नांदेड: आजच्या डिजिटल युगात अमली पदार्थांचे सेवन, सोशल मीडियाचा अतिवापर आणि सायबर गुन्हे ही तरुणांसमोरील गंभीर आव्हाने बनली आहेत. विद्यार्थ्...
नांदेड: आजच्या डिजिटल युगात अमली पदार्थांचे सेवन, सोशल मीडियाचा अतिवापर आणि सायबर गुन्हे ही तरुणांसमोरील गंभीर आव्हाने बनली आहेत. विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांच्या आहारी न जाता स्वतःसोबतच आपल्या मित्रपरिवारालाही यापासून दूर ठेवावे. वाहन चालवताना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळवण्यासाठी ‘डायल ११२’ या हेल्पलाइनचा प्रभावी वापर करावा, असे स्पष्ट आवाहन नांदेडचे पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन (IPS) यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि ‘स्वयंसिद्धा’ स्त्रीशक्ती उपक्रमाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या सभागृहात ‘अमली पदार्थ प्रतिबंध, महिला सुरक्षा व वाहतूक नियम’ या विषयावर विशेष जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाला विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष आणि ‘झूम’ प्रणालीद्वारे उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पीपीटीद्वारे दिले मार्गदर्शन पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी प्रभावी पीपीटी (PPT) सादरीकरणाद्वारे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. "अमली पदार्थांचे व्यसन केवळ एका व्यक्तीचे आरोग्य बिघडवत नाही, तर कुटुंब आणि संपूर्ण समाजाचे भवितव्य उद्ध्वस्त करते. तरुणाई ही देशाची सर्वात मोठी शक्ती असून तिच्या ऊर्जेचा सकारात्मक कामांसाठी वापर झाला पाहिजे," असे त्यांनी नमूद केले. तसेच रस्ते अपघात टाळण्यासाठी हेल्मेट, सीट बेल्टचा वापर आणि वेगावर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
कायदेशीर अधिकारांची जाणीव ठेवा: सुप्रिया केंद्रे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया केंद्रे यांनी महिला संरक्षणाचे कायदे, उपलब्ध शासकीय यंत्रणा आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर मार्गदर्शन केले. महिलांनी आपल्या कायदेशीर अधिकारांची जाणीव ठेवून सुरक्षिततेबाबत सजग राहावे, तसेच समाजात जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा, असे त्या म्हणाल्या.
मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर होते. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर दा. पवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. बाबासाहेब सुरवसे यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मारुती गायकवाड यांनी केले, तर ‘स्वयंसिद्धा’च्या समन्वयिका डॉ. नीना गोगटे यांनी आभार मानले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. संगीता माकोने, डॉ. शालिनी कदम, डॉ. योगिनी सातारकर, डॉ. बाबुराव जाधव, डॉ. राजकुमार मून, डॉ. नंदकुमार बोधगीरे आणि डॉ. रणजीत तेहरा यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS