ह्या मातेने व्यक्त केला आहे. आमच्या मुलींमुळे आम्हालाही शाळेकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, असे यापैकी अनेक मातापालकांनी लिहिले आहे. ह्या पत्रांनी ग्रामीण स्त्रीजगताचे सगळे अंधारे कोपरे उजळून काढले आहेत. 

आचार्य विनोबा भावे यांनी एकदा म्हटले होते, की गावची शाळा घराघरांत पोहोचली पाहिजे आणि प्रत्येक घर शाळेत पोहोचले पाहिजे. ह्या विधानातून त्यांना गाव आणि शाळेची एकरूपता आणि समरसता अपेक्षित होती. समडोळी गावाने आणि गावच्या शाळेने विविध उपक्रमांच्या माध्यमातून विनोबाजींचे हे स्वप्न साकार केले आहे. सांगली महानगरात राहणारे पालकही आपल्या पाल्यांना ह्या खेड्यातल्या शाळेत प्रवेश देतात, हे वाचल्यावर वाचकांनाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 

आई आणि मुलीचे नाते कितीही जवळचे असले, तरी कधीकधी शाब्दिक खटके उडणे स्वाभाविक आहे. मुलीने आईला आणि आईने मुलीला समजावून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली, ही ह्या उपक्रमाची पहिली फलश्रुती म्हटली पाहिजे. आई आपल्या भल्यासाठीच रागावते, हे यातील बहुसंख्य मुलींना आता समजले आहे. मुलींचा मोबाईलचा वापर कमी झाला आहे. मुलींची अभ्यासातील गती वाढली आहे. मुलीविषयी सारखी तक्रार करणारी आई आता आपल्या मुलीचे तोंडभरून कौतुक करते आहे. कारण ह्या उपक्रमाने मायलेकींच्या नात्यात सुसंवादाचा मजबूत पूल बांधला आहे. दोघींनाही आत्मपरीक्षणाची संधी मिळाली आहे. प्रत्येक लेकीच्या पत्रांत आपल्या आईबद्दलचा अभिमान व्यक्त झाला आहे. यातून दोघींच्याही अंतःकरणाचे अनेक हळवे कोपरे उजागर झाले आहेत. आईविषयी लिहिताना मुलीला आणि मुलीविषयी लिहिताना आईला शब्दांचे थिटेपण जाणवते आहे, ही गोष्ट फारच मौलिक आहे. अभिव्यक्ती, गुणसंवर्धन आणि मूल्यशिक्षण ह्या तिन्ही अंगांनी विचार केल्यास हा उपक्रम सर्वार्थाने फलद्रूप झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे कृतज्ञता ह्या मूल्याचे दृढीकरण झाले आहे. 

ह्या पुस्तकातील बहुसंख्य मुली आणि त्यांच्या माता ह्या ग्रामीण भागातील, समाजाच्या अतिसामान्य वर्गातील आणि कष्टकरी कुटुंबातील आहेत. जवळजवळ सर्वच विद्यार्थिनींच्या आणि त्यांच्या आईंच्या पत्रांत पाटोळे सरांचा आणि इतर शिक्षक-शिक्षिकांचा आदरपूर्वक उल्लेख आलेला आहे. सरांमुळे आमच्या मुलींच्या सुप्त गुणांचा विकास झाला, याबद्दल पालकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

ह्या पत्रांतून मुलींनी प्रांजळपणे आपल्या चुका कबूल केल्या आहेत. यापुढे अशा चुका न करण्याची खातरी दिली आहे. हा पत्रात्मक संवाद म्हणजे मायलेकींच्या खोल नात्याचा घेतलेला नितांत सुंदर शोध आहे. हा पत्रात्मक संवाद म्हणजे परस्परांसमोर दिलेला गतआयुष्याचा कबुलीजबाब आहे आणि भावी आयुष्यासाठीचा वचननामाही आहे. कन्नडमधून शिकलेल्या आईला मराठी शिकण्याचा विश्वास ह्या उपक्रमाने दिला आहे. अंतिमतः ह्या उपक्रमाने आनंदनिर्मिती साधली आहे. 'आनंदाचे डोही आनंदतरंग' ही ह्या उपक्रमाची सगळ्यात मोठी फलनिष्पत्ती आहे! एक आगळावेगळा उपक्रम कार्यान्वित केल्याबद्दल शाळेतील सर्व शिक्षक, मातापालक आणि विद्यार्थिनी अभिनंदनास पात्र आहेत. 


'मायलेकींचा पत्रसंवाद' (पत्रलेखन) 

संपादक : कृष्णात पाटोळे 

प्रकाशक : सायास पब्लिकेशन, नांदेड. 

मुखपृष्ठ : विजयकुमार चित्तरवाड 

पृष्ठे १४४        किंमत रु. २२०

डॉ. सुरेश सावंत,

मथुरेश बंगला, क्र. १. १९. २२०,

राज मॉलच्या पाठीमागे,

आनंदनगरजवळ,

शितलादेवीच्या मंदिरासमोर,

शाहूनगर, नांदेड ४३१ ६०२.

भ्र. ८८०६३८८५३५, ९४२२१७०६८९.

sureshsawant2011@yahoo.com

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group