सर्वसाधारणपणे प्रागतिक विचारांचं अमूर्त चिंतन करणारा व्यक्ती म्हणजे प्राध्यापक आणि वर्तमानाविषयी प्रखर भान, आकलन आणि हस्तक्षेप असा कार्यकर्त्याचा अर्थ सांगितला जातो. म्हणजेच प्राध्यापक आणि कार्यकर्ता या मानवी जीवनातील दोन वेगवेगळ्या अवस्था अथवा मन:प्रवृत्ती आहेत. या दोन्ही मन:प्रवृत्तींची भूत,वर्तमान आणि भविष्यासंबंधीची आपापली काही मते व भूमिका असते हे खरे असले तरी पहिल्या मनःप्रवृत्तीचा आपली मते व भूमिका याविषयी थेट हस्तक्षेप नसतो. वर्तमानकालीन प्रश्नांबाबत रजा घेऊन खिन्न मानसिकतेत आकाशाकडे पाहत जगणारी ही निष्क्रिय, निराशावादी, दुःखी प्रवृत्ती असते. त्यामुळेच अशा प्रवृत्तींच्या लोकांना निष्क्रिय क्रांतिकारक (Passive Revolutionar) असे म्हटले जाते. याउलट दुसऱ्या म्हणजे कार्यकर्ता मनःप्रवृत्तीचे असते. कार्यकर्त्यांची मनःप्रवृत्ती ही विचाराला अर्थपूर्ण कृतीची जोड देणारी असते. कृतिशील विचारातच प्रबोधनाची, क्रांतीची बीजे दडलेली असतात म्हणून ही प्रवृत्ती नेहमी अन्यायविरुद्ध पेटून उठते. त्यांच्या जीवितकार्याचा प्रवास हा सुधारणावादापासून (Reformation) बंडखोरीपर्यंत (Rebellion) आणि बंडखोरीपासून क्रांतीपर्यंत (Revolution) असतो. म्हणूनच अशा प्रवृत्तीच्या लोकांना सक्रिय क्रांतिकारक (Active Revolutionar) असे म्हटले जाते. डॉ. गौतम दुथडे यांच्या व्यक्तिमत्त्वातून एकाच वेळी प्राध्यापक व कार्यकर्ता अशा दोन्ही प्रकारच्या मनःप्रवृत्ती अभिव्यक्त होताना दिसतात.
शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या यशवंत महाविद्यालयातील डॉ. गौतम दुथडे यांचं आयुष्यही प्राध्यापक कार्यकर्ता यांच्या दृष्टीने अतिशय आशयघन असेच आहे. साधारणतः विज्ञान शाखेतील अतिशय अवघड व रुष्ठ समजल्या जाणाऱ्या भौतिकशास्त्राचे काही प्राध्यापक इतर विषयांच्या प्राध्यापकांच्या बाबतीत तत्वश: वरिष्ठ ( Entrenched) असल्याची भूमिका घेताना दिसून येतात. परंतु डॉ. गौतम दुथडे हे याला अपवाद आहेत. आपण प्राध्यापक आहोत यापेक्षाही आपण प्रथम 'माणूस' आहोत ही बाब अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे माणसाचा माणसाशी माणसासारखा व्यवहार असला पाहिजे ही डाॅ. गौतम दुथडे यांची भूमिका सर्वसमावेशी असल्याची साक्ष देते. म्हणूनच त्यांची सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक अशा विविध प्रश्नावरील थेट भूमिका आणि हस्तक्षेप सर्वांनाच अचंबित करणारा आहे. एका खाजगी संस्थेत प्राध्यापक म्हणून काम करताना व्यवहारश: लोकप्रबोधनाच्या कृतीत जोखीम असते, याची जाणीव असतानाही डॉ. गौतम दुथडे यांनी हे काम विनातक्रार शिरावर घेतले.
भारतासारख्या वर्णवर्चस्ववादी विचारव्यूहातून निम्नस्तरीय लोकांना बाहेर काढण्यासाठी पराभूत मानसिकतेच्या हुतात्म्यांची नव्हे तर क्रान्तिकारी लोकशिक्षकाची आवश्यकता आहे, अशी फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या मुशीत तयार झालेल्या डॉ. गौतम दुथडे यांची सुरूवातीपासूनच ठाम भूमिका राहिलेली आहे. आधुनिक भारतीय राष्ट्रीयत्वाचा विचार हा हिंदूधर्माधारित 'असत्' तत्त्वावर अधिष्ठित नसून तो बौद्ध संस्कृतीनिष्ठ 'सत्' तत्त्वावर अधिष्ठित आहे. म्हणूनच भारतीय राज्यघटनेत जातिभेद, लिंगभेद, वर्णभेद, वंशभेद यांना मान्यता नाही. मौलिक लोकशाहीचा (Radical Democracy) भारतीय प्रतिदर्श (Model) म्हणून तो आपल्यापुढे आहे व तोच आपण सर्वांनी मान्य केला पाहिजे ही डॉ. दुथडे यांची भूमिका विलक्षण मानुषी अशीच आहे. मूलतः आधुनिक भारतीय राजकीय संस्कृती ही बौद्ध संस्कृतीचे विकसित रूप आहे. म्हणून या संस्कृतीच्या उत्कर्षासाठी, संरक्षणासाठी धार्मिक अलगत्वाची (Cynicism) नव्हे तर बुद्धप्रणीत पारमितेची ( सार्वभौम मैत्री) अनिवार्यता आहे. तथापि सामंती, खुरट्या मानसिकतेच्या लोकांनी भारतात बुद्धप्रणीत पारमितेचा अवकाश कधी रुंदावूच दिला नाही. तो रुंदावला जावा व येथील दुर्बल, स्खलनशील, गरिब अशा सगळ्याच प्रकारच्या लोकांना आपली प्रतिष्ठा अबाधित ठेवता यावी, प्रत्येकाला सामाजिक, राजकीय व आर्थिक विकासाच्या समान संधी, शिक्षण- प्रशिक्षण, गुणवत्तेला वाव, कामाची व उत्पन्नाची हमी आणि आरोग्याच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात म्हणून कार्यकर्ता प्राध्यापक अशी ओळख असलेल्या डॉ. गौतम दुथडे यांना आपल्या हयातीत अनेक लढे उभारवे लागले, आंदोलने करावी लागली, अनेक मोर्च्यांचे नेतृत्व करावे लागले. त्यांच्या अशा बंडखोर, विद्रोही, क्रांतिकारी जीवनाची सुरुवातच विद्यार्थी दशेपासून झाली हे विशेष.
नामांतर आंदोआंदोलनातील त्यांचा सहभाग अत्यंत विस्मयकारक असाच आहे. नामांतर आंदोलन हे डाॅ. गौतम दुथडे यांच्या विद्यार्थीदशेत उभे राहिलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे संवेदनशील असे सामाजिक आंदोलन होते. या आंदोलनाने पुरोगामी महाराष्ट्राची वीण पुर्णत: विस्कटून गेली होती. दलित विरुद्ध सवर्ण यांच्यात एक प्रकारे स्थानाची लढाई (Status of war) सुरु झाली होती. विशेष हे की, नामांतराचा हा लढा सवर्णांच्या विरोधी अजिबात नव्हता. दलितांच्या अस्मितेचा व अस्तित्वाचा लढा होता तरीही शतकानुशतके सवर्णांनी केलेल्या दडपशाहीचा तीव्र अनुभव या आंदोलनाच्या वेळी येत होता. पुरोगामी धाटणीचे अपवाद वगळता बाकी दांभिक सवर्णांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचाच नव्हे तर प्रतीकांचा ही यावेळी तिटकारा वाटू लागला होता. शोषित वर्गाने पर्यायी धुरीणत्व (Counter hegemony) निर्माण करावे व पर्यायी धुरीणत्वांनी स्वतःची नवी संस्कृती, नवे विचार, नवी मूल्य, नवे तत्वज्ञान विकसित करावे ही गोष्टच शासक वर्गाला पटत नव्हती. दलित विरुद्ध सवर्ण यांच्यातील सांस्कृतिक संघर्ष या आंदोलनाच्या निमित्ताने अगदी चरमसीमेवर पोहोचला होता. त्यातून महाराष्ट्रात गावोगावी दलितांवर अत्याचाराचे सत्र सुरू झाले होते. सवर्णांच्या ठेवणीतील सामाजिक बहिष्काराच्या अस्त्राने उभी माणुसकी ओशाळी होती. शूद्राबरोबर सवर्णांच्या भेदभावपूर्ण वागण्याच्या विषारी रोगाने एके दिवशी टोक गाठले. डाॅ. गौतम दुथडे हे ज्या शाळेत समतेचे, ममतेचे, बंधुत्वाचे धडे गिरवत होते. त्याच गौर ता. पूर्णा येथील प्राथमिक शाळेत सवर्णवादाच्या विषारी फुत्काराने शाळेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची सर्वांसमक्ष तोडफोड केली व पुढे ती जाळूनही टाकली. परंतु शाळेतील कोणत्याही शिक्षक, कर्मचारीवर्गाची या विषारी हिंसक फुत्काराला अटकाव करण्याची हिंमत झाली नाही. कोवळ्या मनाची शाळेतील मुले या घटना प्रसंगाने भयभीत झाली होती. अशावेळी त्याच शाळेत शिकणारा गौतम दुथडे नावाचा एक अवलिया मोठ्या हिमतीने व धैर्याने पुढे येतो व घडलेल्या घटनेची पोलिसात निर्भीडपणे साक्ष देतो. अर्थात या सर्व प्रकरणात त्यांना परिवाराचीही भक्कम साथ होती हे वेगळे न सांगणे नको. सबब दुथडे यांच्या अशा कणखर कृतीमुळे समाजकंटकांना पुढे शिक्षाही होते ही गोष्ट अलहिदा !
ज्या महामानवाने येथील सवर्णांसह सर्वच जातिधर्मातील पीडित स्त्री-पुरुषांना जगण्याचा हक्क दिला. त्यांना माणूसपण बहाल केले. त्याचं हे माणूसपण अबाधित राहावं म्हणून अतिव संघर्षातून लोकव्यवस्था कायम केली. त्या महामानवाचं म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्याविषयी येथील बहुसंख्य सामंती सवर्ण लोक कमालीचे उदासीन होते, राज्यसंस्थेचा दृष्टिकोनही वरपांगी अनुकूल वाटत असला तरीही तो प्रतिकूल असाच होता. अशाही परिस्थितीत डॉ. गौतम दुथडे हे कसल्याही परिणामाची चिंता न करता अगदी विद्यार्थीदशेतच मैदानात उतरले. गावकुसातील हे आंदोलन भरकटू नये म्हणून त्यांनी सार्वजनिक मताचे (Public opinion) धुरीणत्व स्वीकारले आणि सार्वजनिक अवकाश (Public sphere) भरून काढला, यावरून अगदी कमी वयातही डॉ. गौतम दुथडे यांचे सामाजिक भान किती प्रखर होते, याची प्रचिती येते.
ॲरिस्टॉटल यांनी उत्तम नेतृत्वासाठी सांगितलेले Ethos (सामाजिक भावनिष्ठा), Pathos (कारुण्य) आणि Logos (शब्दशक्ती) हे गुण डॉ. गौतम दुथडे यांच्या अंगी उपजतच असल्यामुळे त्यांनी लवकरच आपला राजकीय व सामाजिक अवकाश विस्तारण्यास सुरू केला. विद्यार्थी जीवनात त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नावर ठोस भूमिका घेत अंत:प्रेरणेतील धुरीणत्वाची ज्योत पेटती ठेवली. पुढे १९८९- ९० च्या काळात राजकीय पटलावर प्रभाव गाजवणाऱ्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत समाजवादी संस्कृती शिरोधार्य मानणाऱ्या तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग व केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या सामाजिक न्यायाच्या भूमिकेकडे आकर्षित होऊन डॉ. गौतम दुथडे यांनी जनता दलास केवळ एक राजकीय पक्ष न मानता त्याकडे सामाजिक न्यायाची चळवळ म्हणून बघितले व या पक्षात काम करण्यास सुरुवात केली. पक्षातील पडेल ते काम नेटाने करण्याच्या कर्मनीतीने (Works Ethics) लवकरच त्यांच्या धुरीणत्वाला स्पेस मिळाला. १९९२ साली त्यांच्याकडे नांदेड जिल्हा युवा जनता दल अध्यक्षपदाची जबाबदारी आली व त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. १९९६ साली त्यांची राज्य युवा जनता दल महासचिवपदी व पुढे जनता दल राज्यकार्यकारणी सदस्यपदी निवड झाली. आपल्या राजकीय कार्यकाळात त्यांनी सार्वजनिक जीवनातील निष्पृह व्यक्तिमत्व असलेले मा. सदाशिवराव पाटील, माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे, माजी आ. गंगाधर पटणे, अॅड. एल. बी. देशमुख, गोवर्धन डोईफोडे यांच्या मार्गदर्शन व सहकार्यांने बेरोजगार युवक, विद्यार्थी, शेतकरी-शेतमजूर, महिला, कामगार व अल्पसंख्यांकांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने अनेक आंदोलने, मोर्चे, मेळावे व कृती कार्यक्रम यशस्वी केले. डॉ. गौतम दुथडे हे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असल्याने त्यांना सार्वजनिक अवकाशाचं गतीशास्त्र चांगलंच अवगत आहे. सार्वजनिक मत घडवण्यात, त्याला हवं ते वळण देण्यात डॉ. दुथडे यांना तोड नाही. त्यांच्या आक्रमक, भेदक उपरोधिक, तिरकस, खोचक, व्यंगात्मक, बिनतोड आणि विद्वत्तप्रचूर भूमिकेपुढे अनेकांना नमते घ्यावे लागले. तथापि अशा प्रकारच्या कार्यशैलीमुळे डॉ. गौतम दुथडे यांना याची जबर किंमतही मोजावी लागली. परंतु ते अजिबात डगमगले नाहीत. जनता दलाची शकले पडल्यानंतर त्यांना सत्तेच्या मार्गाने जाण्याचे अनेक पर्याय उपलब्ध होते. परंतु डॉ. गौतम दुथडे यांनी आपल्या विचाराशी तडजोड न करता स्वतःला समाजकार्यात झोकून दिले. सत्तेच्या साठमारीत सर्वस्व पणाला लावणाऱ्या आजच्या युगात म्हणूनच डॉ. गौतम दुथडे यांचे वेगळेपण अधिक उठून दिसते. डॉ. गौतम दुथडे यांचा जीवनप्रवास आज साठीकडे कलला आहे, तरी त्यांचा सार्वजनिक वावर तरुणांना लाजवेल असा चिरतरुण आहे. समाजात कुठे अन्याय झाला की ते अगदी त्वेषाने पेटून उठतात. त्यांनी अन्यायाच्या विरोधात शस्त्र उपसले की, हाती घेतलेले प्रकरण तडीस जाईपर्यंत ते स्वस्त बसत नाहीत म्हणून आजही प्रस्थापित व्यवस्थेचा थरकाप उडतो. सत्तेपासून दूर राहून सत्तेला प्रश्न विचारण्याची, व्यवस्थेला भिडण्याची जी नैतिक ताकद डॉ. दुथडे यांच्याकडे आहे तशी नैतिक ताकद असलेले प्राध्यापक कार्यकर्ते आज किती आहेत हा खरा प्रश्न आहे.
डॉ. गौतम दुथडे यांची जीवनशैली एकदम सरळ व साधी आहे. त्यांना कुठलीच महत्त्वाकांक्षा नाही. म्हणूनच सामाजिक बांधिलकीचे एवढे मोठे गाठोडे सोबतीला असूनही ते प्रसिद्धीपासून कोसो दूर राहिले. निर्मोही मनाचा कर्मयोगी म्हणूनच त्यांची सर्वदूर ख्याती आहे. कोणत्याही जाती धर्मातील सामान्य माणसाशी त्यांचा व्यवहार हा अत्यंत प्रेमळ व आपुलकीचाच असतो. म्हणूनच विविध जाती धर्मातील गोरगरीब लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी त्यांचे अतिशय स्नेहाचे व जिव्हाळ्याचे संबंध आहेत. विशेष हे की, डॉ. गौतम दुथडे यांची वैचारिक जडणघडण फुले-शाहू-आंबेडकरी संस्कारातून झाली असल्यामुळे त्यांची समाजवादावर अतूट निष्ठा आहे. म्हणूनच अडचणीत सापडलेल्या लोकांना नि कार्यकर्त्यांना ते सढळ हाताने नेहमीच मदत करतात. अशी मदत करताना समोरचा व्यक्ती कोणत्या जातीचा, धर्माचा आहे असा ते कधीच विचार करत नाहीत, त्यांचा तो स्वभाव गुणधर्म नाही. 'सेवा परमो धर्म' हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा 'गुरुत्वमध्य' असल्यामुळे त्यांना भेटणारी प्रत्येक व्यक्ती आपोआपच त्यांच्याकडे आकर्षिली जाते व त्यांच्या विचारानुसार वाटचाल करण्याचा प्रयत्न करते. एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने आणि सामाजिक बांधिलकीने अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली, अनेक कार्यकर्ते घडविले. जे घडले त्यांच्या खांद्यावर त्यांनी सुधारणावादी परिवर्तनाची पताका दिली.
एकंदर मनुष्य आणि सामाजिक संस्थांचा विकास बाह्यगतीपेक्षा अंतर्गत गतीशास्त्राने होणे अधिक चांगले. मानवाचा आत्मिक विकास हीच स्वावलंबनाची, स्वातंत्र्याची पहिली पायरी असते, असं सांगणारा भौतिक शास्त्राचा प्राध्यापक नियत वयोमानानुसार ३१ डिसेंबर २०२५ रोजी सेवानिवृत्त होत आहे. तथापि येथून पुढच्या काळात जाती आणि धार्मिक भावनांचं संस्थीकरण यांच्यातील 'नेक्सस' दूर करण्यासाठी आवश्यक असलेले त्यांचे कार्यकर्त्यांचे जीवन दीर्घायुषी व आरोग्यदायी जावो हीच आम्हा परिवर्तनवादी चळवळीच्या तमाम कार्यकर्त्यांची सदिच्छा !
डॉ. आर. डी. शिंदे सोनखेड
मो. ९४२१३७९१६७

COMMENTS