राजकीय वैमनस्यातून कारवाई केल्याचा संस्थाचालकाचा आरोप; शाळा सुरू होण्यास ५ दिवस शिल्लक असताना कारवाई केल्याने राज्यभरात तीव्र संताप भोकर (वि...
राजकीय वैमनस्यातून कारवाई केल्याचा संस्थाचालकाचा आरोप; शाळा सुरू होण्यास ५ दिवस शिल्लक असताना कारवाई केल्याने राज्यभरात तीव्र संताप
भोकर (विशेष प्रतिनिधी):नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. भोकर बाजार समितीने जिल्ह्यातील पहिली मोठी 'बुलडोझर कारवाई' करत चक्क इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतची शाळा थेट जमीनदोस्त केली आहे. १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास अवघे पाच दिवस उरलेले असताना, बुधवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे शाळेतील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असून, संपूर्ण राज्यात शिक्षणप्रेमी आणि राजकीय वर्तुळातून संतापाची तीव्र लाट उसळली आहे.
९९ वर्षांच्या लीजचा वाद न्यायालयात प्रलंबित
मिळालेल्या माहितीनुसार, भोकर बाजार समितीच्या जागेमध्ये २००३ पासून काँग्रेसचे नेते कै. बाबा गौड प्राथमिक शाळा आणि भागीरथाबाई माध्यमिक विद्यालय हे वर्ग सुरू होते. संस्थेने ही जागा बाजार समितीकडून ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर (लीज) घेतली होती. मात्र, काही काळाने जागा रिकामी करण्यावरून बाजार समिती आणि संस्थाचालकांमध्ये वाद निर्माण झाला. बाजार समितीने शाळा रिकामी करण्याची नोटीस बजावल्यानंतर संस्थाचालकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) यावरील अपील प्रलंबित आहे. असे असतानाही, पणन महासंघाच्या एका आदेशाचा आधार घेत बाजार समितीने ही घाईघाईने कारवाई उरकल्याचे बोलले जात आहे.
राजकीय द्वेषातून कारवाई: संस्थाचालक संदीप गौड
या कारवाईवर बोलताना संस्थाचालक संदीप गौड यांनी बाजार समिती आणि सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
"मी भोकर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवली होती. कोणत्याही दबावाला बळी न पडता मी माझी उमेदवारी मागे घेतली नाही, याच राजकीय द्वेषातून आणि वैमनस्यातून ही सूडबुद्धीची कारवाई करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाही ही अन्यायकारक कारवाई करण्यात आली," असा आरोप गौड यांनी केला.
राजकीय व सामाजिक क्षेत्रातून तीव्र निषेध
या बुलडोझर कारवाईचे पडसाद आता संपूर्ण जिल्ह्यात उमटू लागले आहेत. काँग्रेसचे उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव पावडे, नांदेड महानगर अध्यक्ष अब्दुल गफार, काँग्रेस प्रवक्ते बालाजी गाढे आणि काँग्रेस कार्यकर्ते पप्पू पाटील कोंढेकर आदी नेत्यांनी घटनास्थळी भेट देऊन या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे.
तसेच, राजकीय नेते खासदार रवींद्र चव्हाण यांनीही या कारवाईवर कडक शब्दांत बोट ठेवले आहे. ते म्हणाले:विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह
"हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आणि सर्वोच्च न्यायालयात अपील प्रलंबित असताना न्यायालयाचा अंतिम निर्णय येण्यापूर्वीच अशी घाईघाईने कारवाई करणे अनेक गंभीर प्रश्न निर्माण करते. लोकशाहीत कायद्याचा आणि न्यायप्रक्रियेचा सन्मान करणे हे सत्ताधाऱ्यांचे कर्तव्य असते. परंतु, विरोधी विचार मांडणाऱ्यांना किंवा राजकीय प्रतिस्पर्ध्यांना धडा शिकवण्यासाठी जर थेट शिक्षण संस्थांवर अशा कारवाया केल्या जात असतील, तर हा लोकशाहीचा नव्हे, तर हुकूमशाहीचा मार्ग आहे."
अवघ्या ५ दिवसांवर शाळा सुरू होण्याची तारीख आलेली असताना ही शाळा जमीनदोस्त करून बाजार समितीने नेमके काय साध्य केले? असा संतप्त सवाल पालक आणि शिक्षणप्रेमी विचारत आहेत. या कारवाईमुळे शाळेतील ३०० हून अधिक गरीब व सामान्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले असून, आता प्रशासन यावर काय तोडगा काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बाजार समितीने मात्र आपली कारवाई नियमांनुसार योग्य असल्याचे म्हटले आहे.

COMMENTS