मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी
मुखेड तालुक्यातील मौजे सलगरा (खुर्द) येथील रहिवासी पुंडलिक विठ्ठल गोदवाड या विद्यार्थ्याने प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करत आपल्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबेजोगाई येथे MBBS अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.
पुंडलिक याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, सलगरा खुर्द येथे झाले. त्यानंतर त्याने यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे पुढील शिक्षण पूर्ण केले. त्याचे वडील विठ्ठल भारत गोदवाड हे सर्वसामान्य शेतकरी असून, आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही त्यांनी मुलाच्या शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न केले. या संघर्षातून पुंडलिकने मिळविलेले यश हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
पुंडलिकच्या या यशाबद्दल गावकऱ्यांकडून त्याचे अभिनंदन होत असून, त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यानिमित्त सामाजिक कार्यकर्ते शेख सुलेमान सलगरकर यांच्या हस्ते पुंडलिक विठ्ठल गोदवाड याचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेख अल्लाउद्दीन शेख, मौलासाब शेख यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

COMMENTS