डॉ. नीलिमा गुंडी ह्या कवयित्री, समीक्षक, भाषाअभ्यासक, तसेच बालसाहित्यकार असून त्यांची ३६हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या चार पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचे पुरस्कार मिळाले असून त्यात दोन बालकवितासंग्रहांचा समावेश आहे. मनोरंजनातून मराठी भाषेचे शिक्षण देणारे त्यांचे 'अर्थाचा पत्ता सापडला!' हे पुस्तक नुकतेच पुण्यातील विश्वास प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या, राज्य मंडळाच्या, शालान्त परीक्षेच्या निकालात मराठी प्रथम भाषा ह्या विषयात ८०,८०३ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. ह्या निकालातून मातृभाषेतील नापासांचे हे मोठेच धक्कादायक चित्र समोर आले आहे. अर्थात दरवर्षी थोड्याफार फरकाने हे चित्र असेच असते. परवाच्या निकालानंतर ह्या विषयावर, विविध माध्यमांत, विविध स्तरांवर खूप सखोल चर्चा झाली. काहींनी विद्यार्थी नाही, तर आमची 'मराठी भाषाच नापास झाली' असे म्हटले आहे. दहा वर्षे मातृभाषेतून शिक्षण घेतल्यानंतरही दहावीच्या परीक्षेत इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असतील, तर याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ असा की, आमच्या शालेय शिक्षणात मातृभाषा मराठीचा पाया अत्यंत कच्चा आहे. मराठी माध्यमातील मराठी विषयाची ही अवस्था आहे, तर इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मराठीची अवस्था विचारायलाच नको. तिथे तर इंग्रजीला प्रमुख आणि मराठी भाषेला दुय्यम स्थान दिले जाते.
आपल्या शालेय शिक्षणातून मराठी भाषेतील श्रवण, वाचन, लेखन, भाषण आणि संभाषण ही कौशल्ये व्यवस्थित विकसित केली जात नाहीत.
अजूनही, पाठ्यपुस्तक वाचून दाखवणे म्हणजेच मराठीचे अध्यापन, हीच धारणा दृढ झालेली आहे. आमचे मराठीचे अध्यापन पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जात नाही. भाषेची गोडी निर्माण करण्यासाठी काही अभिनव उपक्रम होताना दिसत नाहीत. जे होतात ते फारच अपवादात्मक आहेत. आपले अध्ययन-अध्यापन 'घोका आणि ओका' ह्या तत्त्वावर, केवळ वर्गोन्नतीच्या दिशेने चालते. त्यामुळे दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना स्वतःचे संपूर्ण नाव शुद्ध लिहिता येत नाही. एक वाक्य धड बोलता येत नाही. व्यवस्थित संवाद साधता येत नाही. उपक्रमशीलतेअभावी आजही विद्यार्थ्यांच्या मनात मराठी भाषेविषयी भयगंड आहे. आपण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करत असलो, तरी आपले आपल्या मातृभाषेच्या शिक्षणाकडे अजिबात लक्ष नाही, हे आम्हाला मान्य केलेच पाहिजे. एकदा हे मान्य केले, की ते सुधारण्यासाठी काय करता येईल, याचा विचार सुरू होतो. त्या सुधारणेच्या दृष्टीने डॉ. नीलिमा गुंडी यांचे हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे.
श्रवण, म्हणजेच कान देऊन ऐकणे ही भाषाशिक्षणातील पहिली महत्त्वाची पायरी असते. न चुकता श्रुतलेखन कसे करायचे, अक्षराला काना कसा द्यायचा, जोडाक्षरे कशी लिहायची, रफार आणि ऋकार कसे द्यायचे, विसर्ग कुठे वापरायचा, लिहिताना अक्षरांचा क्रम चुकल्यावर शब्दाचा अर्थ कसा चुकतो, विरामचिन्हांचा वापर कुठे आणि कसा करावा, शब्दांवर शिरोरेषा देणे का आवश्यक असते, लेखनातील टिंबांची भाषा कशी समजून घ्यायची, समानार्थी शब्द कसे शोधायचे, म्हणजे कोश कसे हाताळायचे, विभक्ती प्रत्यय आणि शब्दयोगी अव्यय कसे लिहायचे, कवितेचा अर्थ कसा लावायचा, शब्दांचा काळाशी मेळ कसा जुळवायचा इ. १५ बाबी लेखिकेने १५ गोष्टींच्या माध्यमातून खुबीदार पद्धतीने आणि रंजक शैलीत समजावून सांगितल्या आहेत.
यातील काही गोष्टींत आईसोबत किमया नावाची मुलगी येते. काही गोष्टींत केदार नावाचा मुलगा येतो, तर काही गोष्टींत दोघेही येतात. त्यांच्या शंकांचे निरसन करताना एक एक गोष्ट फुलत जाते. शब्दामधली अक्षरे नीट लिहिली नाहीत, तर अर्थाचा पत्ता चुकतो. शब्दलेखनात त्रुटी राहिली तर अर्थापर्यंत पोहोचण्यात अडथळा येतो. लेखन-वाचन उत्तम होण्यासाठी 'कानसेन' व्हावे लागते, हे आई खेळकरपणे पटवून देते.
जोडाक्षरे म्हणजे अक्षरांची मैत्री असते. जोडाक्षरे लिहिताना काही वेळा आडवी जोडणी करावी लागते, तर काही वेळा उभी जोडणी करावी लागते. 'जोडाक्षरात 'र' कधी डोक्यावरचा तुरा होतो आणि कधी पोटातला सुरा होतो', अशी वाक्ये वाचताना मजा येते. अशा वाक्यातून भाषाभ्यासातली गंमत कळत जाते.
कर्तृत्व, वक्तृत्व, कृष्ण, घृष्णेश्वर, पृष्ठ, मृण्मयी ह्या शब्दांत रफारही येतात आणि ऋकारही येतात. त्यामुळे अनेक जण हे शब्द लिहिताना हमखास चुकतात. ज्याला नीट उच्चार करता येतो, त्याला तो शब्द नीट लिहिता येतो. ग्रह आणि गृह हे शब्द वाचताना आणि लिहिताना गल्लत झाली, की त्यांच्या अर्थाचा पत्ता बदलतो. म्हणून आधी नीट वाचता आले पाहिजे. नीट उच्चार करता आला पाहिजे.
शुद्ध बोलता आले म्हणजे नेहमीच शुद्ध लिहिता येईल, असेही नाही. 'सुख' ह्या शब्दात विसर्ग नसतो, पण 'दु:ख' ह्या शब्दात विसर्ग असतो. अशा वेळी मुले लिहिताना हमखास चुकतात. शब्दशः, क:पदार्थ, अंत:करण, विशेषतः, स्वतः, प्रात:काल ह्या शब्दांमधे विसर्ग का आणि कसे द्यायचे, हे केदार आणि आईच्या संवादातून उलगडत जाते.
एकदा ऐकायला तुमचे कान तयार झाले की भाषेतील गमतीजमती आपोआप कळतात, हे लेखिकेने पुन:पुन्हा सांगितले आहे. आई केदारला सांगते, 'लेखनविषयक नियमांचं पुस्तक वाचत जा. लेखनाचे नियम तोंडपाठ पाहिजेत'.
भाषेत अक्षरांचा एक विशिष्ट क्रम असतो. रांगेचे नियम अक्षरांनाही लागू असतात. अक्षरांनी आपली रांग मोडली, की बिघडलंच सगळं. अर्थाचं कुलूप उघडायला शब्दांमधली अक्षरं ठरावीक क्रमानं-रांगेतच हवीत. राधा, मका, ताजे, खारे, वारे ह्या शब्दांतील अक्षरांचा क्रम बदलला, की त्यांचा अर्थही बदलतो, हे आईने फारच खुमासदार पद्धतीने समजावून सांगितले आहे. अतिशय प्रेमळ पद्धतीने समजावून सांगणारी ही आई म्हणजे लेखिका डॉ. नीलिमा गुंडी ह्याच आहेत, असे वाटते.
गटात न बसणारा शब्द शोधून काढण्यासाठी आधी त्या शब्दांची 'उकल' करावी लागते. आईने किमयाला असे काही शब्द घालून तिची होणारी फजिती तिच्या लक्षात आणून दिली आहे.
काही माणसे तोंडाने न बोलता खाणाखुणा करतात. तशाच भाषेतही काही खाणाखुणा असतात. त्यांनाच 'विरामचिन्हे' म्हणतात. आईने केदारला विरामचिन्हे कुठे, कशी आणि का वापरायची हे फारच छान रंजक पद्धतीने समजावून सांगितले आहे.
शब्दांच्या डोक्यात शिरोरेषा द्यायच्या असतात. त्यामुळे शब्दांची निश्चित हद्द समजते. शब्दावर आवश्यक तिथे शिरोरेषा दिली नाही, तर अर्थाचा अनर्थ होतो. उदा. वसंतगडकर हे एक आडनाव आहे. ते जर तोडून, 'वसंत गड कर' असे लिहिले, तर त्याचा वेगळाच अर्थ निघतो. म्हणून शिरोरेषा देताना नेहमी दक्ष राहावे लागते.
किमया आणि केदारची आई ह्या सगळ्या गोष्टी अतिशय हसत-खेळत शिकविते, त्यामुळे शिकणाऱ्यांना कंटाळा येत नाही. उलट त्यांची शिकण्यातली गोडी वाढत जाते.
मराठीत वेगवेगळे कोश आहेत. त्यातून अनेक समानार्थी शब्द सापडतात. ते वाचताना खूप मजा येते. शिक्षकांनी आणि पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना हा कोश हाताळण्याचा आनंद मिळवून दिला पाहिजे.
विभक्ती प्रत्यय आणि शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडून येतात. एखादी माळ गुंफताना जसे आपण मणी गुंफतो, तसे या प्रत्ययांमुळे शब्द एकमेकांच्या जवळ येऊन अर्थ जोडून देतात. यांचे रूप लहान पण काम महान असते.
कवितेत आलेल्या शब्दांचा क्रम जुळविणे (अन्वय लावणे) आणि त्यांचा अर्थ लावणे ही एक कला आहे. शब्दांचे अर्थ माहीत असले, की ही कला आपोआपच अवगत होते.
हल्ली आपण परिमळ, गोपाळ असे शब्द वापरतो, पण ज्ञानेश्वरांच्या काळात परिमळु, गोपाळु असे उकारान्त शब्द वापरले जात. अशा प्रकारे लेखनाच्या काळाशी त्या शब्दांचा मेळ जुळवावा लागतो, तरच अर्थाचा अचूक पत्ता सापडतो. काळाच्या प्रवाहामुळे नदीच्या पाण्याचा रंग बदलतो, तसेच काळानुसार भाषेचे रंग-रूप बदलते, हे ध्यानात घेतले पाहिजे.
हे पुस्तक वाचल्यावर आपल्या लक्षात येते, की मराठी भाषा शिकायची ती केवळ मार्क्स मिळविण्यासाठी नाही, तर आनंद मिळविण्यासाठी. आजच्या विद्यार्थ्यांना हा आनंद कितपत मिळतो, हा संशोधनाचा विषय आहे.
अर्थाचा पत्ता सापडला' हे म्हटले तर बालसाहित्याचे पुस्तक आहे आणि म्हटले तर सुलभ भाषाशिक्षणाचे पुस्तक आहे. हेच नियम जर रूक्षपणे सांगितले असते, तर हे व्याकरणाचे पुस्तक झाले असते. पण हे तर लालित्यपूर्ण शैलीत लिहिलेले गोष्टींचे पुस्तक आहे. लेखिकेने विद्यार्थ्यांच्या वाचनातील आणि लेखनातील संभाव्य चुका टाळण्यासाठी गमतीदार युक्त्या सांगितल्या आहेत. डॉ. नीलिमा गुंडी यांच्याकडे भाषाशिक्षणाची मर्मदृष्टी आहे आणि कल्पकताही आहे. त्यामुळे हे पुस्तक अतिशय वाचनीय झाले आहे. गोष्टींची शीर्षके अतिशय आकर्षक आहेत. प्रत्येक गोष्टीच्या शेवटी काही उपक्रम दिले आहेत. खरे तर हे अतिशय रंजक असे भाषिक खेळ आहेत. शाळेत शिक्षकांनी आणि घरी पालकांनी मुलांसोबत हे भाषिक खेळ खेळले, तर बालकांचा भाषाशिक्षणाचा प्रवास सुखद आणि आनंददायी होईल. हे पुस्तक जसे बालकांसाठी उपयुक्त आहे, तसेच ते शिक्षक आणि पालकांसाठीहीउपयुक्त आहे. हे पुस्तक वाचल्यावरच आपल्या अभिजात मराठी भाषेचे सौंदर्य समजते.
- अर्थाचा पत्ता सापडला' (भाषाशिक्षणाच्या गोष्टी)
- लेखिका : डॉ. नीलिमा गुंडी
- प्रकाशक : विश्वास प्रकाशन, पुणे.
- मुखपृष्ठ : क्षितिज कुलकर्णी
- पृष्ठे : ६४ किंमत रु. १७०
- पुस्तक परिचय :
- डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
- sureshsawant2011@yahoo.com

COMMENTS