शहरात खुलेआम चालणाऱ्या या अवैध धंद्यांच्या विरोधात नागरिक आणि विविध संघटनांनी आवाज उठवला होता. तक्रारींची दखल घेत पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आणि काही दिवस हे अड्डे बंद राहिले होते. या कारवाईमुळे शहरात शांतता राहील, अशी आशा वाटत होती. मात्र, कारवाईचा धसका न घेता, ही अवैध साखळी पुन्हा सक्रिय झाली आहे. महिना भर बंद राहिल्यानंतर पुन्हा हे धंदे सुरू झाले आहेत.
शहरात जागोजागी मटका बुकीचे खुल्लेआम दुकानेच थाटल्याने शाळकरी मुले आणि तरुणाई मोठ्या प्रमाणावर भरकटत आहे. या व्यसनामुळे अनेकांची आर्थिक घडी विस्कटली असून, घरातील कष्टाचे पैसे या अवैध धंद्यांत जिरत आहेत. यामुळे कुटुंबांमध्ये कलह निर्माण होत आहेत.महाराष्ट्र शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातलेली असतानाही, माहूर शहरात प्रतिबंधित गुटख्याची खुलेआम विक्री सुरू आहे. अनेक पानटपरी आणि काही मोजक्या दुकानांमध्ये सर्रास गुटख्याची पाकिटे विकली जात आहेत.
"प्रशासनाने जर वेळीच ठोस आणि कायमस्वरूपी कारवाई केली नाही, तर माहूरच्या तरुण पिढीचे भवितव्य अंधकारमय होईल," अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. केवळ दिखाव्यासाठी धाड टाकून किंवा किरकोळ दंड आकारून हे धंदे थांबणार नाहीत. उलट, या धंद्यांच्या मुख्य सूत्रधारांवर (मास्टरमाईंड) कठोर कायदेशीर कारवाई करणे आता काळाची गरज बनली आहे.
आता पोलीस प्रशासन या अवैध धंद्यांच्या मुळावर घाव घालणार की पुन्हा एकदा 'जैसे थे' परिस्थिती राहणार, याकडे माहूरकरांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS