सुरुवातीला 'नीट' (NEET) आणि आता 'टीईटी' (TET) परीक्षेच्या पेपरफुटीच्या लागोपाठ घडलेल्या धक्कादायक घटनांमुळे राज्यातील लाखो युवक आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी क्रूर खेळ खेळला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा-स्टॉलिन आडे (DYFI जिल्हाध्यक्ष )
शासनाकडून वारंवार कडक कायदे आणि उपाययोजनांच्या घोषणा केल्या जातात; मात्र प्रत्यक्षात पेपरफुटीचे प्रकार रोखण्यात सरकारला सातत्याने अपयश येत आहे. यामुळे स्पर्धा परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थी आणि पालकांचा विश्वास पूर्णपणे डळमळीत झाला असून तरुणांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या गंभीर घटनेची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री दादा भुसे आणि धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली.राज्यातील व देशातील पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करून यामागील संपूर्ण रॅकेट उघडकीस आणण्यात यावे, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या आणि या गैरप्रकारात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी, बेरोजगार तरुण व विद्यार्थ्यांना झालेल्या मानसिक, आर्थिक आणि शैक्षणिक नुकसानीची दखल घेऊन शासनाने योग्य उपाययोजना कराव्यात, भविष्यात पेपरफुटी रोखण्यासाठी अत्याधुनिक, सुरक्षित, भ्रष्टाचारमुक्त आणि पूर्णपणे पारदर्शक परीक्षा व्यवस्था तातडीने लागू करावी.या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई न झाल्यास आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा डिवायएफ च्या वतीने देण्यात आला आहे.आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.यावळी जिल्हाध्यक्ष स्टॅलिन आडे, जिल्हा सचिव इरफान पठाण,जिल्हा कमिटी सदस्य श्याम सरोदे, जय गायकवाड, जेतालाल राठोड, सुभाष गजभारे,प्रेमला पतंगे, करवंदा गायकवाड, अंबादास भंडारे, दिगंबर घायाळे, एस.एफ.आय चे पवन जगडमवार, प्रफुल काऊंडकर, आडेलू बोनगीर, सुनीता बोनगीर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.या आंदोलनास सीटू जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी पाठिंबा देत मनोगत व्यक्त केले.

COMMENTS