ता. प्र. कंधार कंधार तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात यावा. कोणतेही निकष न लावता शेतकऱ्यांना सरसकट प्राथमिक स्वरूपात तात्काळ हेक्टरी ५०...
ता. प्र. कंधार कंधार तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात यावा. कोणतेही निकष न लावता शेतकऱ्यांना सरसकट प्राथमिक स्वरूपात तात्काळ हेक्टरी ५० हजारांची मदत देण्यात यावी, तसेच पीक विमा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने कंधारच्या तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
२०२६ च्या खरिप हंगामात समाधानकारक पाऊस झाला नाही. पेरणी करताना पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना दुबार परणीचा सामना करावा लागला. गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला आलेले सोयाबीन, कापूस, हाळद व इतर पिके वाळून जात आहेत. यामुळे शेतकरी आस्मानी संकटात सापडला असून सरकार, मंत्री, आमदार दहिहांडीच्या नावाखाली अश्लील नृत्याचे कार्यक्रम ठेऊन व डीजेचे राजकारण करण्यात व्यस्त आहेत.१ जून ते आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५२०.९० मिलिमीटर पाऊस झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत ८२६.२० मिलिमीटर पाऊस झाला होता. सध्या जिल्ह्यात १६ तालुक्यांवर कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. मात्र, सर्व तालुक्यांच्या तुलनेत कंधार ९५.४, लोहा ८३.३, देगलुर ७७.५ आणि मुखेड ५१.३ मिलिमीटर पावसाची तूट झाली आहे. कंधार तालुक्यात सरासरी पेक्षा ९५.४ पावसाची तूट आहे. त्यामुळे कंधार तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात यावा. कोणतेही निकष न लावता सरसकट शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरुपात तात्काळ हेक्टरी ५० हजारांची मदत देण्यात यावी. तसेच पीक विमा मंजूर करण्यात यावा. अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व मंत्री व लोकप्रतिनिधीना कंधार तालुक्यात फिरु देणार नाही, असा इशारा शिवसेनेने कंधारच्या तहसीलदारांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनावर शिवसेनेचे तालुकाप्रमुख परमेश्वर पाटील जाधव, शिवसेनेचे लोहा-कंधार विधानसभा संघटक गणेश कुंटेवार, शिवसेना शहरप्रमुख अतुल पापीनवार, शिवसेनेचे तालुका संघटक पंडित देवकांबळे, कुरुळा सर्कलप्रमुख जि.एम.पवळे, राजू डफडे, एस.डी.बोटेवाड, अशोक तेलंग आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
या निवेदनाच्या प्रति राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना नेते आंबादास दानवे, छत्रपती संभाजीनगरचेन विभागीय आयुक्त, नांदेडचे जिल्हाधिकारी, कंधारचे उपविभागीय अधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत.
.

COMMENTS