नांदेड- मागील २५ ते ३० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील खरीप हंगामातील पिकांवर गंभीर संकट ओढवले आहे. पावसाअभावी सोयाबीन, कापूस, हळद, ऊस, उडीद, मूग यांसह विविध पिके करपून जाण्याच्या मार्गावर असून अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र चिंता आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने आणि वाढत्या उत्पादन खर्चातून उभी केलेली पिके ऐन हातातोंडाशी आलेली असताना पावसाच्या दीर्घ खंडामुळे उद्ध्वस्त होण्याची परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन नांदेड जिल्ह्यात पंचनामा व वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून शासनाच्या दुष्काळ निकषांनुसार कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी नांदेडचे खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे.
मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे याबाबत निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील पर्जन्यमानातील तूट, सलग कोरडा कालावधी, जमिनीतील घटलेली ओलावा पातळी, पिकांची सद्यस्थिती आणि जलस्रोतांची परिस्थिती लक्षात घेता परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः सोयाबीन पीक शेंगा भरण्याच्या महत्त्वपूर्ण अवस्थेत असताना पावसाअभावी पिके वाळण्यास सुरुवात झाली असून शेंगा अपुऱ्या राहणे, दाणे न भरणे आणि उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. कापूस, हळद, ऊस, तूर, मूग, उडीद यांसह इतर पिकांवरही पावसाच्या खंडाचा गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे तातडीने तालुकानिहाय पंचनामे व वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून नुकसानीचे मूल्यांकन करावे आणि परिस्थिती दुष्काळाच्या निकषांमध्ये पात्र ठरत असल्यास नांदेड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार चव्हाण यांनी केली आहे.
शेतकऱ्यांची परिस्थिती आणखी गंभीर होण्याची वाट न पाहता शासनाने तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. **कोरडा दुष्काळ जाहीर करणे, हेक्टरी १ लाख रुपयांची मदत देणे, पीकविमा नुकसानभरपाई तात्काळ मिळवून देणे, पीककर्ज माफ करून सातबारा कोरा करणे, नवीन पीककर्ज उपलब्ध करून देणे तसेच अनुकूल वातावरण असल्यास ढग बीजारोपणाचा पर्याय वापरणे**, या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी हेक्टरी १ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करावी*
*, तसेच पात्र शेतकऱ्यांना पीकविम्याची नुकसानभरपाई तात्काळ मिळवून द्यावी**, अशीही मागणी करण्यात आली आहे. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक भार वाढणार असल्याने *शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करून सातबारा कोरा करावा आणि पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी **तातडीने नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यावे**, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

COMMENTS