डॉ. प्रदीप आवटे यांची 'जादू की झप्पी' डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

  सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेले पुण्यातील डॉ. प्रदीप आवटे हे मराठीतील एक महत्त्वाचे लेखक-कवी आहेत. आपल्या पेशाचा भाग म्हणून त्या...

 

सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेले पुण्यातील डॉ. प्रदीप आवटे हे मराठीतील एक महत्त्वाचे लेखक-कवी आहेत. आपल्या पेशाचा भाग म्हणून त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या पोलिओ निर्मूलन कार्यक्रमात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात ह्या ३ राज्यांत सर्वेक्षण वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांनी विविध नियतकालिकांतून ललित, सामाजिक आणि आरोग्यविषयक विपुल असे लेखन केले आहे. बालनाट्य, कविता, मुलाखती, श्रुतिका यांच्यासह आकाशवाणीवरून त्यांचे विविध कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. दूरदर्शनवरील विविध कार्यक्रमांतही त्यांनी सहभाग नोंदविला आहे. 


कवी डॉ. प्रदीप आवटे यांचे 'माझ्या आभाळाची गोष्ट', 'धम्मधारा' आणि 'या अनाम शहरात' हे तीन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. 'जग्गूभैया जिंदाबाद' आणि 'आणखी एक स्वल्पविराम' ही त्यांची किशोरांसाठी प्रकाशित झालेली पुस्तके आहेत. 'अडीच अक्षरांची गोष्ट' हा त्यांचा ललित लेखसंग्रह असून त्यांनी 'नवा भूगोल घडवू' आणि 'सेंटपरसेंट आजचे न्यायालय' ही बालकुमारांसाठी लिहिलेली नाटुकली आहेत. मध्यंतरी काही काळ डॉ. आवटे यांनी बाळगोपाळांसाठी 'पाखरांची शाळा' ह्या मासिकाचे संपादनही केले आहे. 


डॉ. प्रदीप आवटे यांचा 'जादू की झप्पी' हा किशोर वाचकांसाठीचा कथासंग्रह सकाळ प्रकाशनाने २००८मध्ये प्रकाशित केला आहे. 

तो मला लेखकाने परवा अभिप्रायार्थ पाठविला आहे. 'जादू की झप्पी' ह्या कथासंग्रहात एकूण ११ कथा आहेत. 'फुटप्रिंट्स' ह्या कथेत लेखकाने वृक्षारोपणाचे महत्त्व फारच छान पद्धतीने समजावून सांगितले आहे. दैनंदिन कार्बन उत्सर्जनाचे गांभीर्य किशोर वाचकांच्या लक्षात आणून दिले आहे. ही कथा इयत्ता दहावीच्या, इंग्रजी माध्यमाच्या 'अक्षरभारती' ह्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांत समाविष्ट करण्यात आली होती. 

'जादू की झप्पी' ही कथाही छानच आहे! ह्या कथेत, 'प्रत्येक डॉक्टर हा मानव जातीचं दु:ख आणि वेदन यांचा निचरा करण्यासाठी घराबाहेर पडलेला गौतम बुद्ध असतो' हा संदेश फारच परिणामकारक पद्धतीने दिला आहे. अर्थात, 

हल्ली सगळेच डॉक्टर हा संदेश लक्षात ठेवतात का, हा खरा प्रश्न आहे!


'एका डायरीची हिरवीकंच पानं' ही कथा जबरदस्त आहे! ह्या कथेच्या नायिकेची संवेदनशीलता लाख मोलाची आहे!

'लढाई' ह्या कथेत बालविवाह प्रतिबंधाचा विषय अतिशय कौशल्याने छान हाताळला आहे!

ह्या कथेत सफदर हाश्मी यांच्या कवितेच्या ओळी चपखल बसल्या आहेत!

सफदर हाश्मी म्हणतात :

'रे रस्ते करणाऱ्यांनो, 

रे ओझी वाहणाऱ्यांनो, 

रे जोखड घेणा-यांनो, 

ग म भ न शिका आणखी 

उचला पेन्सिल पाटी

शिका अक्षरे कशी करावी 

शस्त्रे लढण्यासाठी'. 

शिक्षणाचा उपयोग शस्त्रासारखा करण्याचे हे आवाहन एकट्या उमीसाठी नाही, तर सगळ्यांसाठीच आहे. 


'सेल्फी विथ अ ट्रॅफिक पोलीस' ह्या कथेत सत्य विरुद्ध असत्य हा संघर्ष फारच छान चितारला आहे! सामान्य वाहतूक पोलीस राम पवार आणि धनदांडगे व्यापारी पेठे यांच्यातील स्वयंशिस्त विरुद्ध बेफिकीरपणा हा सुप्त संघर्ष अस्वस्थ करणारा आहे. माणूस कितीही मोठा आणि कितीही श्रीमंत असला, तरी त्याच्या अंतःकरणाला लबाडीची टोचणी असतेच. गांधीजींच्या पुतळ्याच्या साक्षीने हा सगळा प्रसंग घडतो, हे फार महत्त्वाचे आहे! दोन्ही पात्रं आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत! ही दोन्ही पात्रं लेखकाने फारच तटस्थपणे रंगविली आहेत. त्यामुळे वाचक न्यायाधीशाच्या भूमिकेत न शिरता दोघांनाही समजून घेतो. 


'फूटपट्टी' ह्या कथेचे शैक्षणिक मोल अनमोल आहे! बुद्धिमत्ता म्हणजे केवळ परीक्षेतील मार्क्स नव्हेत. बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या भवतालाशी, परिस्थितीशी समायोजन करण्याची क्षमता, हे प्रत्येक वर्गात शिकवण्याची गरज आहे. आपण परीक्षेतील मार्कांना अनाठायी महत्त्व देत आलोत. त्यामुळेच आजवर सगळी गोची झाली आहे. नीलेश आणि श्यामच्या माध्यमातून लेखकाने हे फारच छान पटवून दिले आहे. ही कथादेखील दहावी-बारावीच्या पाठ्यपुस्तकांत समाविष्ट करण्यासारखी आहे.

'करंट' ही दुर्दम्य जिद्दीची गोष्ट अतिशय वाचनीय आहे. ह्या कथेतल्या देवेंद्रची विजिगीषू वृत्ती खूप काही शिकवून जाते.


'जादू की झप्पी' ह्या कथासंग्रहातील सर्वच कथा मनोरंजन आणि मूल्यसंस्कार या बाबतीत सरस आहेत. ज्ञानाचा जन्म प्रश्नाच्या पोटी होतो, याचे प्रत्यंतर शेवटची कथा वाचताना येते.

पोरांच्या गृहपाठाच्या वह्यांमध्ये प्रश्नांची फुलपाखरे उडताहेत, ह्या वाक्यातून पुन:प्रत्ययाचा आनंद मिळतो, कारण विद्यार्थ्यांच्या गृहपाठाच्या वह्या तपासताना मी याचा अनुभव घेतला आहे.


डॉ. प्रदीप आवटे यांची कथा हाताळण्याची शैली अतिशय खास आहे! हे गोष्टींचं झाड फुलाफळांनी मस्त बहरलेलं आहे. लेखकाने प्रत्येक कथेतून मूल्यसंस्कांराची छान शिंपण केली आहे! हुंडा ही खरी लक्ष्मी नसून मुलगी हीच खरी लक्ष्मी आहे, असा संदेश त्यांनी दिला आहे. ह्या कथांच्या माध्यमातून लेखकाने हुंडाबंदी, संवेदनशीलता, परोपकार, क्षमाशीलता, अंधश्रद्धा निर्मूलन, लिंगभेदाचे उच्चाटन, पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरण संरक्षण, जिद्द, स्वतःच्या क्षमता आणि मर्यादा ओळखणे इ. मूल्ये बिंबवण्याचा छान प्रयत्न केला आहे. १५ ते १७ ह्या वयोगटातील, म्हणजे उमलत्या वयातील मुलामुलींसाठी ह्या कथा अतिशय उपयुक्त आहेत! भलेही हे पुस्तक ८ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेले असले, तरी यातील आशय आणि विषय जुने झालेले नाहीत. ते नित्यनूतन आहेत. ह्या पुस्तकाच्या निमित्ताने कथागुच्छ एकत्रितपणे वाचण्याचा आनंद मिळाला. हा आनंद मिळवून दिल्याबद्दल मी लेखकाचा अत्यंत आभारी आहे!

डॉ. सुरेश सावंत, नांदेड

sureshsawant2011@yahoo.com

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group