स्वाती मदनवाड यांची स्वत्वशोधाची कविता : 'असोशी' डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

नांदेडच्या यशवंत महाविद्यालयातील इंग्रजीच्या प्राध्यापिका स्वाती मदनवाड यांचा 'असोशी' हा कवितासंग्रह 'काव्याग्रह'ने नुकताच प्रकाशित केला आहे. 'असोशी'मधील कविता 'शब्द उमलता', 'तू आणि मी', 'आक्रोश', 'एकटेपण', 'स्वत्व', 'असोशी' आणि 'अरण्यका' ह्या सात विभागरूपी पाकळ्यांतून फुलून आली आहे. हे म्हटले तर कवितेचे विभाग आहेत आणि म्हटले तर कवितेच्या विकासाचे आणि कवयित्रीच्या भावावस्थेचे व काव्यजाणिवेचे टप्पे आहेत. उमलत्या वयात शब्दही उमलू लागतात. दोन जीवांमधील आकर्षण वाढण्याचे ते वय असते. पण सगळेच मनासारखे घडते, असे नाही. मनासारखे घडत नसताना, मनाविरुद्ध तडजोडी करताना आक्रोश होणे स्वाभाविक आहे. जेव्हा आक्रोश टिपेला जातो, तेव्हा एकटेपण स्वीकारण्याशिवाय पर्यायच उरत नाही. ह्या एकटेपणात जरा निवांतपणे चिंतन केल्यावर जे गवसते, ते स्वत्व असते. ह्या स्वत्वाची मग असोशी वाटायला लागते. स्वत्व तनामनात भिनले, की मग आपण अरण्यका आहोत, याची जाणीव व्हायला लागते. हे अगदी हेच आणि असेच असेल असा दावा करता येत नाही, पण ही एक कवितेच्या आकलनाची पद्धत झाली.

'माझी नवी ओळख 

माझी मलाच पटली

तुझी होऊन जाणं

हीच पूर्णता वाटली' (अ. पृ. २६)

प्रेमातील समर्पणाची ही भावना अतिशय उत्कटतेने उतरली आहे. 

कवितेवर जीव ओवाळणं सोपं नसतं, याची कवयित्रीला जाणीव आहे. तरीसुद्धा एकेकाळी प्रिय असलेल्या आणि आता दुरावलेल्या व्यक्तीचं नाव कवितेत कोरणं लोभसवाणं वाटतं. निसटलेले क्षण आणि कस्तुरीगंध कडव्यांमध्ये गुंफायला कवयित्रीला आवडते. तेवढीच आपल्या दु:खावरची फुंकर आहे, असे समजायचे. विरहवेळी ही अशी शब्दांची संगत हवीहवीशी वाटते. कदाचित त्यातूनही एकटेपण सुसह्य होत असतं. 

कविता ही कवयित्रीची सखी आहे. जेव्हा ही कविता प्रतिमा प्रतीकांतून भेटायला येते, तेव्हा कवयित्रीचे अस्तित्व उजळून निघते. कविता हीच आपल्या जिवंतपणाची खूण आहे, असे कवयित्रीला वाटते. भावनांचे चोख हिशोब जुळत नाहीत आणि प्राक्तनाचा प्रत्येक डाव रडीचा ठरतो, ही मोठीच दुर्दैवाची गोष्ट आहे! आपल्या अस्तित्वाचा शोध घेताना कवयित्रीला वाटते :

'मंद स्पंदन मी। स्वप्न रंजन मी

मूक रूदन मी। मन-आक्रंदन मी'. (अ. पृ. १४)

ही कविता म्हणजे कवयित्रीच्या मौनाची भाषांतरे आहेत. अशा आपल्या सगळ्या व्यक्त-अव्यक्त भावावस्थांचा शोध कवयित्रीने ह्या कवितेतून घेतला आहे. 

'तू आणि मी'चा शोध घेताना कवयित्री म्हणते, 'सगळे प्रश्न, सारी चिंता माझी. सगळी भांडणं, सारे अबोले माझे. सगळे मोह, सारी आसक्ती माझी. सगळी कोंडी, सारी द्विधा माझी. तू तर नेहमी नामानिराळा'. (अ. पृ. १८)

शेवटच्या ओळीत कवयित्रीच्या मनातील तीव्र उपरोध टोकदारपणे व्यक्त झाला आहे. इतकं सगळं असलं, तरी ही कवितागत नायिका आपल्या नायकाची घालमेल समंजसपणे समजून घेण्याचा प्रयत्न करते. 

'कधी झुरतो आपण एकमेकांसाठी, 

कधी छळतो आपण एकमेकांना' (अ. पृ. २०)

हे त्यातलं कटू वास्तव आहे. 

'एक पर्व संपवताना' काय यातना होतात, हे ज्याचे त्यालाच समजते. त्याची परिणती पुढील शब्दांत उतरली आहे :

'स्वतःला संपवून नव्याने रुजताना

त्रास होणारच एक पर्व संपवताना'. (अ. पृ. २२)

नाइलाजाने संपवलेल्या क्लेशदायक पर्वाचा हा दु:खद इतिहास आहे. 

बाईचं जगणं म्हणजे तलवारीच्या धारेवरून अनवाणी चालणं. 'लादलेल्या बाईपणा'त एका मोकळ्या श्वासाची किंमत शेवटच्या श्वासापर्यंत चुकवत राहावी लागते. हे एक कटुसत्यच आहे. 

'चकवाच असतो बहुधा 

मृगजळामागे धावणं

आणखी काय?' (अ. पृ. ३४)

'आणखी काय?' हा केवळ प्रश्न नसून आत्मप्रचितीचे दृढीकरण ठरते. पुढे 'बांधिलकी' ह्या कवितेतही 'बाकी काय, मृगजळ' ह्या शब्दांत अनुभवाची पुनरुक्ती आहे. 

'कशाला हवी स्वप्नं बाईच्या जातीला? 

मिळतय जे दान तुला, गोड मानून घे' (अ. पृ. ३०)

असं तिला वारंवार बजावलं जातं. 

'माणूस म्हणून जगणं शक्यच नाही तिला, 

ती तर बाई कायमची' हा कवयित्रीचा अंतिम निष्कर्ष आहे. 

'गोठलेल्या बर्फाखालून पाण्याचा प्रवाह वाहतो

पाणगळीच्या मोसमातच कधी फुलांना बहर येतो' (अ. पृ. ३८)

असंही होतं कधीकधी. 

'वेदनेच्या धुराड्यामधून

स्वप्नांचा धूर येतो

खरी थक्क होते मी

जेव्हा मेल्या मनी अंकुर येतो' (अ. पृ. ३८)

कितीही मन मारलं, तरी मेल्या मनाला अंकुर फुटणारच. निसर्गक्रमच आहे तो. 

ह्या सबंध कवितेत जीवघेणे एकटेपण व्यापून उरले आहे. 'दिवस मावळता दाटून येणारं एकटेपण' वाचकालाही अस्वस्थ करून जातं. यापेक्षा गर्दीत हरवून जाणं परवडलं. ह्या कवितागत नायिकेचे जगणे सुकाणू नसलेल्या जहाजासारखे दिशाहीन झाले आहे. 

चौकट नसलेलं बंधमुक्त अवकाश ती अनुभवते आहे. हा प्रवास अंताकडे आहे की अनंताकडे, हे तिचे तिलाच समजत नाही. हे एकाकीपण नेमकेपणाने अभिव्यक्त करण्यासाठी कवयित्रीने 'इलियटची कविता', 'चमच्याने आयुष्य मोजणारा प्रुफ्रॉक' आणि 'निपचित रुग्णवत सायंकाळ' ह्या तीन अन्वर्थक प्रतिमा योजिल्या आहेत. 

'दूर क्षितिजावर टेकलेली नजर

अन्

मागे आठवणींचा फडफडता पदर' (अ. पृ. ४१)

अशी एकंदर परिस्थिती आहे. ह्या नकोशा आठवणींचा पिच्छा सुटता सुटत नाही. 

'कुठं असेल सुटका कायमची 

आठवणींच्या गुंतवळातून?' (अ. पृ. ४३)

हा प्रश्न कवयित्रीला अस्वस्थ करतो आहे. 

'नेमाने आणि नव्या दमाने रोज दिवसभर चालूनही अखेर सायंकाळी मी माझ्यापाशीच पोहोचते', हा कवयित्रीचा विदारक अनुभव आहे. 

दिवसाची लगबग सरता

आठवणींचे मोहळ उठते

मन उदास संध्या-समयी

शब्द-स्पर्श तुझे स्मरते' (अ. पृ. ४८)

अशा भावस्थितीत (खरे तर अभावस्थितीत) नायिकेने नायकाच्या नसण्यातही त्याचे असणे गृहीत धरलेले आहे. रोज त्याची आठवण करणे म्हणजे पाण्यावर रांगोळी काढण्यासारखेच आहे, याचीही तिला जाणीव आहे. म्हणून ती निग्रहाने म्हणते :

'काढून घेते कणाकणाने 

तुझ्यात गुंतलेलं माझं मन, 

जमेलही कधीतरी 

पुन्हा निर्लेप होऊन जाणं

पाण्यात राहूनही कोरडं राहणाऱ्या कमलदलासारखं, 

अगदी तुझ्यासारखं'. (अ. पृ. ६३).

असे निर्लेप होऊन जगता आले, तर बरेच प्रश्न सुटत जातात, पण ते जमायला हवे! 

मानवी मन हे मोठे चंचल असते. हे मन कधीकधी आपणच ठरवून दिलेल्या लक्ष्मणरेषा ओलांडण्याचा बंडखोर विचार करते. तशीच ही एक मनोवस्था :

'दरवेळी ठरवते, बस झालं! 

पुरे आता धावणं मृगजळामागे! 

पण संपत नाही असोशी

आपल्या अतृप्त क्षणांची'. (अ. पृ. ७०)

अतृप्त क्षणांची ही असोशी जुन्या आठवणींचा जागर मांडायला पुन्हा पुन्हा प्रवृत्त करते. त्यातूनच मग पुढील ओळी अवतरतात :

'स्पर्शाची भाषा। श्वासांची लिपी

मीलनाची ओढ। कैफ वर्णनातीत'. (अ. पृ. ७२)

पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या' म्हणत

'अंत नसलेला आरंभ रुजतोय नकळत तुझ्या-माझ्या मनात'. (अ. पृ. ७३)

हे अपरिहार्यच आहे. 

कवयित्रीच्या आयुष्याच्या गणितात बेरजेपेक्षा वजाबाकीच अधिक आहे. त्यामुळे सदैव दु:खाचेच ऋतू मुक्कामी असतात. 

माणूस दु:खाला विसरण्याचा, दु:खाला बगल देण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, पण दु:ख काही त्याचा पिच्छा सोडत नाही. 

'कधी वाटतं विसरलो 

पण असतं सोबत नेहमीच 

एका गुप्त सरस्वतीसारखं

ज्याचं त्याचं दु:ख'. (अ. पृ. ५३)

अदृश्यपणे पाठलाग करणार्‍या दु:खासाठी कवयित्रीने वापरलेली गुप्त सरस्वतीची प्रतिमा फारच अर्थपूर्ण आहे. 'मला माझ्यातच दु:खाचं झाड व्यापून राहिलय' (अ. पृ. ५४) हा कवयित्रीचा अनुभव तसा दाहक आहे. 

प्रत्येक माणूस आपले-आपल्यापुरते, स्वतःचे असे एक आभाळ घेऊन जगत असतो. भलेही ते आभाळ भासमान असेल किंवा चकवा असेल. पण निरामय जगण्यासाठी ते आवश्यक असते. दुर्दैवाने कधीकधी हे डोक्यावरचं आभाळ हिरावलं जातं. जेव्हा असं एखादं घर मोडतं- दुभंगतं, तेव्हा काय काय मोडतं आणि काय काय गमावलं जातं याचा हिशोब लावणे तसे अवघड आहे. 'चाकोरी' ह्या कवितेत कवयित्रीने हा हिशोब मांडला आहे :

'चाकोरीच्या चार भिंती मोडतात, 

तेव्हा मोडतं आणखीही बरंच काही' (अ. पृ. ५५)

'बरंच काही' ह्या दोन शब्दांत अगणित गोष्टी येतात. त्यांची गणतीच करता येत नाही. 

म्हणून कवयित्री म्हणते, 'जन्मले घेऊन नशीब कुंतीचे'. कवयित्रीने वापरलेली 'कुंतीचे नशीब' ही प्रतिमा म्हणजे दु:खव्याप्त आयुष्याचे प्रतीक आहे. 'माझी तीन रूपं' ह्या कवितेच्या शेवटी कवयित्री नियंत्याला उद्देशून एक ह्रदयविदारक प्रश्न विचारते :

'किती मरणं लिहिलीस, देवा! 

माझ्या एका जन्मात?' (अ. पृ. ५९)

कुंतीचे हे जीवनव्यापी दु:ख संवेदनशील वाचकालाही अस्वस्थ करून जाते. 

सगळा आक्रोश थांबल्यानंतर, सर्व भावभावनांचा निचरा झाल्यानंतर, असोशीने जगून झाल्यावर, स्वत्वशोधानंतर, काही हाती गवसल्यावर, शेवटी कवयित्रीला स्वतःचा शोध लागतो. हा शोध फारच मनोरम आहे! 'अरण्यका' ह्या कवितेत कवयित्री लिहिते :

'गुंतले मी तुझ्यात

की माझ्याच मनात 

गुंता होता विचारांचा. 

मनाच्या जंगलात 

वाट चुकलेली 

मी एक अरण्यका'. (अ. पृ. ८१)

त्याहीपुढे जाऊन ती म्हणते :

'स्वप्नांचे मृगजळ। मनाचे हरीण। अन्। माझ्याच मनात हरवलेली। मी एक अरण्यका' (अ. पृ. ८४)

कवयित्रीने स्त्रीपुरुषांतील नातेसंबंधांचा अतिशय डोळसपणे शोध घेतला आहे. कुठेही आकांडतांडव न करता अतिशय संयत स्वरातील अभिव्यक्ती हा ह्या कवितेचा लोभस गुण आहे. 'लादलेल्या बाईपणा'पासून 'अरण्यका'पर्यंतचा कवयित्रीचा हा भावप्रवास स्तिमित करणारा आहे. 

मानवी जीवन मोठे विचित्र आहे.'भास वसंतागमनाचा क्षणभर अन् पानगळ आयुष्यभराची' अशी इथली विपरीत परिस्थिती आहे. पण हे समजायला अख्खं आयुष्य खर्ची घालावं लागतं, तेव्हा कुठे हे उमगतं. इतक्या कटु-गोड अनुभवानंतरही कवयित्रीची 'जिगीषा' संपलेली नाही. ती मोठ्या उमेदीने लिहिते :

'जगायचं आहे मला कवितेसारखं मधुर आणि रसरशीत 

जगायचं आहे मला नदीसारखं स्वच्छंदी आणि प्रवाही 

जगायचं आहे मला सुरावटीसारखं तरल अन् उत्कट 

जगायचं आहे मला गंगेसारखं नितळ अन् निर्मळ'. (अ. पृ. ८८)

कवयित्रीच्या ह्या शीतल स्वप्नपूर्तीसाठी आणि इच्छापूर्तीसाठी आपण 'तथास्तू' तर नक्कीच म्हणू शकतो. 

स्वाती मदनवाड यांची अल्पाक्षररमणीय कविता कस्तुरीगंध, वेदनेचे धुराडे, स्वप्नांचा धूर, दु:खाचं झाड, कुंतीचं नशीब, पाण्यावरची रांगोळी, कवडशांची वेलबुट्टी, काचवेल, द्विज पक्षिणी, आदम आणि इव्ह, अरण्यका अशा प्रतिमा-प्रतीकांतून बोलते. स्वत्वाच्या शोधात निघालेल्या कवयित्रीची जीवननिष्ठा अतिशय प्रखर आहे, पाषाणभेदी आहे आणि गगनगामिनी आहे. जीवनातील कटू अनुभवांचे घोट पचवूनही ती अजिबात कडवट झालेली नाही. कवितागत नायिकेच्या आयुष्याची परवड झालेली असल्यामुळे ह्या कवितेत आक्रोश आहे, पण तोही स्वतःपुरता मर्यादित. तो आक्रोश जगाला आग लावण्याची भाषा करत नाही. ह्या नायिकेने दु:खाचे ऋतू पचवले असले, तरी ती खचून-पिचून न जाता, अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करते. ती इतरांवर दोषारोप करत कोणालाही शाप देत नाही. ही कविता जगण्याच्या अपरिहार्यतून आणि अभिव्यक्तीच्या असोशीतून  प्रगट झालेली आहे. सुख नावाच्या मृगजळाच्या पाठीमागे धावता धावता आलेले अपेक्षाभंगाचे दु:ख आणि कढ ह्या कवितेच्या पानोपानी जाणवतात. 

'असोशी' (कवितासंग्रह) 

कवयित्री : स्वाती मदनवाड 

प्रकाशक : काव्याग्रह प्रकाशन, वाशिम 

मुखपृष्ठ व रेखाटने : सरदार जाधव 

पृष्ठे ८८      किंमत रु. २००

पुस्तक परिचय :

डॉ. सुरेश सावंत, नांदेड. 

(साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक-कवी) 

sureshsawant2011@yahoo.com 

भ्र. ८८०६३८८५३५, ९४२२१७०६८९

टिप्पण्या