स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र संकुलाचे संचालक तथा वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.डी. एम.खंदारे दि.३१ डिसेंबर २०२५ रोजी आपल्या प्रदीर्घ यशस्वी सेवेनंतर नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवन कार्याचा घेतलेला एक आढावा.
डॉ.डी.एम.खंदारे यांचा प्रस्तुत लेखकाशी पहिला संपर्क हा यशवंत महाविद्यालयामध्ये १९९४- ९५ मध्ये एम. कॉम. प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्यानंतर झाला. ते एम.कॉम.प्रथम वर्षाचे गुरु होते. त्यांनी आम्हाला शिकवत असताना आमची नजर त्यांच्या बोटे नसलेल्या दोन्ही हाताकडे गेली आणि आम्हाला फार वाईट वाटले. साहजिकच आमची उत्सुकता वाढली की, सरांच्या हाताची बोटे अपघाताने गेली का जन्मतः नव्हती? त्याबद्दल आम्ही त्यांना उत्सुकतेपोटी विचारले तेव्हा त्यांनी जीवनकथा सांगितली. सर म्हणाले की, माझी आर्थिक परिस्थिती फार हालाखीची होती. मला शिक्षणासाठी पैसे तर नव्हतेच; पण उदरनिर्वाहासाठीही नव्हते. त्यामुळे मला एम.कॉम.चा अभ्यास करत असताना एमआयडीसी मध्ये एका कारखान्यात काम करण्यासाठी जावे लागत होते. दिवसा कारखान्यात काम आणि रात्री अभ्यास व सायकलवरून दहा ते पंधरा किलोमीटर महाविद्यालयात तासिका करण्यासाठी ये-जा करणे, अशा प्रकारची दिनचर्या चालू होती. पण एके दिवशी रात्रीची झोप असल्यामुळे दुर्दैवाने माझे दोन्ही हात कारखान्यात काम करताना यंत्रामध्ये गेले व दोन्ही हाताची सर्व बोटे तुटून गेली; मात्र सुदैवाने माझा जीव वाचला.
सरांचा जीवन संघर्ष बघून आम्हाला फार हळहळ वाटली आणि कमाल या गोष्टीची वाटली की, सरांच्या हाताला एकही बोट नसताना हाताचा पंजाचा वापर करून फलक लेखन व हस्तलेखन करण्यामध्ये कधीही आळस करायचे नाही. त्यांची प्रचंड मेहनत, जिद्द, प्रामाणिकपणा व गुणवत्ता विचारात घेऊन श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या यशवंत महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्रद्धेय डॉ. शंकररावजी चव्हाण साहेबांनी त्यांची अधिव्याख्याता म्हणून १७ ऑगस्ट १९८८ रोजी निवड केली.
डॉ. खंदारे यांचा जन्म ४ डिसेंबर १९६५ रोजी बनचिंचोली, ता. हदगाव, जि. नांदेड येथे झाला . त्यांचे प्राथमिक शिक्षण बनचिंचोली, माध्यमिक शिक्षण हदगाव व उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण यशवंत महाविद्यालयामध्ये पूर्ण केले. त्यांनी १९८६ मध्ये बी.कॉम., १९८८ मध्ये एम.कॉम., १९९३ मध्ये एम.फील. व २००२ मध्ये पीएच.डी.ची पदवी संपादन केली.
त्यांनी यशवंत महाविद्यालयामध्ये १९८८ पासून २००३ पर्यंत सलग यशस्वीपणे सेवा पूर्ण केल्यानंतर त्यांची मेहनत व जिद्दीच्या जोरावर ते दि.१९ नोव्हेंबर २००३ रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये प्रपाठकपदी रुजू झाले. त्यांनी एकूण ३७ वर्ष सेवा यशस्वीपणे पूर्ण केली व त्यांच्या सेवाकालात प्रपाठक, प्राध्यापक व वरिष्ठ प्राध्यापक अशा सर्व प्रकारच्या पदोन्नती शैक्षणिक आणि संशोधकीय योगदानाधारे प्राप्त केल्या. तसेच त्यांनी विद्यापीठातील विविध पद व जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, विद्या परिषदेचे सदस्य, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, वाणिज्य व्यवस्थापनशास्त्र संकुलाचे संचालक, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता, अशा आणि इतर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावर यशस्वीपणे काम केले.
मी विद्यापीठाच्या विद्या परिषदेवर काम करताना किंवा त्यांच्यासोबत सहयोगी अधिष्ठाता म्हणून काम करताना मला त्यांच्या अनेक पैलूंचा उलगडा झाला. ते एक अत्यंत विद्यार्थीप्रिय, शिस्तप्रिय, मेहनती, मनमिळाऊ, सामंजस्य, धर्मनिरपेक्ष, संवेदनशील, सकारात्मक व समायोजित व्यक्तिमत्व असून कोणतेही कार्य सहजतेने आणि सकारात्मकरित्या पार पाडण्याची त्यांची भूमिका राहिली होती. कोणताही निर्णय घेताना वरिष्ठासोबतच सहकाऱ्यांनापण विचारात घ्यायचे. कोणतीही समस्या कशा पद्धतीने हाताळली पाहिजे, याचे तंत्र त्यांच्याकडे होते.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास २९ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली, १५ विद्यार्थ्यांनी एम.फिल. पदवी प्राप्त केली व ४ जण सध्या पीएच.डी. संशोधन कार्य करीत आहेत.
सरांचे १०० पेक्षा जास्त शोधनिबंध अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये व जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय परिषदांमध्ये व कार्यशाळेमध्ये भाग घेतला व १०० पेक्षा जास्त शोधपत्रिका सादर केल्या.
त्यांची आजपर्यंत १२ विविध विषयावरील पुस्तके प्रकाशित झाली. त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये अध्यक्ष व संसाधन व्यक्ती म्हणून काम केले.
त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना आजपर्यंत पंधराहून अधिक विविध क्षेत्रातील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विविध समित्यावर यशस्वीरित्या काम केले.
आपल्या विद्यापीठासोबतच महाराष्ट्रातल्या इतर विविध विद्यापीठांमध्येही त्यांनी विविध प्राधिकरणावर कार्य केले. विविध विद्यापीठाच्या कुलगुरूपद निवड यादीमध्ये अंतिम पाचमध्ये येण्याची त्यांना पाचवेळा संधी प्राप्त झाली.
दि.३१ डिसेंबर २०२५ रोजी विद्यापीठाचे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता व विद्यापीठाच्या वाणिज्य व्यवस्थापनशास्त्र संकुलाचे संचालक म्हणून सेवानिवृत्त होत आहेत.
डॉ.डी.एम.खंदारे यांचे सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य सुखी, समाधानी, आनंदी, आरोग्यदायी जावो, ही सदिच्छा!
-डॉ.हरिश्चंद्र पतंगे,
उपप्राचार्य,
यशवंत महाविद्यालय नांदेड.

addComments
टिप्पणी पोस्ट करा