प्रगती प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक रुग्णालय उभारणार; ५९४ नवीन पदांची निर्मिती
नांदेड, दि. १६ सप्टेंबर : नांदेडच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला मोठी चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, प्रगती प्रकल्पांतर्गत नांदेड येथे ५०० खाटांचे नवीन जिल्हा रुग्णालय उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. रुग्णालयासाठी ५९४ नवीन पदांची निर्मिती करण्यासही शासनाने मान्यता दिली आहे. नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव बोंढारकर यांनी या रुग्णालयासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रगती प्रकल्पाची अंमलबजावणी २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीत करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची सुधारित किंमत ४ हजार २५० कोटी रुपये असून, त्यापैकी २ हजार ९७५ कोटी रुपये आशियाई विकास बँकेकडून , तर १ हजार २७५ कोटी रुपये महाराष्ट्र शासनाकडून उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
नांदेड येथील ५०० खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालयासाठी मंजूर आकृतिबंधानुसार ५९४ नवीन पदे निर्माण करण्यात येणार आहेत. त्यासाठी अपेक्षित खर्च ३१ कोटी २५ लाख ३० हजार २५० रुपये इतका आहे.
नांदेड येथील श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयाचे ३०० वरून ५०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली होती. विद्यमान आंतररुग्ण विभागाची इमारत वापरण्यास अयोग्य असल्याने त्याठिकाणी नवीन बहुमजली रुग्णालयाची इमारत उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव बोंढारकर यांनी नवीन ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. रुग्णालयाच्या बांधकामासाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता, निधी तसेच अत्याधुनिक आरोग्य सुविधांसाठी त्यांनी संबंधित विभागांकडे पाठपुरावा केल्याने या प्रस्तावाला गती मिळाली. अखेर शासनाने ५०० खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालयाला मंजुरी देत ५९४ नवीन पदांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.
चौकट
हृदयरोग, कर्करोगासह आधुनिक उपचार सुविधा
प्रगती प्रकल्पातून केवळ रुग्णालयाची नवीन इमारत उभारली जाणार नसून आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. हृदयरोग, स्ट्रोक, दीर्घकालीन मूत्रपिंड विकार, कर्करोग, मानसिक आरोग्य आणि पॅलिएटिव्ह केअर यांसारख्या उपचारांसाठी आवश्यक सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे.
याशिवाय ABHA आधारित डिजिटल आरोग्य नोंदी, Electronic Health Records, Telemedicine, AI आधारित निदान सहाय्य तसेच आपत्कालीन आरोग्यसेवांचे डिजिटल एकत्रीकरण यावरही भर देण्यात येणार आहे.
चौकट
जनतेला उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध : आ. आनंदराव बोंढारकर
“नांदेडच्या जनतेला अत्याधुनिक आणि सक्षम आरोग्यसेवा मिळावी, यासाठी ५०० खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न शासनदरबारी सातत्याने मांडला. आता रुग्णालयाला मंजुरी आणि ५९४ नवीन पदांची निर्मिती झाल्याने नांदेडच्या आरोग्यसेवेला नवी दिशा मिळणार आहे. पुढील टप्प्यात रुग्णालयाचे काम वेगाने सुरू होण्यासाठीही पाठपुरावा सुरू ठेवू,” असे आमदार आनंदराव बोंढारकर यांनी सांगितले.जनतेला उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

COMMENTS