फादर थॉमस स्टीफन्सपासून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यापर्यंतच्या अनेक लेखक-कवींनी मराठी साहित्यात मोलाचे योगदान दिले आहे. वसई परिसरातील, ख्...
फादर थॉमस स्टीफन्सपासून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यापर्यंतच्या अनेक लेखक-कवींनी मराठी साहित्यात मोलाचे योगदान दिले आहे. वसई परिसरातील, ख्रिश्चन समुदायातील अनेक लेखक-कवी आजही तो वारसा नेटाने पुढे चालवत आहेत. अतिशय निष्ठेने मराठी भाषेची सेवा करत आहेत. जॉन गोन्सालविस हे त्यातील एक महत्त्वाचे नाव आहे. त्यांच्या 'कृतज्ञतेची ज्योत' ह्या लेखसंग्रहाला मी प्रस्तावना लिहिली आहे. हे पुस्तक ग्रंथालीने अतिशय सुंदर स्वरूपात प्रकाशित केले आहे. लेखकाने अगत्यपूर्वक पाठविलेल्या ह्या पुस्तकाच्या दोन प्रती आताच मिळाल्या. लेखक आणि प्रकाशकांचे हार्दिक अभिनंदन! माझ्या वाचक मित्रांसाठी पुस्तकाची प्रस्तावना इथे देत आहे.
'कृतज्ञतेची ज्योत' : उदात्त जीवनमूल्यांचा नंदादीप
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
पालघर जिल्ह्यातील वसई येथील लेखक जॉन गोन्सालविस हे मुंबई महापालिकेच्या सेवेत ३५ वर्षे ज्ञानदानाचे कार्य करून सेवानिवृत्त झाले आहेत. अध्यापन आणि लेखन ह्या दोन्ही क्षेत्रांत त्यांचा सारखाच हातखंडा आहे. ज्या ख्रिस्ती लेखकांनी मराठी भाषेची निरपेक्ष सेवा करून मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले, त्या प्रभावळीतील जॉन गोन्सालविस हे एक महत्त्वाचे नाव आहे. त्यांची उन्हातले झाड, युगप्रवर्तक, कावड, रूपवंत फुले, संस्कारासाठी दिनमाहात्म्य, शोध मानवाचा, असावे घरकुल, निवडक बोधकथा, आतला आवाज, ज्याच्या हाती पुस्तक इ. १२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी 'सुवार्ता' ह्या मासिकाच्या संपादनातही मागील ३० वर्षे महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला आहे. ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या त्यांच्या 'ज्याच्या हाती पुस्तक' ह्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा २०२२ सालचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे. याचा अर्थ असा, की जॉन गोन्सालविस यांच्या लेखनाला लोकमान्यतेसोबतच राजमान्यताही मिळाली आहे.
'कृतज्ञतेची ज्योत' ह्या नवीन संग्रहात वाचनीय असे १८ लेख आहेत. ह्या लेखांमध्ये विषयांची विविधता आहे. 'कृतज्ञतेची ज्योत' ह्या पहिल्याच लेखात लेखकाने कृतज्ञतेची फारच छान व्याख्या केली आहे. 'संस्कृतीच्या वेलीवर उमललेले सुंदर फूल म्हणजे कृतज्ञता'. कृतज्ञतेची इतकी सुंदर आणि सोपी व्याख्या जगात कोणीच केली नसेल. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाच्या जडणघडणीत अनेकांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लागलेले असतात. त्या सगळ्यांचे ऋण मानणे म्हणजे कृतज्ञता. या संदर्भात लेखकाने पु. ल. देशपांडे यांच्या 'जगातला सर्वात सुंदर चेहरा म्हणजे कृतज्ञ चेहरा' ह्या विधानाचा दाखला दिला आहे. ह्या जगात उपकाराची फेड अपकाराने करणाऱ्यांची संख्या अधिक आहे, हे लेखकाने येशू ख्रिस्ताच्या जीवनातील प्रसंगाचा दाखला देऊन समजावून सांगितले आहे. ह्या लेखात लेखकाने मानवी जीवनातील कृतज्ञता ह्या मूल्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ते करताना त्यांनी मेलडी बीट्टी, सानेगुरुजी, धनंजय कीर, मदर तेरेजा, माल्कम मगेरीज, विंदा करंदीकर, रॉल्फ वाल्डो इमर्सन आणि फ्रान्सची प्रसिद्ध गायिका एडिथ पिआफ यांची अवतरणे उद्धृत केली आहेत.
आपल्या समाजात निष्क्रिय लोकांचा एक वर्ग असतो, जो स्वतः काहीच करत नाही आणि चांगले काम करणाऱ्या लोकांना तो त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांचा ठरलेला एक प्रश्न असतो, 'काय फरक पडतोय?'
स्वतः काही करायचे नाही आणि इतरांनाही काही करू द्यायचे नाही, अशी ही वृत्ती! अशा लोकांना उत्तर देताना लेखकाने ठणकावले आहे, की गांधीजींनी मूठभर मीठ उचलले आणि ब्रिटिश साम्राज्याचा पाया खचला. छोट्याशा कृतीतून इतिहास बदलला. बाबा आमटे यांनी रस्त्याच्या कडेला पडलेल्या कुष्ठरोग्याची आर्त वाणी ऐकली आणि सेवेचे आनंदवन उभे राहिले. आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर जादव मोलाई पायेंग यांनी सुरुवातीला काही झाडे लावली आणि पुढच्या पन्नास वर्षांत तिथे मानवनिर्मित जंगल उभे राहिले. प्रत्येक छोट्या कृतीतून मोठा इतिहास घडत असतो. म्हणून लेखकाने अशा निष्क्रिय लोकांकडे दुर्लक्ष करून सक्रिय होण्याची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ लेखकाने दिलेली उदाहरणे फारच बोलकी आहेत. गांधीजी म्हणजे क्रियाशीलतेचे उत्तम उदाहरण! त्यांचे विधान डोळे उघडणारे आहे.
'कौन कहता है आसमान में सुराख नही हो सकता?
एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो'
ह्या कवी दुष्यंतकुमार यांच्या ओळींनी ह्या लेखाचा समारोप केला आहे.
'आपण हजार पावले जाऊ शकतो, परंतु प्रगतीचे पहिले पाऊल उचलायला हवे' ह्या चिनी म्हणीचा दाखला देऊन एक पाऊल उचलल्याने खूप काही फरक पडू शकतो, हे पटवून दिले आहे.
'काय फरक पडतोय?' असा अवसानघातकी प्रश्न विचारणा-यांना लेखकाने निरुत्तर केले आहे.
धर्मगुरू सदैव समाजाला देण्याचेच काम करत असतात. ज्ञान देतात, विचार देतात, आधार देतात, धर्म देतात, श्रद्धा देतात, मने उभारतात. धर्मगुरू आपले जीवन समाजाला समर्पित करतात. कधीकधी धर्मगुरूंच्या हातून चुका होतात. प्रेषितांचे पायदेखील मातीचे असतात. धर्मगुरू हेदेखील माणूस आहेत. तीसुद्धा भावभावना असलेली, हाडामांसाची व्यक्ती आहे. एक माणूस म्हणून आपण त्यांना समजून घ्यायला हवे. त्यांच्या मनाचा, कलेचा, गुणांचा, भावनांचा, क्षमतांचा आणि त्यांच्या मर्यादांचाही आपण विचार करायला हवा. कोणतीही व्यक्ती सर्वगुणसंपन्न नसते. ह्याला धर्मगुरूही अपवाद नाहीत, असे विचार '..... आणि देणे हा धर्म बनला' ह्या लेखात मांडले आहेत. ह्या संदर्भात लेखकाने पावलो कोयलो आणि व्हिक्टर ह्युगो यांच्या कादंबरीतील नायकांची उदाहरणे दिली आहेत. समाजाने अंतर्मुख होऊन विचार करावा, यासाठी कवी बा. सी. मर्ढेकर यांच्या
'आपुणी आपणास पाहावे
काढुनी चष्मा डोळ्यांवरचा'
ह्या ओळींचा दाखला दिला आहे.
पूर्वी आपल्या समाजात
'उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी' ही लोकोक्ती रूढ होती. पुढे शिक्षणाचा प्रचार-प्रसार झाला आणि ही लोकधारणा बदलली. 'उत्तम नोकरी, मध्यम व्यापार व कनिष्ठ शेती' अशी लोकधारणा रूढ झाली. काळाप्रमाणे जनमानस बदलत असते. शिक्षितांचे प्रमाण आणि स्पर्धा वाढल्यामुळे आता सरकारी नोक-यांचे प्रमाण कमी झाले आहे. म्हणून लेखकाला वाटते, की आता आपण आपली मानसिकता बदलायला हवी. उद्योजक हा काही आकाशातून टपकत नाही वा जमिनीतून उगवत नाही, तर तो निर्माण होण्यासाठी समाजाने मदतीचे खतपाणी घालावे लागते. आपण आपल्या शिक्षण व्यवस्थेत 'तुम्ही उद्योजक व्हा' हा विचार मनावर बिंबवत नाहीत, याबद्दल लेखकाने खंत व्यक्त केली आहे. 'स्वतंत्र व्यवसायात पडू या' ह्या लेखात लेखकाने उद्योजकतेचे बीजारोपण करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली आहे.
आमच्या पंखांना बळ द्या' हा लेख जरा वेगळ्या विषयावरचा आहे. हा लेख म्हणजे एका लहानग्याने आईवडलांना उद्देशून लिहिलेले पत्र आहे. हल्ली आईवडील आपल्या बालकांना समजून न घेता आपल्या अपेक्षांचे ओझे त्यांच्यावर लादत असतात. एकीकडे 'जीवनाचे अनुभव घेतल्यामुळे माणसाची ख-या अर्थाने सर्वांगीण प्रगती होते' असे सांगितले जाते आणि दुसरीकडे बालकांवर वेगवेगळे निर्बंध घातले जातात. 'स्कूल, ट्यूशन, स्पेशल क्लास, प्रोजेक्ट, एक्स्ट्रा होमवर्क, ॲक्टिव्हिटी ह्या सगळ्या धबडग्यात आमची परिस्थिती घाण्याला जुंपलेल्या बैलासारखी झाली आहे', अशी तक्रार ह्या बालकाने आपल्या पालकांकडे केली आहे. एका मुलाची तुलना दुसर्या मुलाशी केली जाते, हा आणखी एक अन्याय! पालक आम्हाला वेळ देत नाहीत, ही ह्या बालकाची तक्रार आहे. बालकांना मन, भावना, बुद्धी, स्वप्न, विचार, कल्पकता आहे, हे पालकांच्या लक्षातच येत नाही, ही ह्या बालकाची खंत आहे. रम्य ते बालपण ह्या गोष्टीचा सगळ्यांनाच विसर पडला आहे. हे बालक पालकांना सांगत आहे, की आजची पिढी चतुर, चाणाक्ष, हुशार, तल्लख आणि चपळ आहे. ती सगळं व्यवस्थित करील, हा विश्वास बाळगा. आम्हाला आमच्या कलाने पुढे जाऊ द्या, अशी कळकळीची विनंती ह्या बालकाने केली आहे. ह्या बालकाच्या निमित्ताने लेखकाने पालकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले आहे. 'सुजाण पालकत्व' म्हणजे काय, हे आता तरी लक्षात यायला हरकत नाही.
देवाच्या माये' ही इतर लेखांपेक्षा वेगळी अशी एक कथा आहे. आजोबा आणि नात जिनी यांच्या संवादातून ही कथा फुलत जाते. ख्रिश्चन भक्तिपरंपरेत 'मरिया माउलीचा नोव्हेना' नावाचा एक विधी केला जातो. लहान मुलांवर धार्मिक संस्कार व्हावेत, म्हणून असेल कदाचित. लहान लहान मुले-मुली सकाळी तयार होऊन, हातात प्लास्टिकच्या शोभिवंत फुलांच्या परडी घेऊन चर्चला जातात. मरिया मातेच्या पुतळ्याभोवती सगळी मुले अर्धवर्तुळाकार उभी राहतात. तिथे
'देवाचे माये, कामी पड आम्हाला
देवाचे माये, भागी मिळ आम्हाला'
हे प्रार्थनावजा गाणे म्हटले जाते. त्यानंतर फुलांची परडी माउलीच्या चरणाशी रिकामी केली जाते. पाच वेळा अशी 'रूपवंत फुले' उधळून बशी रिकामी केली जाते. ख्रिस्तेतर वाचकांना ह्या कथेच्या माध्यमातून ख्रिश्चन धर्मपरंपरेतील एका संस्काराची ओळख होते.
येशू ख्रिस्ताच्या प्रेरणेने गेल्या दोन हजार वर्षांत अनेक लेखक, कवी, कलावंत, संगीतकार, शिल्पकार यांनी प्रभू येशूची शब्दशिल्पे उभी केली आहेत. मूर्तिकारांनी, शिल्पकारांनी प्रभू येशूच्या प्रतिमा घडविल्या. त्यांतील पॉल, जेम्स, पीटर, टायटस, ज्यूड ही काही द्रष्ट्यांची ठळक नावे आहेत. लिओनार्दो दा व्हिंची याने सांता मारिया चर्चमधील 'लास्ट सपर' हे अजरामर चित्र चितारले. मायकलॲंजेलोने बायबल कथांवर आधारित अजोड कलाकृती घडविल्या. गोव्यातील ॲंजेलो फोन्सेका, उत्तर प्रदेशातील आल्फ्रेड डी थॉमस, सिस्टर जेनेविव्ह, बंगळुरूचे ज्योती साही यांनी येशू ख्रिस्तावर आकर्षक चित्रकृती साकारल्या आहेत. लेखक म्हणतात, ह्या सगळ्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचीच प्रेरणा आहे. फा. थॉमस स्टीफन यांनी मराठीत पद्यरूप 'ख्रिस्तपुराण' लिहिले. पंडिता रमाबाईंनी बायबलचे मराठीत भाषांतर केले. काहींनी येशूच्या जीवनावर नाटके लिहिली. फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सुबोध बायबल हा भावानुवाद केला. त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. ह्या सगळ्यांचा धांडोळा 'येशू ख्रिस्त : कलावंत घडवणारा कलावंत' ह्या लेखात घेतला आहे. ह्या सर्वांचा प्रेरणादाता प्रभू येशू ख्रिस्त आहे, ही लेखकाची श्रद्धा आहे.
वि. वा. शिरवाडकर तथा कविवर्य कुसुमाग्रज यांना उभा महाराष्ट्र 'तात्यासाहेब' ह्या नावाने संबोधत असे. ते कवी म्हणून जितके श्रेष्ठ होते, तितकेच ते एक माणूस म्हणूनही श्रेष्ठ होते. 'कुसुमाग्रज : एक मानवप्रेमी कवी' ह्या लेखात कुसुमाग्रजांच्या व्यक्तिमत्त्वाची फारच छान ओळख करून दिली आहे. सर्वसामान्य आणि उपेक्षित माणूस हा कुसुमाग्रजांच्या प्रेमाचा, आस्थेचा आणि आदराचाही विषय होता. मानवता हा केवळ त्यांच्या कवितेचाच नव्हे, तर जगण्याचा अविभाज्य भाग होता. अनेक छोट्या मोठ्या कलाकारांचे, साहित्यिकांचे ते आधारवड होते. नारायण सुर्वे यांच्या मुलाच्या लग्नात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. नाशिकचे शाहीर प्रताप परदेशी यांच्या पश्चात तात्यासाहेबांनी लोकसहभागातून पैसे जमवून परदेशींचे घर वाचवले होते. शांताबाई दाणी यांच्या शाळेला भरपूर मदत केली. तात्यासाहेबांनी तोरंगण हे आदिवासीबहुल गाव सर्वांगीण विकासासाठी दत्तक घेतले होते. ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम स्वतःसाठी खर्च न करता त्या पैशातून कुसुमाग्रज प्रतिष्ठानची स्थापना केली. त्यांनी आपल्या इच्छापत्रात आपल्या संपत्तीचा एक हिस्सा सेवाभावी संस्थांना दिला होता. असा हा माणसांवर मनापासून प्रेम करणारा हा आगळावेगळा कवी होता. ह्या लेखात लेखकाने तात्यासाहेबांच्या दानतीचे वेगवेगळे किस्से सांगून त्यांचे दातृत्व अधोरेखित केले आहे.
बाबा आमटे यांच्या जीवनावरील येशू ख्रिस्ताचा प्रभाव' हा लेख एखाद्या शोधनिबंधासारखा अभ्यासपूर्ण आहे. ह्या लेखात लेखकाने गोपीनाथ तळवलकरांपासून कुसुमाग्रजांपर्यंत, सुरेश भटांपासून विंदा करंदीकरांपर्यंत, श्रीकृष्ण पोकळेपासून सदानंद रेग्यांपर्यंत, वा. रा. कांतांपासून मंगेश पाडगावकरांपर्यंत, चंद्रकांत खोतांपासून गुरुनाथ धुरींपर्यंत, नारायण लाळेंपासून लोकनाथ यशवंतांपर्यंत अनेक लेखक कवींवर येशू ख्रिस्ताचा कसा प्रभाव जाणवतो, याचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतला आहे. बाबा आमटे यांना येशूचा क्रूस हा 'करुणेचा कलाम' वाटतो. येशू ख्रिस्ताने महारोग्यांच्या उद्ध्वस्त व रखरखीत जीवनाला करुणेचा स्पर्श व स्नेहाचा ओलावा दिला. बाबा आमटे यांनी त्याच्याही पुढे जाऊन आनंदवन फुलविले. म्हणूनच गांधीजींनी बाबांना 'अभयसाधक' ही उपाधी दिली होती. बाबा आमटे नेहमी येशू ख्रिस्ताचे गुणगान गात असत. ते नेहमी ख्रिश्चैनिटीच्या बाजूने उभे होते. त्यांच्या कवितेत येशू आणि त्याची करुणा याला कसा अग्रक्रम आहे, याचे दाखले दिले आहेत.
समाजकार्य म्हणजे वधस्तंभाची वाटचाल करणे, आत्मसमर्पण करणे याची जाणीव बाबा आमटे यांना होती, असे लेखकाला वाटते. 'ज्याच्या खांद्यावर क्रूस असतो, तो प्रेषित होतो आणि ज्याच्या खांद्यावर क्रूस नाही तो केवळ महंत होतो' असे बाबा आमटे यांनी त्यांच्या 'गांधी : एक युगमुद्रा' ह्या कवितेत लिहिले आहे. बाबा नेहमी म्हणत, 'मी कुणी मोठा नेता नाही, मी एक साधा समाजसेवक, सोशल मेकॅनिक आहे'. हे विधान वाचताना लेखकाला ख्रिस्ताच्या 'मी सेवा करवून घेण्यासाठी नव्हे, तर सेवा करण्यासाठी आलेलो आहे', या विधानाचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. ह्या लेखात लेखकाने येशू ख्रिस्ताचे जीवनकार्य आणि शिकवण बाबा आमटे यांच्या कवितेत कशी एकरूप झाली आहे, हे विविध अवतरणांसह अधोरेखित केले आहे.
लक्ष्मीबाई टिळक यांचे 'स्मृतिचित्रे' हे आत्मचरित्र म्हणजे मराठी साहित्यविश्वातील एक अभिजात साहित्यलेणे आहे. हे लक्ष्मीबाईंचे आत्मचरित्र असले, तरी ते रेव्ह. ना. वा. टिळक यांचे चरित्रही आहे. ह्या आत्मचरित्राचा सखोल अभ्यास करून जॉन गोन्सालविस यांनी ना. वा. टिळक यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखविले आहेत. टिळक जसे मातृप्रेमी होते, तसेच ते पुत्रवत्सल पिता होते. त्यांच्या अंगी काहीसा विक्षिप्तपणा होता, पण ते अतिशय विश्वासू होते. निष्कांचन योगी असलेल्या टिळकांच्या दातृत्वाचे काही दाखले लेखकाने दिले आहेत. परोपकारी वृत्तीचे टिळक सेवापरायण होते. प्लेगच्या साथीत त्यांनी रोग्यांची खूप सेवा केली. ख्रिश्चन धर्मप्रसार करत असताना त्यांचा दृष्टिकोन पूर्ण मानवतावादी होता. ख्रिश्चन धर्म स्वीकारला, तरी ते स्वदेशाभिमानी होते. त्यांनी आपले भारतीयत्व कधीच सोडले नाही. उलट त्यांनी ख्रिस्ती धर्माला अस्सल भारतीय साज चढविला. लक्ष्मीबाईंनी 'स्मृतिचित्रे' ह्या आपल्या आत्मचरित्रात संतापी, कोपिष्ट, लहरी, प्रेमळ, उदार, परोपकारी अशा गुणदोषांनी युक्त असलेल्या ना. वा. टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडविले आहे. तसेच एका सामान्य माणसाच्या संतपणाकडे, देवत्वाकडे झालेल्या वाटचालीचेही विलोभनीय दर्शन घडविले आहे.
महात्मा गांधी : एक वैश्विक प्रेरणास्रोत' ह्या लेखात लेखकाने गांधीजींच्या जीवनकार्याचा आणि विचारांचा जगभर कसा प्रभाव होता, हे अधोरेखित केले आहे. ते लिहितात, 'गांधीजींच्या विचारांचा भारत देशाप्रमाणेच जगातील विविध देशांतील विचारवंत, कलावंत, वैज्ञानिक, साहित्यिक, बुद्धिवंत यांच्यावर जितका प्रभाव होता, तितकाच गुणवंत, धनवंत, ज्ञानवंतांपासून सामान्य माणसांवरही प्रभाव होता'.
गांधीविचारांचा जनमानसात किती प्रभाव होता, याविषयीचा किस्सा मुळातून वाचण्यासारखा आहे. नोबेल विजेते शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन, मार्टिन ल्युथर किंग, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, नेल्सन मंडेला, म्यानमारमधील लोकशाहीवादी नेत्या आंग सान स्यू ची, फ्रेंच नाटककार रोमा रोलॉं, अमेरिकन चरित्रकार लुई फिशर, ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून, ख्यातनाम इतिहासकार अर्नाल्ड टॉयन्बी इ. मान्यवरांनी गांधीजींच्या विचारांचे आणि कार्याचे ऋण जाहीरपणे मान्य केले आहे. जगभरातील १ लाख ८ हजारावर लेखकांनी गांधीजींवर पुस्तके लिहिली आहेत. जगातील ७० देशांत गांधीजींचे पुतळे आहेत, यातच गांधीजींचे मोठेपण दडलेले आहे.
'ख्रिस्ताचे सच्चे अनुयायी' ह्या लेखात जॉन गोन्सालविस यांनी महात्मा गांधी हेच ख्रिस्ताचे सच्चे अनुयायी होते, असे म्हटले आहे. आपल्या ह्या विधानाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी एस. के. जॉर्ज, किंग्सले मार्टिन आणि सुप्रसिद्ध इंग्रज ग्रंथकार जॉन गंथर यांच्या अवतरणांचे दाखले दिले आहेत. 'सूडबुद्धीने वागू नका' ह्या येशूच्या उपदेशाचा गांधीजींच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. भगवद्गीतेने जेवढा मी प्रभावित झालो, तेवढाच येशूच्या ह्या उपदेशाने मी प्रभावित झालो, असे गांधीजी सांगत. गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमाच्या भिंतीवर येशू ख्रिस्ताचे चित्र होते. गांधीजी येशू ख्रिस्ताला 'सर्व सत्याग्रहींचा राजा' मानीत असत. नोबेल पारितोषिक विजेत्या रोमा रोलॉंसारख्या फ्रेंच साहित्यिकाने गांधीजींचे वर्णन 'आधुनिक ख्रिस्त : महात्मा गांधी' अशा शब्दांत केले आहे.
गांधीविचार कधीच कालबाह्य होणार नाही. उलट बाबा आमटे यांनी त्यांच्या 'गांधी : एक युगमुद्रा' ह्या कवितेत लिहिले आहे :
'काळाच्या भाळावर उमटलेली
ही तप्त युगमुद्रा
कोणत्याही इतिहासाला
पुसून काढता येणार नाही'.
एका माथेफिरूने दि. ३० जानेवारी १९४८ रोजी गोळ्या घालून गांधीजींना ठार मारले असले, तरी मानवतावादी गांधीविचार कोणीही मारू शकले नाहीत. 'गांधीजींच्या मरणाचे स्मरण' ह्या लेखात लेखकाने गांधीविचारांची कालातीतता अधोरेखित केली आहे. बाबा आमटे म्हणतात, 'गांधीजींच्या विचारप्रणालीला या शतकात काय, पण पुढच्या कोणत्याही शतकात पुसून टाकता येणार नाही. जोपर्यंत गरज आणि हाव या दोहोंमधील झगडा चालू आहे, तोपर्यंत गांधीजींची तत्त्वे सुसंगत आहेत. त्यामुळेच मी अत्यंत आत्मविश्वासाने हे साहसी विधान केले आहे, की गांधीजींची तत्त्वे माझ्या काळापेक्षा एकविसाव्या शतकात जास्त सुसंगत ठरतील'.
बाबा आमटे यांच्या ह्या विधानाचा आज पावलोपावली प्रत्यय येतो आहे.
हे स्वातंत्र्यदेवी' ह्या छोटेखानी लेखात लेखकाने स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षांचा लेखाजोखा मांडला आहे. हल्ली आम्हाला आमच्या सर्वसमावेशक संस्कृतीचा विसर पडला आहे. जातीयता आणि धर्मांधतेने पुन्हा डोके वर काढले आहे. भारत आणि इंडिया या दोन मनोवृत्तीत हा देश विभागला गेला आहे. मूठभर लोकांच्या हातात सत्ता आणि संपत्तीचे केंद्रीकरण झाले आहे. स्त्रीभ्रूणहत्या वाढल्या आहेत. आजही आपल्या देशात स्त्री सुरक्षित नाही. याबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत ह्या दुर्दैवी घटनांबद्दल स्वातंत्र्यदेवीसमोर गा-हाणे मांडले आहे. शेवटी 'प्रत्येक भारतीयाच्या अंतर्यामी माणुसकीची ज्योत तेवत राहो' अशी प्रार्थना केली आहे. हे एक प्रकारचे पसायदानच आहे!
एकेकाळी 'मराठी ही मरणपथाला लागलेली भाषा आहे' असे इतिहासाचार्य वि. का. राजवाडे म्हणाले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात कवी माधव जुलियन यांनी 'मराठी असे आमुची मायबोली। जरी आज ती राजभाषा नसे' अशी खंत व्यक्त केली होती. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा झाली. दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. तरीसुद्धा आजही मराठी भाषेच्या दुर्दैवाचे दशावतार संपलेले नाहीत. 'मराठी भाषेचे संवर्धन व विकास' ह्या लेखात जॉन गोन्सालविस यांनी मराठी भाषेच्या दुरवस्थेच्या कारणांचा शोध घेऊन मराठीच्या विकासासाठी काही उपायही सुचविले आहेत.
मराठी माणसाला आपल्या भाषेच्या वापराबाबत न्यूनगंड जाणवतो, हे याचे पहिले कारण आहे. आमची मातृभाषा गेल्या ६५ वर्षांत ज्ञानभाषा होऊ शकली नाही. १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात मराठी पुस्तके विकत घेऊन वाचायची सवय नाही. म्हणावे तसे अनुवाद होत नाहीत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढत चालली आहे आणि मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत चालल्या आहेत. मराठीच्या वापराबाबत सरकारी यंत्रणा कमालीच्या उदासीन आहेत. मराठी भाषेचा विकास ही केवळ सरकारची जबाबदारी नसून विद्यार्थी, शिक्षक, पालक, नागरिक, साहित्यिक अशा सगळ्यांचीच आहे, असे लेखकाला वाटते. १९२५ साली पुणे येथे संपन्न झालेल्या पहिल्या शारदोपासक साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. दत्तो वामन पोतदार यांनी मराठी भाषेच्या विकासासाठी अष्टसूत्री सांगितली होती. प्रत्येक मराठी माणसाने ही अष्टसूत्री आचरणात आणली, तर मराठी भाषेच्या संवर्धनाला निश्चितच हातभार लागेल, असे लेखकाला वाटते.
'मरणाचे स्मरण' हा एक उत्कृष्ट असा विचारप्रवर्तक ललित निबंध आहे. ह्या निबंधात लेखकाने मृत्यूविषयक चिंतन मांडले आहे. ख्रिश्चन उपासनापद्धतीत, सहा आठवड्यांच्या उपवासकाळातील पहिल्या दिवसाला 'राखेचा बुधवार' असे म्हणतात. त्या दिवशी भाविकांच्या कपाळावर क्रुसाच्या चिन्हाने राख लावून मरणाचे स्मरण करून दिले जाते. मृत्यू ही एक अनिवार्य घटना आहे. दुर्गा भागवत यांनी आपल्या एका कवितेत मृत्यूचे स्वागत केले आहे. महात्मा गौतम बुद्ध, जागतिक कीर्तीचे शिल्पकार लिओनार्डो द व्हिन्सी, जर्मन कवी गटे, आल्डस हक्सले, देशबंधू चित्तरंजन दास, भगिनी निवेदिता, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, जगप्रसिद्ध चित्रकार मायकेल आंजेलो, संत पॉल, सॉक्रेटिस, संत तुकाराम महाराज, कवी गोविंद, बेंजामीन फ्रॅंकलिन, कार्लो आकुतीस, रेव्ह. ना. वा. टिळक इ. मान्यवरांनी मृत्यूचे हसत हसत स्वागत केले होते. त्यांच्या शेवटच्या क्षणाची आठवण लेखकाने करून दिली आहे.
'जगणं म्हणजे पेरणं। मरणं म्हणजे उगवणं' ह्या ओळीने ह्या निबंधाचा समारोप केला आहे.
ह्या संग्रहातील 'गांधीबाबा' आणि 'प्रिय बाई' ह्या दोन, मुक्तछंदातील उत्कृष्ट कविता आहेत. 'गांधीबाबा' ह्या कवितेत लेखकाने महात्मा गांधी यांच्याशी मुक्त संवाद साधला आहे. ८ पृष्ठांच्या ह्या दीर्घ कवितेत गांधीचरित्राचा छान परामर्श घेतला आहे. कविवृत्तीच्या ह्या लेखकाने
'गांधीबाबा,
आमच्या अंगावर तुझी खादी
आमच्या डोक्यावर तुझी टोपी
आमच्या मुखात तुझी वचने
बाह्यांगी आम्ही गांधीवादी
परंतु अंतर्यामी संधीवादी'
अशा शब्दांत समकालीन राजकारणाचे आणि राज्यकर्त्यांचे चरित्र आणि चारित्र्य रेखाटले आहे.
'प्रिय बाई' ह्या कवितेत आपल्या शालेय जीवनातील शिक्षिकेसोबत संवाद साधला आहे. लेखकाने बाईंच्या स्पर्शात मातेचे वात्सल्य अनुभवले आहे. त्याविषयीची कृतज्ञता ह्या शब्दांतून व्यक्त झाली आहे. बाईंच्या शिकवणीमुळे आपण परीक्षार्थी न बनता जीवनार्थी बनलो, याविषयी समाधान व्यक्त केले आहे. धन्य ती शिक्षिका आणि धन्य तो विद्यार्थी!
कृतज्ञतेची ज्योत' ह्या संग्रहातील ललितरम्य शैलीतील सर्वच लेख अतिशय वाचनीय आहेत. प्रत्येक लेख काही ना काही विचार देऊन जातो. सर्वच लेखांतून लेखकाने जीवनमूल्यांची बाग फुलविली आहे. ह्या लेखांतून कृतज्ञता, सक्रियता, दातृत्व, उद्योजकता ह्या मूल्यांचा परिपोष झालेला आहे. भावनिकदृष्ट्या शुष्क होत चाललेल्या आजच्या ह्या कालखंडात संत-सत्पुरुषांच्या सदाचरणाचे आदर्श वाचकांच्या समोर उभे केले आहेत. 'मी' ऐवजी 'आम्ही' हा सर्वसमावेशक विचार रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. सामाजिकदृष्ट्या निष्क्रिय आणि उदासीन होत चाललेल्या समाजमनाला क्रियाशीलतेच्या मार्गावर वळविण्याचा प्रयत्न केला आहे. चांगुलपणाची सुरुवात स्वतःपासून केली, तर संपूर्ण समाजजीवन चांगले होऊ शकते, हा संदेश दिला आहे. ह्या लेखनात जसे आत्मचिंतन आहे, तसेच समाजचिंतनही आहे. ह्या लेखनातील लेखकाची मूल्यदृष्टी फार महत्त्वाची आहे.
हा लेखसंग्रह म्हणजे ख्रिस्ती जीवनपद्धतीपासून मानवतावादी जीवनपद्धतीकडे नेणारा सुंदर असा राजमार्ग आहे.
'आमच्या पंखांना बळ द्या' ह्या लेखाच्या माध्यमातून बालभावविश्वाकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी दिली आहे.
'देवाच्या माये' ह्या लेखाच्या माध्यमातून ख्रिस्ती उपासना पद्धतीची ओळख करून दिली आहे.
रेव्ह. ना. वा. टिळक, कविवर्य कुसुमाग्रज आणि बाबा आमटे ह्या शब्दप्रभूंच्या व्यक्तिमत्त्वाच्या वेगवेगळ्या पैलूंची ओळख करून दिली आहे. स्वातंत्र्यदेवीशी साधलेल्या संवादातून देशवासियांना आत्मपरीक्षणासाठी प्रवृत्त केले आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कृतियुक्त कार्यक्रम समोर ठेवला आहे.
मृत्यूकडे स्वागतशीलतेने पाहण्याची दृष्टी दिली आहे.
जॉन गोन्सालविस यांची भाषाशैली आणि लेखनशैली अतिशय ओघवती आहे. चिंतनशीलता हा ह्या लेखनाचा स्थायीभाव आहे. ह्या पुस्तकात लेखकाचे सुधारणावादी, सकारात्मक आणि चिंतनशील व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित झाले आहे. उदात्त मानवी मूल्यांचा आग्रह धरणारे हे पुस्तक प्रत्येक मराठी कुटुंबात असलेच पाहिजे, असे मला वाटते. हा संग्रह वाचकाच्या मनात कृतज्ञतेची ज्योत प्रज्वलित करील, असा विश्वास वाटतो.
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com

COMMENTS