नांदेड (विशेष प्रतिनिधी):
नायगाव तालुक्यातील रहिवासी असलेले व सध्या नांदेड शहरातील वामननगर परिसरातील रवींद्र प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले राजकुमार नागोराव धोंगडे (वय ४२) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २२ ऑगस्ट रोजी घडली. या घटनेमुळे शिक्षण वर्गात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार धोंगडे यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे समजताच परिसरात एकच धावपळ झाली. घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई पूर्ण केली आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (Post-Mortem) शासकीय रुग्णालयात पाठवून दिला.
आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे रवींद्र प्राथमिक शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

COMMENTS