नांदेड: महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील दोन वरिष्ठ प्राध्यापकांना प्रदान करण्यात आला आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार यांना वर्ष २०२४-२५ साठी, तर नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर यांना वर्ष २०२५-२६ साठी या राज्यस्तरीय सन्मानाने गौरवण्यात आले. २५ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते पुणे येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर आणि कला शिक्षण संचालक डॉ. किशोर इंगळे उपस्थित होते.
विद्यापीठ परिसरात प्रशासकीय गतिशीलता, पारदर्शकता, संशोधन संस्कृतीचा विकास आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांसाठी दोन्ही प्राध्यापकांनी दिलेले योगदान उल्लेखनीय ठरले आहे. या यशाबद्दल कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आणि प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी दोन्ही पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले. सलग दोन वर्षांचा हा सन्मान विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी उंची देणारा ठरला आहे.

COMMENTS