राम दातीर
माहूर ( प्रतिनिधी)आगामी माहूर नगर पंचायत २०२६ निवडणुकीच्या अनुषंगाने माहूरगडच्या राजकारणात एक मोठी खळबळजनक घडामोड समोर आली आहे. भाजपचे माजी ओबीसी तालुकाध्यक्ष संतोष प्रकाश तामखाने यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.या राजकीय भूकंपामुळे माहूर नगर पंचायतीच्या आगामी निवडणुकीची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नांदेड येथे पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात, नांदेड जिल्ह्याचे जेष्ठ नेते व माजी खासदार तथा विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर,नांदेड उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर,जिल्हाध्यक्ष वघामारे,मा.आ.सुभाष साबने, प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, नांदेड उत्तर ओ बी सी विभागाचे जिल्हा अध्यक्ष अभिषेक लुटे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष सोनकांबळे, किनवट/माहुर विधानसभेचे नेते सचिनभाऊ नाईक, विधानसभा अध्यक्ष वैजनाथ करपुडे पाटील, तालुकाध्यक्ष विजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत संतोष तामखाने यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचा 'घड्याळ' हातात बांधले.संतोष तामखाने यांच्याकडे असलेले तळागाळातील नेटवर्क आणि त्यांचे संघटनकौशल्य लक्षात घेऊन, पक्षप्रवेश करताच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या वतीने त्यांची माहूर शहराध्यक्षपदी तात्काळ निवड करण्यात आली. माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.माहूर नगर पंचायतीची निवडणूक अगदी तोंडावर आली असताना तामखाने यांनी घेतलेला हा निर्णय भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. ओबीसी घटकांमध्ये चांगली पकड असलेले नेतृत्व गमावल्यामुळे भाजपला या भागात आगामी निवडणुकीत फटका बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
दुसरीकडे, हा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी (अजित पवार गट) अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तामखाने यांच्या येण्याने पक्षाला माहूर शहरात मोठी ताकद मिळाली असून, आगामी नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अत्यंत मजबूत स्थितीत लढणार असल्याचा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.या नवीन राजकीय समीकरणांमुळे आता माहूर नगर पंचायत २०२६ ची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि रंजक होणार, हे मात्र नक्की!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी पक्षाध्यक्षांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
— संतोष प्रकाश तामखाने (नवनियुक्त शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माहूर)

COMMENTS