राम दातीर
माहूर (प्रतिनिधी)आमदार भीमराव केराम यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून गोपू महामुने मित्र मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेली रुग्णवाहिका सेवा म्हणजे निव्वळ आगामी माहूर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेला राजकीय स्टंट असल्याची जोरदार चर्चा सध्या शहरात सुरू झाली आहे. १५ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले असले, तरी ही तत्परता केवळ मतदारांना आकर्षित करण्यासाठीच दाखवली गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांमधून केला जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून माहूर शहर आणि परिसरातील ग्रामीण भागातील रुग्ण वैद्यकीय सुविधा आणि रुग्णवाहिकेअभावी हाल सोसत आहेत. आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णांना वेळेवर तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी नेण्यासाठी वाहने उपलब्ध नसताना, तेव्हा या मित्र मंडळाला किंवा लोकप्रतिनिधींना रुग्णांचे हे हाल दिसले नाहीत का? असा रोखठोक सवाल आता जनता विचारत आहे. नगरपंचायतीच्या निवडणुका तोंडावर येताच अचानक उफाळून आलेला हा ‘सामाजिक कळवळा’ म्हणजे केवळ राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रकार असल्याची टीका होत आहे.
आयोजकांकडून यापूर्वी विविध जनहिताचे उपक्रम राबविल्याचा दावा केला जात असला, तरी निवडणुका जवळ आल्या की अशा प्रकारे प्रसिद्धीझोतात येण्यासाठी उपक्रम राबवायचे आणि निवडणुका पार पडल्यावर नागरिकांना वाऱ्यावर सोडायचे, ही जुनीच रणनीती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
केवळ निवडणुकीच्या तोंडावर रुग्णवाहिकेचे लोकार्पण करून स्वतःची आणि पक्षाची राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रयत्न असल्याचे जनता ओळखून असल्याचे बोलुन दाखवत आहे अशा ऐन निवडणुकीच्या वर्षात केलेल्या स्टंटबाजीला नागरिक बळी पडणार का, की योग्य वेळी याचा जाब विचारणार, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS