छोट्यांसाठी बोधप्रद कथाकाव्यं : 'बोधाई' डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

'बोधाई' हा एकनाथ आव्हाड यांचा पहिला बालकवितासंग्रह मे २००६मध्ये प्रकाशित झाला. पुढे यथाकाळ ह्या संग्रहाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित ...

'बोधाई' हा एकनाथ आव्हाड यांचा पहिला बालकवितासंग्रह मे २००६मध्ये प्रकाशित झाला. पुढे यथाकाळ ह्या संग्रहाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या. 'बोधाई' हा निखळ कथाकाव्याचा संग्रह आहे. सामान्यतः कोणत्याही बालकवितासंग्रहात चार-दोन कथाकाव्यं असतातच. यात विशेष काही नाही, पण संपूर्ण कथाकाव्याचा संग्रह तसा दुर्मीळच असतो. मराठी बालसाहित्यात केवळ कथाकाव्यं अगदीच नाहीत असे नाही. आहेत पण संख्येने कमी आहेत. एकनाथ आव्हाड यांना साहित्य क्षेत्रातील पदार्पणाचा, पहिलाच प्रयोग कथाकाव्याचा करावासा वाटला, हे विशेष! जशी विनोबांची 'गीताई', तशी एकनाथांची 'बोधाई'. बोध करणारी आई, या अर्थाने 'बोधाई'. 'बोधाई' म्हणजे बोधप्रद कवितांची सुंदर अशी माळ आहे. कवीने ही काव्यमाला, म्हणजे आपल्या आयुष्यातील हे पहिलेवहिले पुस्तक आपल्या आई-बाबांच्या चरणी अर्पण केले आहे. हेही स्वाभाविकच आहे!

'बोधाई' ह्या ७२ पृष्ठांच्या संग्रहात एकूण ६२ कथाकाव्यं आहेत. 'इसापनीती'सारखी यातील बहुतेक सगळी कथाकाव्यं ही पशु-पक्ष्यांवर किंवा बाळगोपाळांच्या परिचयातील वस्तूंवर बेतलेली आहेत. नाहीतरी चिऊकाऊच्या गोष्टी बाळगोपाळांना आवडतातच. 'बोधाई' म्हणजे काव्यमय इसापनीती, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. पुढील काळात प्रकाशित झालेल्या, एकनाथ आव्हाड यांच्या जवळजवळ सर्वच पुस्तकांतील कथेत एखादी कविता लपलेली असते आणि कवितेत चिमुकली गोष्ट दडलेली असते. त्यांच्या कथेत कविता आणि कवितेत कथा एकजीव झालेली असते. एकनाथ आव्हाड यांच्या बालसाहित्यविषयक दृष्टीत आणि सृष्टीत कथाकाव्याचे हे बीजारोपण 'बोधाई'नेच केले असावे, असे मला वाटते.

'ठोशास ठोसा' ह्या कवितेत कवीने एका निरुपद्रवी सापाची गोष्ट सांगितली आहे. एका निरुपद्रवी सापाला विनाकारण सगळेच तुडवतात आणि रडवतात. हा साप आपली तक्रार घेऊन देवाकडे गेला. त्याला उपदेश करताना देव म्हणतो :

'अरे, ठोशास ठोसा वृत्तीने

जगात वागलेच पाहिजे 

रडण्यापेक्षा न्यायासाठी 

हिमतीने लढले पाहिजे'. 

ह्या कवितेत कवीने 'जशास तसे' हा मंत्र दिला आहे. 

एकदा एका सिंहाने एका सशाला जबड्यात पकडले. लगेच त्याला एक बाळसेदार हरीण दिसले. त्यामुळे सिंहाला हरणाचा मोह झाला. त्याने सशाला सोडले आणि तो हरणाच्या मागे धावू लागला. हरीण तर हाती लागले नाहीच, अखेर त्याला पकडलेल्या सशाची आठवण झाली. नाइलाजाने सिंह सशाला शोधत आला, तोवर ससा पळून गेला होता. 'हातचे सोडून' ह्या कवितेच्या शेवटी कवीने छान सल्ला दिला आहे :

'हातचे सोडून जो

पळत्याच्या मागे धावतो

शेवटी सगळे गमावून 

तो वेड्यासारखा वागतो'. 

असे सांगून कवीने अती मोह बरा नाही, असे सुचविले आहे. 

रेशमाचा एक किडा आणि एक कोळी यांच्यात वाद झाला. कोळ्याने किड्याला हिणवले. ह्या गोष्टीचे सार सांगताना कवीने लिहिले आहे :

'नुसत्या मोठ्या आकाराला

महत्त्व येथे नाही 

अनेकांना उपयोगी किती 

यातच सारे काही'. 

तुमच्या शरीराचा आकार महत्त्वाचा नाही, तर तुम्ही किती लोकांना उपयोगी पडता, हे महत्त्वाचे! कवीची ही उपयोगितेची दृष्टी खरोखरच महत्त्वाची आहे! 

एका पारध्याने शिकारीसाठी जाळे लावून त्यात दाणे पसरवून ठेवले होते. एक गरीब बिचारी साळुंखी दाणे टिपायला आली आणि जाळ्यात अडकून पडली. तिने सुटकेसाठी देवाचा धावा केला आणि म्हणाली, मी एकच दाणा टिपला, तर मला एवढी मोठी शिक्षा का? 

त्यावर देवाने दिलेले उत्तर फारच महत्त्वाचे आहे :

'देव म्हणाला तिला

मनावर ताबा हवा

चोरी मोठी का छोटी 

हा प्रश्नच कशाला हवा?' 

ह्या गोष्टीचा मथितार्थ महत्त्वाचाच आहे. चोरी छोटी किंवा मोठी नसते, तर चोरी ही शेवटी चोरीच असते. त्यापासून दूर राहिलेले चांगले. पुन्हा पश्चात्ताप करण्यात काहीच अर्थ नाही. 

एक कोल्हा एका शेतकऱ्याच्या शेतात शिरून पिकांचे नुकसान करत असे. त्या चिडलेल्या शेतकऱ्याने, रागारागाने कोल्ह्याला पकडून त्याच्या शेपटीला आग लावली. शेपटीची आग घेऊन तो कोल्हा पिसाळल्यासारखा शेतात सर्वत्र धावत सुटला. शेपटीची आग शेतातील सर्व पिकांना लागली. सगळी पिके जळून खाक झाली. शेवटच्या कडव्यात कवीने लिहिले आहे :

'शेतकरी सारं पाहून

धाय मोकलून रडला

अतिरेकी संताप त्याचा

त्यालाच आज नडला'. 

ह्या कवितेत कवीने अतिरेकी संताप बरा नव्हे, हा संदेश दिला आहे. 

एका जंगलात एक सिंह आणि तीन धष्टपुष्ट बैल एकोप्याने राहत होते. त्यांच्या एकीमुळे तो सिंह त्या बैलांची शिकार करू शकत नव्हता. त्यामुळे सिंहाने युक्ती करून तीन बैलांमध्ये फूट पाडली. आता बैल एकमेकांपासून दूर दूर राहू लागले. एकमेकांकडे संशयाने पाहू लागले. त्यामुळे सिंहाला हवी असलेली शिकारीची संधी चालून आली. त्याने एका एका बैलाची शिकार केली. ह्या गोष्टीचे तात्पर्य सांगताना कवीने म्हटले आहे :

'या सिंहासारखे लबाड 

जगात बरेच असतात 

एकमेकांना फोडून ते

कार्यभाग असा साधतात'. 

ह्या कवितेत कवीने समाजात फूट पाडणाऱ्या स्वार्थी लोकांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. 

एका जंगलात एक रानडुक्कर दगडावर आपले सुळे घासून त्यांना धार लावत होते. त्याला बघून कोल्ह्याने विचारले, सध्या युद्ध नाही, तरी तू आपल्या सुळ्यांना धार का लावत आहेस? 

त्यावर रानडुकराने दिलेले उत्तर विचार करण्यासारखे आहे. तो म्हणतो :

'म्हणून प्रत्येक गोष्टीची 

आधीच तयारी करावी

पुढला धोका ओळखून 

वेळीच काळजी घ्यावी'. 

वर्षभर उनाडक्या करणाऱ्या आणि ऐन परीक्षेच्या तोंडावर, रात्र रात्र जागून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा संदेश अतिशय उपयुक्त आहे. 

एकदा एका कावळ्याला खूप भूक लागली होती. त्याने आपली भूक भागविण्यासाठी झोपलेला एक साप पकडला. आता आपली भूक भागेल, असे कावळ्याला वाटले होते, पण घडले मात्र उलटेच. झोपलेला साप जागा झाला आणि त्याने कावळ्याला दंश केला. शेवटी कवीने लिहिले आहे :

'पण वरवर दिसतं

तसंच सगळं नसतं

असाही अनुभव येतो

आणि हे जग फसतं'. 

वरवर दिसतं तसं नसतं, म्हणूनच तर जग फसतं. एक चुकीचा निर्णय आपल्याला अडचणीत टाकू शकतो. म्हणून प्रत्येक वेळी आपण सावध असले पाहिजे. 

एका खुराड्यात कोंबडीची सोळा पिल्लं होती. एका दिवशी एका मांजराने एक पिलू खाल्लं. दुसऱ्या दिवशी ते मांजर पुन्हा आले. मालकाने त्या लोभी मांजराला पकडून उलटे टांगले. मांजराची चांगलीच फजिती झाली. ह्या गोष्टीचे सार सांगताना कवीने लिहिले आहे :

'कुठल्याही गोष्टीचा

जो अतिलोभ धरतो

सारं काही मिळूनही

तो जीवनात हरतो'. 

ऊस गोड लागला, म्हणून तो मुळांसकट खायचा नसतो, हाच संदेश कवीने ह्या कवितेत दिला आहे. 

एकदा एक सरदार घोड्यावर खूप दूर फिरून आला. वाटेत त्या घोड्याचा नाल गळून पडला. सरदाराने घोड्याचा नाल बसवून घ्यायचा कंटाळा केला. आणि अचानक सरदाराला राजाकडून युद्धाचा आदेश आला. सरदार युद्धावर निघाला खरा, पण त्याचा घोडा पळतच नव्हता, कारण त्याच्या खुराला नाल मारलेला नव्हता. अखेर शत्रूने पकडून त्या सरदाराला कैदेत टाकले. सरदाराच्या निष्काळजीपणाचा परिणाम त्याला भोगावा लागला. म्हणून कवीने बालवाचकांना सावध केले आहे :

'म्हणूनच कुठल्याही गोष्टीचा 

वेळीच विचार करावा 

वेळच्या वेळी कामाचा

सतत आग्रह धरावा'. 

आयुष्यात चालढकल कामाची नसते. मानवी जीवनात तत्परता आवश्यकच असते. 

एक खेकडी आपल्या पिलाला म्हणाली, तू फारच वाकडातिकडा चालतोस. जरा सरळ चालत जा. पिलू म्हणाले, सरळ म्हणजे कसे, ते तू मला चालून दाखव. म्हणजे मी तसा चालत जाईन. खेकडीने खूप प्रयत्न केला, पण तिला काही सरळ चालता येईना. मुळात तीच वाकडीतिकडी चालत होती. अखेर ती थकली आणि खजील झाली. त्यावर कवीने भाष्य केले आहे :

'इतरांना उपदेश करणारे

असे बरेच असतात 

बोलू तसे वागणारे मात्र 

फारच कमी दिसतात'. 

इतरांना उपदेश करणारे खूप सापडतील, उपदेशाप्रमाणे वर्तन करणारे फारच कमी असतात. हे चित्र पाहिल्यावर आपल्याला ती म्हण आठवते : 'लोकां सांगे ब्रह्मज्ञान। मात्र आपण कोरडे पाषाण'. 

टोळ हा वनस्पतींवर उड्या मारणारा इटुकला जीव. तो खुशालचेंडू टोळ काहीही काम न करता इकडून तिकडे उड्या मारत असतो. मुंग्या मात्र सारखी धावपळ करून अन्नाची साठवण करून ठेवतात. भुकेलेला टोळ एके दिवशी अन्न मागायला मुंग्यांकडे गेला. तेव्हा मुंग्या त्याला समज देताना म्हणतात : 

'उमेदीच्या काळात जो

काम करत नाही 

लक्षात ठेव याचा त्याला

भविष्यात त्रास होई'. 

माणसाने उद्याची तजवीज आजच केलेली चांगली, हा या गोष्टीचा मथितार्थ कवीने फारच छान समजावून सांगितला आहे. 

आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टींतील पात्रं ही सजीव होती. 'जगण्यातला आनंद' ह्या कवितेतील पात्र आहे पाण्याचा थेंब. पाण्याचा थेंब आभाळातून जमिनीवर पडला आणि आपले जीवन वाया गेले, असे म्हणून खूप रडला. काही काळाने तो एका शिंपल्यात जाऊन दडला. काही काळाने त्या थेंबाचा मौल्यवान मोती झाला. आता तो थेंब म्हणाला, आता माझ्या जीवनाला खरा अर्थ आला. त्यावर भाष्य करताना कवी लिहितो 

'उगीचच आपण जीवनाला 

दोष देत असतो 

निराशेने वागून जगण्यातला

आनंद हरवून बसतो'. 

जे लोक नेहमी तक्रारी करतात, रडगाणे गात बसतात, त्यांच्यासाठी हा गोष्टीरूप संदेश महत्त्वाचाच आहे! 

एकदा एक उंट रस्त्याने मुकाट्याने चालला होता. एका गाढवाने त्याला उगीचच शिव्या दिल्या. पण त्याकडे लक्ष न देता उंट आपला चालतच राहिला. त्यावर गाढवाने पुन्हा त्याला प्रश्न विचारला, मी तुला शिव्या दिल्या, तरी तू काहीच बोलला नाहीस. असे का? 

त्यावर कवीचा खुलासा असा :

'उंट म्हणाला ज्याला आपले

उद्दिष्ट असते गाठायचे 

गाढवाच्या बडबडीकडे त्याने

लक्ष नसते द्यायचे'. 

असे केले, तरच उंटाची वाटचाल सोपी होते. 

एक कपटी कोल्हा इतरांची खोटी खोटी स्तुती करायचा. त्याने एकदा गाढवाची खोटी खोटी स्तुती केली. ती गाढवाच्या लक्षात आली. त्याला अद्दल घडविण्यासाठी गाढव कोल्ह्याला म्हणाले, 

माझ्या मागच्या पायात काटा मोडला आहे. तेवढा तू काढून देशील का? 

कोल्हा पाठीमागे जाताच गाढवाने त्याच्या तोंडावर लाथांचा प्रसाद दिला. कोल्होबाचे वाचाळ तोंड फुटून रक्तबंबाळ झाले. कोल्ह्याचा वाचाळपणा त्याच्या अंगलट आला. अशा वृत्तीची कानउघाडणी करताना कवीने म्हटले आहे :

'जगात शेरास सव्वाशेर

भेटतो केव्हा तरी 

चांगले वागून आपण जगावे

हीच गोष्ट खरी!' 

या जगात ठकास महाठक भेटतोच. म्हणून आपण आपल्या मर्यादेत राहिलेले चांगले! 

एकदा एका गाडीवानाची बैलगाडी चिखलात फसली. तो गाडीवान मदतीसाठी देवाचा धावा करू लागला. देव त्याला म्हणाला, प्रयत्न हाच देव असतो, म्हणून माझा धावा करण्यापेक्षा तू तुझे प्रयत्न कर. त्याचा परिणाम असा झाला, की

'धावा करत बसण्याचा 

त्याने विचार सोडून दिला 

प्रयत्नाअंती परमेश्वर 

याचा अर्थ कळून आला'. 

देवाचा कोरडा धावा करण्यापेक्षा प्रयत्न करण्याचा सकारात्मक संदेश कवीने दिला आहे. आपल्या प्रयत्नांवरचा विश्वास दृढ करणारे हे कथाकाव्य म्हणूनच महत्त्वाचे आहे. 

कधीकधी रक्ताच्या नात्यापेक्षाही मानलेली नाती 

अधिक दृढ असतात. अशा आशयाची गोष्ट 'आईची ओळख' ह्या कवितेत सांगितली आहे. एका बकरीने मेंढीच्या पिल्लाला सांभाळले होते. त्या दोघांचे नाते आई आणि लेकरासारखेच होते. एके दिवशी एका लांडग्याने त्या पिल्लाच्या कानात सांगितले, की ही तुझी खरी आई नाही. 

ते पिल्लू तसे हुशार होते. ते म्हणाले, माझ्या आईने मला सोडून दिले होते, पण बकरीने आई बनून माझा लेकरासारखा सांभाळ केला. ही माझी जन्मदाती नसली, तरी खरी प्राणदाती आहे. 

काव्यमय शब्दांत त्याने लांडग्याला सुनावले :

'अरे, नाते हे केवळ 

रक्तावर ठरत नाही 

प्रेम त्याग नसेल तर 

नात्याला अर्थ उरत नाही'. 

मेंढीच्या पिल्लाचा हा बाणेदारपणा कौतुकास्पद आहे! 

एकदा एक गाढव आणि एक माकड गप्पा मारत बसले होते. गाढवाने आपले दु:ख सांगितले, की मला शिंग नाहीत, पण लांबच लांब कान मात्र आहेत. माकडाने आपले दु:ख उगाळले, माझी शेपटी लांबच लांब असली, तरी झुपकेदार नाही. 

त्या दोघांचे रडगाणे ऐकून उंदीर म्हणाला, मला तर शिंगही नाहीत आणि शेपूटही नाही. शहाणा उंदीर गाढवाची आणि माकडाची समजूत घालताना म्हणाला, 

'पण जे मिळाले नाही 

त्याचे दु:ख कशाला व्हावे 

जे मिळाले काही 

त्यातच सुख मानत जावे'. 

उंदराचे हे सांगणे म्हणजे म्हणजे सुखी, समाधानी आणि आनंदी जीवनाचा मंत्रच आहे. 

तो सगळ्यांनीच लक्षात ठेवला पाहिजे. 

'कसे वागावे' हे ह्या पुस्तकातील शेवटचे कथाकाव्य आहे. ह्या कवितेत एक सदैव कार्यरत असलेला लखलखीत विळा आहे आणि दुसरा काहीच काम न करता गंजत पडलेला आळशी विळा आहे. हे दोन विळे म्हणजे दोन भिन्न प्रकृतीचे प्रतीक आहेत. ह्या दोन विळ्यांमधील परस्परविरोधी संवादातून हे कथाकाव्य फुलत जाते. आळशी विळ्याला आपण काहीच काम न करता पडून असल्याचा अभिमान आहे. उलट तो काम करणाऱ्या विळ्याला दोष देतो. 

'लखलखता विळा यावर

गंजलेल्या विळ्याला म्हणाला 

जीवन सार्थ करायचे तर

उपयोगी पडावे जनाला. 

मी माझ्या कामाने

लोकांच्या लक्षात राहीन

नुसते गंजून पडण्यापेक्षा 

चांगले करून जाईन'. 

आपल्या कामाने आपला ठसा उमटविण्याचा हा निर्धार प्रत्येकासाठीच महत्त्वाचा आहे. ह्या कवितेतून कवीने समाजात कार्यसंस्कृती रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. 

ह्या कथाकाव्यांची शीर्षके अतिशय उत्कंठावर्धक आहेत. प्रत्येक कवितेचे पहिले चार ओळींचे कडवे हे कथेची वातावरणनिर्मिती करते आणि शेवटचे चार ओळींचे कडवे काही एक साररूप, जीवनोपयोगी विचार वाचकाच्या तळहातावर ठेवते. ह्या कवितांतून कवीने माणसाच्या अंगी असलेल्या आळस, मोह, मत्सर, अहंकार, सूड, द्वेष, स्वार्थ यांसारख्या दुर्गुणांचे कसे दुष्परिणाम भोगावे लागतात, हे दाखविले आहे. आणि शेवटी ह्या दुर्गुणांपासून दूर राहण्याचा संदेश दिला आहे. 'बोधाई' हे पुस्तक केवळ छोट्यांसाठीच उपयुक्त आहे, असे नव्हे, तर तथाकथित मोठ्यांसाठीही हे तितकेच उपयुक्त आहे. हे कवीचे पहिले पुस्तक असले, तरी यात पहिलेपणाच्या खुणा अजिबात नाहीत. ह्या कवितेत नाद, लय आणि ताल आहे. ह्या कवितांमध्ये कवीने मनोरंजन आणि संस्कार यांचा तोल व्यवस्थित सांभाळला आहे. हे पुस्तक म्हणजे बालसाहित्यातील एकनाथ आव्हाड यांच्या भावी वाटचालीचे प्रसादचिन्हच आहे. ह्या संग्रहाला ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विजया वाड यांची प्रस्तावना लाभली आहे. 

यातील प्रत्येक कविता अतिशय चित्रदर्शी आहे. ही कविता बालवाचकांच्या नजरेसमोर त्या त्या घटना-प्रसंगांचे चित्र सहज साकार करते. त्यामुळे बालवाचकांना आपण एखादा चित्रपट पाहतोय, असेच वाटत राहते. एका एका पाकळीने फूल उमलत जावे, तशी ही कथाकाव्यं उमलत जातात. त्यांचा सुगंध वाचकाच्या मनात दरवळत राहतो. हल्ली प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्यामुळे आणि आईवडील आपापल्या कामांत व्यग्र असल्यामुळे बाळगोपाळांच्या जीवनातील गोष्ट हरवली आहे, गाणे हरवले आहे. ही उणीव भरून काढायची असेल, तर 'बोधाई'सारख्या पुस्तकांना पर्याय नाही. आईवडिलांनी 'बोधाई' आपल्या हाताशी ठेवून दररोज यातील एक कथाकाव्य वाचून दाखवले, तर बाळगोपाळांना हरवलेली गोष्ट सापडेल. हरवलेले गाणे सापडेल. कथाकाव्यं वाचल्यावर किंवा ऐकल्यावर बालकांना अपेक्षित असलेला बोध आपोआपच सापडेल. त्यासाठी कोरडा उपदेश करण्याची गरजच पडणार नाही. गोष्टीतून बोध गवसल्यामुळे ते बालक, ती गोष्ट आणि त्या गोष्टीतून मिळणारी शिकवण जन्मात कधीच विसरणार नाही. 

'बोधाई' (छोट्यांसाठी बोधप्रद कथाकाव्यं) 

कवी : एकनाथ आव्हाड 

प्रकाशक : अ. भा. सानेगुरुजी कथामाला, डोंबिवली 

पृष्ठे : ७२ किंमत रु. ११०

पुस्तक परिचय :

डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group