मला उंच उडू दे!' : नाट्यछटांचा खेळकर प्रयोग डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

  'मला उंच उडू दे' हा एकनाथ आव्हाड यांच्या नाट्यछटांचा पहिला संग्रह जे. के. मीडियाच्या ज्योती कपिले यांनी २०१७मध्ये प्रकाशित केला आह...

 

'मला उंच उडू दे' हा एकनाथ आव्हाड यांच्या नाट्यछटांचा पहिला संग्रह जे. के. मीडियाच्या ज्योती कपिले यांनी २०१७मध्ये प्रकाशित केला आहे. ४० पृष्ठांच्या ह्या संग्रहात मनोरंजनाबरोबरच ज्ञान, मूल्ये आणि संस्कारांची शिदोरी देणा-या दहा नाट्यछटा आहेत. 

'मला उंच उडू दे' ह्या पहिल्याच नाट्यछटेत आपल्याला कमल नावाची एक कष्टकरी वर्गातली मुलगी भेटते. तिची आई रोजगार हमी योजनेच्या कामावर जात असते. कमल घरी थांबून आपल्या धाकट्या भावाला सांभाळण्याचे काम करत असते. ह्या कामामुळे ती शाळाबाह्य ठरली होती. एके दिवशी पाटील गुरुजी घरी येतात आणि तिला शाळेत घेऊन जातात. शाळा शिकण्याच्या कल्पनेने तिच्या पंखांत बळ आले आहे. ती आपल्या आईला सांगते, शिकायला वयाचं कायबी बंधन नसतं. फकस्त शिकायची जिद्द असली पायजे. मी तर शिकून खूप मोठी कलेक्टर होणार बघ. कमल आणि तिच्या भावाला आता शाळेचा लळा लागला आहे. कमलच्या शब्दांनी शाळाबाह्य मुलामुलींचा विश्वास वाढला, तर आश्चर्य वाटायला नको. 

हल्ली विद्यार्थ्यांचे बालपण शाळा आणि खाजगी शिकवणींच्या चाकाला बांधलेले आहे. जीवनाचा आनंद घ्यायला त्यांना वेळच मिळत नाही. काही पालक उन्हाळ्याच्या सुट्टीतसुद्धा आपल्या पाल्यांना छंदवर्गात अडकवून टाकण्यासाठी प्रयत्नशील असतात. 'सु s सु s सुट्टी' ह्या नाट्यछटेत आपल्याला एक शाळकरी मुलगा भेटतो. तो सगळ्या क्लासेसना कंटाळलेला आहे. त्याला कथा वाचायला, ऐकायला आणि सांगायला आवडते. म्हणून तो आपल्या ताईला विनंती करतो, की वाचन हासुद्धा एक संस्कारच आहे. वाचनात घालवलेला वेळ कधीच वाया जात नसतो. सुट्टीत एखादा क्लास लावून देण्यापेक्षा माझी सार्वजनिक वाचनालयाची वर्गणी भरून दे. त्यामुळे माझी पुस्तकांशी मैत्री होईल. पुढे तो म्हणतो :

'पुस्तकं करतात माझ्यावरी आईपरी माया

पुस्तकांसोबत जातो मी जग फिराया'. 

हा मुलगा पालकांच्या आग्रहापेक्षा आपले छंद जोपासू पाहतो आहे. स्वतःच्या कलानुसार उमलू पाहतो आहे. तो त्याचा अधिकारच आहे! 

'काय? अंत नका पाहू?' ह्या नाट्यछटेत आपल्याला एक गायनवेडी मुलगी भेटते. गायन स्पर्धेत ती भूपाळी, अंगाईगीत, भजन, बालगीत, लावणी, भावगीत असे विविध गीतप्रकार सादर करते. पण तिला सूर सापडत नसल्यामुळे संयोजक तिला कंटाळले आहेत. संयोजक तिला हाकलून देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ती जबरदस्तीने गाणे ऐकवण्याचा हट्ट करते आहे. संयोजक गायिकेला म्हणतात, 'अंत पाहू नका'. यावरून ह्या नाट्यछटेचे समर्पक शीर्षक बेतले आहे. यातून छान विनोदनिर्मिती झाली आहे. 

काही आधुनिक मुलामुलींना, आईवडलांनी ठेवलेली जुन्या वळणाची आपली नावे आवडत नाहीत. मुंबईच्या शाळेत शिकणारा एक मुलगा आहे. त्याचं नाव आहे खंडू. ह्या खंडूला खेडवळ वळणाचं आपलं नाव अजिबात आवडत नाही. कारण त्याचे मित्र त्याला 'खंड्या' म्हणतात. आजी त्याला 'खंडूबा' म्हणते. एकदा त्याने आपल्या नावाबद्दल वडलांकडे तक्रार केली, तर वडील म्हणाले, 'आम्ही नाव ठेवले, पण तुझे नाव तुलाच कमवायचे आहे'. शेवटी खंडूने आपले नावडते नाव स्वतःच बदलून घेतले.

एकदा शाळेत तपासणी अधिकारी आले होते. वर्गातल्या एका मुलाचे नाव होते सर्जू. तपासणी अधिकारी म्हणाले, 'सर्जू म्हणू नये. सर्जेराव म्हणावे'. त्या अधिकाऱ्याने खंडूला नाव विचारले. 'सर्जेराव'वरून त्याला नाव सुचले, 'खंडेराव'. खंडूने त्या साहेबांना खणखणीतपणे आपले नवे नाव सांगितले, 'खंडेराव'. अशा प्रकारे खंडूचा खंडेराव झाला. अशी आहे 'माझ्या नावाची कहाणी' ही रंजक आणि कल्पनारम्य नाट्यछटा. 

सामान्यतः नाट्यछटेतली पात्रं ही लहान मुले किंवा मुली असतात. पण 'वेळीच डोळे उघडा' ह्या नाट्यछटेतले प्रमुख पात्र आहे वडलांचे. ते आपल्या मुलाची तक्रार करत आहेत. मुलगा अभ्यासात कच्चा आहे आणि सारखा क्रिकेट खेळत असतो, ही त्यांची तक्रार आहे. शिक्षणाविषयी त्याला ते खूप उपदेश करतात. खेळापेक्षा अभ्यास महत्त्वाचा आहे, असे त्यांना वाटत असते. ते मुलाचे वर्णन करताना म्हणतात, बोलायला तेवढा टकराघू आणि कामाला मात्र आगलागू. तू माझ्या सांगण्याकडे लक्ष दिले नाहीस, तर 'डोळ्यात केर आणि कानात फुंकर' अशी तुझी अवस्था होईल अशी धमकी देतात. 

मुलाला त्याची चूक समजल्यावर त्याला नवीन बॅट घेऊन देण्याचे आश्वासन देतात. मुलगा आणि वडील यांच्या संवादातून फुलत गेलेली ही नाट्यछटा खूपच बोधप्रद आहे. 

'एक ना धड, भाराभर चिंध्या' ह्या नाट्यछटेतला बंडू परीक्षेच्या तोंडावर अभ्यासाला बसला आहे, तर आई सारखी हाका मारते आहे. बाहेर एक मित्र खेळायला बोलावतो आहे. रात्र थोडी आणि सोंगं फार अशी त्याची अवस्था झाली आहे. त्याला सल्ले देणारे जास्त झाल्यामुळे त्याची अवस्था एक ना धड भाराभर चिंध्या अशी झाली आहे. ह्या नाट्यछटेत लेखकाने बालकुमारांना अप्रत्यक्षपणे नियमित अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे. 


आतापर्यंतच्या नाट्यछटांतील पात्रं ही जिवंत मुले-माणसे होती. 'जरा ऐकून तर घ्या' ह्या नाट्यछटेत निर्जीव मीठ हेच प्रमुख पात्र आहे. हे मीठ रंगमंचावर येऊन आपले विविध प्रकार आणि आपले विविध उपयोग सांगते आहे. मीठ आपले औषधी गुणधर्मही सांगते आहे. खादाड लोकांना 'अति खाणं आणि मसणात जाणं' असा टोमणाही मारते. मिठाच्या तोंडून ह्या गोष्टी ऐकून बालकुमार वाचकांच्या ज्ञानात भर पडते. मीठ कमी पडले, तरी बरे नसते आणि जास्त झाले तरी बरे नसते. म्हणून मीठ म्हणते :

'खरे सार शोधोनीया नित्य घ्यावे

प्रमाणामध्ये सर्व काही असावे'. 

शेवटी मीठ म्हणतं, माझ्याविना तुमचं पावलोपावली अडतं. म्हणून इतरांचंही ऐकून घेत चला आणि इतरांनाही महत्त्व देत चला. इतरांना समजून घेण्याची सवय चांगलीच आहे! 

'पत्र नव्हे मित्र' ह्या नाट्यछटेत आपल्याला दोन भाऊ भेटतात. थोरला भाऊ वर्तमानपत्राचे नियमित वाचन करतो, तर धाकट्या भावाला त्याचा कंटाळा आहे. म्हणून मोठा भाऊ छोट्या भावाला वर्तमानपत्राचे महत्त्व पटवून देतो. तो म्हणतो, आजची वर्तमानपत्रं हे मित्राचेच काम करतात. वर्तमानपत्राचे महत्त्व समजावे म्हणून मोठा भाऊ छोट्या भावाला कवितेतून कोडे घालतो. 

'जगात कुठेही खुट्ट जरी वाजले 

दुसर्‍या दिवशी त्याने, अचूक सांगितले 

सकाळच्या चहासोबत, येऊन पडते हातात 

ज्ञान, रंजनाचे कामही, कोण बरं करतात?' 

मोठ्या भावाने समजावून सांगितल्यामुळे छोट्या भावाचे मतपरिवर्तन होते आणि तो नियमित वर्तमानपत्र वाचायला लागतो. अशी ही एक विचारप्रवृत्त करणारी आणि वर्तनात परिवर्तन घडवून आणणारी नाट्यछटा आहे. 

'माझं मिरचीपुराण' ह्या नाट्यछटेत चक्क एक मिरची रंगमंचावर अवतरली आहे. आपली ओळख करून देताना ती म्हणते :

'आधी असते हिरवी, नंतर होते लाल 

जपून खा मला, न्हायतर होतील तुमचे हाल'. 

अशी ही ठसकेबाज लवंगी मिरची कोल्हापूरची. 

त्यामुळे तिच्या भाषेत रांगडेपणा आहे. ही मिरची आपल्यातली विविधता आणि उपयुक्तता वर्णन करून सांगते. आपले औषधी गुणधर्मही सांगते. तिने मिरचीत होणाऱ्या भेसळीबद्दल सांगून सावध केले आहे. थेट शेतातून आलेली असल्यामुळे, स्वाभाविकपणे ही मिरची ग्रामीण बोलीभाषेत बोलते. आपल्या वाढलेल्या किंमतीबद्दल ती बिनधास्तपणे म्हणते, 'ज्याच्या खिशात दाम, त्याचं होईल काम'. यातून तिचा अंगभूत तिखटपणा दिसून येतो. 

लहान मुले एवढ्या-तेवढ्यावरून आपसांत भांडतात. एकमेकांशी अबोला धरतात. लवकरच सगळे विसरून लगेच एक होतात. तसाच काहीसा प्रकार 'निष्फळ भांडण' ह्या नाट्यछटेत घडला आहे. तू श्रेष्ठ का मी श्रेष्ठ, यावरून सीताफळ आणि पेरू ह्या दोन फळांचा आपसांत वाद झाला. सीताफळ स्वतःला श्रेष्ठ आणि पेरूला तुच्छ समजते. पेरू आपले औषधी गुणधर्म सांगतो आणि सीताफळाचे दोष दाखवून देतो. लवकरच दोघांनाही एकमेकांच्या गुणांचे मोल समजते. सीताफळाने आपसातील निष्फळ भांडण मिटवले आणि त्यांच्या भांडणाचे रूपांतर गोड मैत्रीत झाले. पेरूचा हा समजूतदारपणा सीताफळाला फारच आवडला. ज्यानं ही सुंदर सृष्टी निर्माण केली आणि चांगला विचार करण्याची, चांगलं पाहण्याची दृष्टी आपल्याला दिली, त्या विधात्याचे दोघांनीही आभार मानले. 

आपसातील मतभेद महत्त्वाचे नाहीत, तर एकोपा महत्त्वाचा आहे, समजूतदारपणा महत्त्वाचा संदेशच जणू लेखकाने ह्या नाट्यछटेत दिला आहे. 

एकनाथ आव्हाड यांनी दहापैकी सात नाट्यछटांतून सजीव पात्रांचा संवाद घडवून आणला आहे, तर तीन नाट्यछटांतून निर्जीव पात्रांचा संवाद घडवून आणला आहे. सजीव असोत का निर्जीव, ही पात्रे आपली भूमिका हुबेहूब वठवतात. ही पात्रे शहरी भाषा बोलतात, तितक्याच सहजपणे ग्रामीण बोलीभाषेतही बोलतात. ह्या पात्रांच्या संवादात जिवंत असा खेळकरपणा आहे. लेखकाने ह्या पात्रांचे भावदर्शन आणि स्वभावदर्शन फारच छान घडविले आहे. ह्या नाट्यछटांमध्ये विषयांची विविधता आहे. ह्या संवादात उचलली जीभ लावली टाळ्याला, काखेत कळसा आणि गावाला वळसा, आधी केले मग सांगितले, थांबला तो संपला, कल करे सो आज कर, आज करे सो अब, अशा लोकोक्ती, म्हणी, सुभाषिते आणि सुवचनांची अक्षरशः रेलचेल आहे. लेखकाने ह्या नाट्यछटांच्या माध्यमातून स्त्रीशिक्षणाचा आग्रह, वाचनसंस्कृतीचा आग्रह, कल्पकता, परमतसहिष्णुता आणि एकोपा ही मूल्ये अधोरेखित केली आहेत. सूर्यकांत सराफ यांनी ह्या पुस्तकाची पाठराखण केली आहे. लेखकाची मनोरंजनातून शिक्षण देण्याची दृष्टी आणि त्यांच्या नाट्यछटांची कल्पनारम्य सृष्टी कौतुकास्पद आहे! 

  • 'मला उंच उडू दे' (नाट्यछटासंग्रह) 
  • लेखक : एकनाथ आव्हाड 
  • प्रकाशक : ज्योती कपिले, जे. के. मीडिया, मुंबई 
  • मुखपृष्ठ व चित्रे : वसुधा साटम, मंगेश बागडे
  • पृष्ठे : ४० किंमत रु. ८०

पुस्तक परिचय :

डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group