नांदेड माणूस पदामुळे नव्हे, तर कर्तृत्वाने मोठा होतो. लोक राजकारण्यांना लवकर विसरतात, पण साहित्यिकाला समाज दीर्घकाळ स्मरणात ठेवतो. महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. मथुताई सावंत यांचा साहित्य आणि शिक्षण हा अतिशय आवडीचा विषय असून त्यांनी स्वतःला साहित्य आणि समाजकार्यासाठी वाहून घेतले. त्यामुळे त्या पीपल्सचे वैभव आहेत, असे प्रतिपादन नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील यांनी केले.
पीपल्स कॉलेजच्या मराठी विभागातील प्राध्यापक, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मथुताई सावंत आणि लेखापाल विवेक कुलकर्णी यांच्या सेवागौरव समारंभात ते बोलत होते.
नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. विकास सुकाळे, डॉ. मथुताई सावंत, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत, विवेक कुलकर्णी आणि सौ. कुलकर्णी उपस्थित होते.
प्रा. डॉ. मथुताई सावंत यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याचा गौरव करताना सीए डॉ. प्रवीण पाटील म्हणाले, की महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखिका म्हणून डॉ. मथुताई सावंत यांचे नाव आदराने घेतले जाते. डॉ. सावंत हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या भाषणातून त्यांच्या लेखणीचा दर्जा जाणवतो. शिक्षणासाठी आणि साहित्यासाठी त्यांनी राजकारण सोडले. राजकारण सोडण्यासाठी मोठा निर्धार लागतो. साहित्य हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असून त्यांनी स्वतःला त्यासाठी वाहून घेतले आहे. प्रा. डॉ. मथुताई सावंत आणि डॉ. सुरेश सावंत यांनी साहित्य क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे, असे डॉ. पाटील म्हणाले. दोघांनीही साहित्य क्षेत्रात आपले नाव कमावले असून अशी जोडी कुठेच पाहिली नाही, असे ते म्हणाले.
----------------------
'विद्यार्थी हेच दैवत मानून ४२ वर्षे काम केले'
प्रा. डॉ. मथुताई सावंत
सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ लेखिका प्रा. डॉ. मथुताई सावंत यांनी थोडक्यात आपला जीवनप्रवास सांगितला. वयाच्या १८व्या वर्षापासून माझा अध्यापनाचा प्रवास सुरू झाला. सत्यसाई सेवा समितीच्या माध्यमातून दत्तक घेतलेल्या गावांत सामाजिक काम केले. केंद्रीय गृहमंत्री व माजी मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण यांच्या सांगण्यावरून जिल्हा परिषदेतील शिक्षक पदाचा राजीनामा दिला. नंतर नांदेड शहरातील राजर्षी शाहू विद्यालयात नियुक्ती झाली. वयाच्या २५व्या वर्षी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्याचे सांगून डॉ. सावंत म्हणाल्या की आजपर्यंत विविध पदे भूषविली; पण त्या पदांचा उपयोग जनकल्याणासाठी केला. वाडी-तांड्यांवर जाऊन शेवटच्या माणसाच्या सुख-दुःखात सहभागी झाले. ग्रामीण स्त्रीजीवनाचा अभ्यास केला.
२००५ मध्ये पीपल्स कॉलेजमध्ये नियुक्ती झाल्यानंतर उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात समर्पित सेवा करण्याचा निर्धार केला. मिळालेल्या संधीचे सोने करायचे आणि अध्यापनात मन रमवायचे ठरवले. विद्यार्थी हेच दैवत या भावनेने तहहयात काम केले. या महाविद्यालयाच्या परिसरात मला आभाळाएवढ्या उंचीची माणसे भेटली. समाजात सर्वत्र प्रदूषण असताना पीपल्स कॉलेजचा परिसर 'ऑक्सिजन झोन' म्हणून ओळखला जातो. एवढा सुंदर परिसर आणि ‘कॉलेज कट्टा’ अन्यत्र सापडणार नाही, अशी कृतज्ञतेची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी डॉ. यशपाल भिंगे, उपप्राचार्य डॉ. विशाल पतंगे, कार्यालयीन अधीक्षक रोहिदास आडे, डॉ. रेश्मा डोईफोडे, ग्रंथपाल डॉ. संदीप गायकवाड, श्रद्धा टेकाळे आदींची समयोचित भाषणे झाली.
प्राचार्य डॉ. विकास सुकाळे आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले, की प्रा. डॉ. मथुताई सावंत यांनी शिक्षण क्षेत्रात ४२ वर्षे अखंड सेवा केली. एक उत्कृष्ट अध्यापिका असण्यासोबतच त्यांनी प्रथितयश कथाकार आणि कादंबरीकार म्हणून नावलौकिक मिळवला आहे. साहित्याचा चिकित्सक अभ्यास करून त्यांनी नरहर कुरुंदकरांची परंपरा पुढे नेली. निवृत्तीनंतरही त्यांचा समाजाशी असलेला बांधिलकीचा प्रवास सुरूच राहील, असे प्राचार्य डॉ. सुकाळे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कल्पना जाधव यांनी केले, तर उपप्राचार्य डॉ. विशाल पतंगे यांनी आभार मानले. यावेळी सर्व प्राध्यापक आणि कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS