युवतीच्या गुप्तांगातून स्वॅब घेऊन कोरोना टेस्ट करण्याचा निंदनीय प्रकार महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्यावर गुन्हा दाखल

 

मुंबई - संपूर्ण जगात कोरोनाचे थैमान असताना जगात कुठेच घडला नाही असा मानवतेला काळिमा फासणारा, युवतीच्या गुप्तांगातून स्वॅब घेऊन कोरोना टेस्ट करण्याचा निंदनीय आणि अश्लाघ्य प्रकार बडनेरा येथे घडला. या घटनेतील पीडितेला न्याय मिळावा म्हणून अमरावती-बडनेरा येथे भेट देणाऱ्या भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्रीमती. चित्राताई वाघ यांच्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचा भाजपा प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी एका पत्रकाद्वारे निषेध केला आहे.श्री. कुळकर्णी यांनी पत्रकात म्हटले आहे की, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चालविला आहे. महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यात महाविकास आघाडी सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. राज्यभरात लहान मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत सर्व वयोगटाच्या महिलांवर होणाऱ्या गंभीर स्वरूपाच्या अत्याचाराची प्रकरणे वाढली आहेत. महिलांना न्याय मिळावा म्हणून राज्यभर भाजपाची महिला आघाडी आणि प्रामुख्याने चित्राताई वाघ यांनी प्रत्येक घटनास्थळावर जाऊन पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभारला आहे. कोरोना काळात बडनेरा येथे घडलेल्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. चित्राताई वाघ यांनी अमरावतीत येऊन पीडितेला न्याय मिळावा म्हणून आवाज उठवला होता. खरे पाहता, या प्रकरणाचे गांभीर्य पाहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः घटनास्थळावर येणे क्रमप्राप्त होते. अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर स्वतः महिला असूनही त्यांनी पीडितेला भेटण्याचे सौजन्यही दाखवले नाही. उलट पीडितेला धीर देणाऱ्या चित्राताई वाघ यांच्यावर काही महिने उलटून गेल्यावर बडनेरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

राजकीय सूडबुद्धीने गुन्हे दाखल करण्यासाठी कुठलेच कारण आढळले नाही म्हणून कोरोनाच्या नियमांचा भंग केल्याचे निमित्त पोलिसांनी समोर केले आहे. महाविकास आघाडी सरकारने सर्वच पातळींवर अशीच मुस्कटदाबी चालवलेली आहे. या शासना विरुद्ध कोणी ब्र काढला की त्यामागे पोलिसांचा ससेमिरा लावण्याची दडपशाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. चित्राताई वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करणे आणि त्यांनी तात्काळ न्यायालयासमोर हजर राहण्याचे समन्स बजावणे हा या दडपशाहीचाच भाग असल्याचे स्पष्ट करून शिवराय कुळकर्णी यांनी निर्लज्ज आघाडी सरकारचा निषेध केला आहे.टिप्पण्या