कार्यकारी अभियंता कुरेशी यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे; रोहित्र बदलण्यासह विविध मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे आश्वासन किनवट : शेतीपंपा...

कार्यकारी अभियंता कुरेशी यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे; रोहित्र बदलण्यासह विविध मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे आश्वासन
किनवट : शेतीपंपांचा खंडित वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करावा, जळालेली व नादुरुस्त रोहित्रे त्वरित बदलावी तसेच किनवट उपविभागातील प्रलंबित वीज समस्या मार्गी लावाव्यात, या मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने मंगळवारी (दि. ८ सप्टेंबर) आक्रमक भूमिका घेतली. शेतकरी संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी किनवट येथील महावितरणच्या उपविभागीय अभियंता कार्यालयाला टाळे ठोकून ठिय्या आंदोलन केले.
किनवट तालुक्यातील गावठाण तसेच कृषी पंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यातच पावसाच्या खंडामुळे पिके संकटात असताना वीजपुरवठा सुरळीत नसल्याने उपलब्ध पाण्याचा उपयोग करून पिके वाचविणेही शेतकऱ्यांना कठीण झाले आहे.
किनवट उपविभागांतर्गत कृषी पंपांना वीजपुरवठा करणारी सुमारे १,५०० रोहित्रे आहेत. यापैकी अनेक रोहित्रे जळालेली किंवा नादुरुस्त असल्याने ती वेळेत बदलली जात नसल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. परिणामी शेतकऱ्यांना वारंवार वीज समस्येला सामोरे जावे लागत आहे.
शेतकरी संघटनेच्या प्रमुख मागण्या
शेतीपंपांचा वीजपुरवठा सुरळीत करून २४ तास सिंगल फेज वीज उपलब्ध करून द्यावी, जळालेली व नादुरुस्त रोहित्रे तातडीने बदलून त्यांच्या जागी नवीन रोहित्रे बसवावीत, बोधडी बुद्रुक परिमंडळांतर्गत पारडी येथील मंजूर विद्युत उपकेंद्र तात्काळ सुरू करावे, तसेच इस्लापूर परिसरातील वाढता विद्युत भार लक्षात घेऊन नवीन विद्युत उपकेंद्र मंजूर करावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
याशिवाय बोधडीसह तालुक्यातील सर्व विद्युत उपकेंद्रांवर एस.डी.टी. रोहित्रे बसवावीत, जेणेकरून शेतकऱ्यांना सिंगल फेज वीज उपलब्ध होईल, अशी मागणी करण्यात आली
शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि नियमित वीजपुरवठ्याचा लाभ मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. शेतात २४ तास वीज उपलब्ध राहिल्यास रात्रीच्या वेळी जंगली प्राण्यांच्या हल्ल्याचा धोका कमी करण्यासाठी प्रकाशाची सुविधा मिळू शकते, असे शेतकरी संघटनेने नमूद केले.
तसेच स्वातंत्र्याला ७५ वर्षांहून अधिक काळ उलटूनही वीजपुरवठ्यापासून वंचित असलेल्या गोकुळवाडी वस्तीला तात्काळ वीज जोडणी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
रोहित्रासाठी ४० ते ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप
आंदोलनाचे नेतृत्व करणारे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील यांनी महावितरणच्या कारभारावर गंभीर आरोप केले.
किनवट उपविभागात मोठ्या संख्येने रोहित्रे असतानाही एखादे रोहित्र जळाल्यानंतर ते तात्काळ बदलण्यासाठी राखीव रोहित्र उपलब्ध नसते. भोकर विभागातून रोहित्र मागविण्यासाठी महावितरणचे काही कर्मचारी व ठेकेदार शेतकऱ्यांकडे ४० ते ५० हजार रुपयांची बेकायदेशीर मागणी करतात,” असा आरोप कदम पाटील यांनी केला.
या प्रकारामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप करत, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
कार्यकारी अभियंता कुरेशी यांची घटनास्थळी भेट
आंदोलनाची माहिती मिळताच भोकर विभागाचे कार्यकारी अभियंता कुरेशी यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. शेतकऱ्यांनी मांडलेल्या विविध मागण्या रास्त असल्याचे मान्य करत संबंधित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचे लेखी व तोंडी आश्वासन त्यांनी दिले
या आश्वासनानंतर शेतकरी संघटनेने आंदोलन तात्पुरते मागे घेत कार्यालयाचे टाळे उघडले. मात्र दिलेल्या आश्वासनांची वेळेत पूर्तता न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला.
या आंदोलनात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोपानराव केंद्रे, शेतकरी संघटनेचे अशोक शेलार, गुलाब हराळे, चांदराव चव्हाण यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि तालुक्यातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
“गोकुळवाडीसारख्या वस्त्यांना आजही वीज नाही, ही दुर्दैवाची बाब”
“स्वातंत्र्याला ७५ वर्षांहून अधिक काळ उलटूनही गोकुळवाडीसारख्या वस्त्यांना वीज मिळत नसेल, तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा वीजपुरवठा मिळेपर्यंत शेतकरी संघटना संघर्ष करत राहील,” असा निर्धार रमेश कदम पाटील यांनी व्यक्त केला.
COMMENTS