*नांदेड दक्षिणचे शिवसेना आमदार आनंदराव बोंढारकर अधिवेशनात मांडणार लक्षवेधी ;* *मुख्यमंत्र्यांकडे १३ प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा
*नांदेड:*
*"राज्यात लाडकी बहीण झाली, लाडका भाऊ झाला... आता शासनाने 'लाडके मायबाप योजना' सुरू करून ६० वर्षांवरील सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ५,००० रुपये मानधन देऊन सन्मान करावा.* *वृद्धत्व हा गुन्हा नाही आणि बाबांचा सन्मान म्हणजेच महाराष्ट्राचा सन्मान आहे," अशी आर्त हाक फेस्कॉमचे उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांनी दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत त्यांनी महामहीम राज्यपाल मा. जिष्णू देव वर्मा यांना स्मरणपत्र पाठवून तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली आहे.*
*दुसरीकडे, मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात नांदेड दक्षिणचे शिवसेनेचे आमदार आनंदराव बोंढारकर हे या गंभीर विषयावर विधिमंडळात लक्षवेधी सूचना मांडणार आहेत. त्यामुळे या अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.*
*१० हजार ज्येष्ठांची मूक फेरी आणि मुख्य सचिवांचा आदेश गेल्या १० जून २०२६ रोजी नांदेड येथे १० हजार ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत 'वृद्धत्व हा गुन्हा नाही' अशी संदेश देत ऐतिहासिक मूक फेरी काढली होती.* *या आंदोलनाची दखल घेत १८ जून २०२६ रोजी महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिव* *कार्यालयाकडून 'नियमानुसार पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात यावी' असा आदेश (फाईल क्रमांक संन्या/वृजावी/१२१६)* *जारी करण्यात आला आहे. २२ जूनपासून सुरू झालेले हे पावसाळी अधिवेशन २५ जुलै २०२६ पर्यंत चालणार असून, या कालावधीत सरकारने ज्येष्ठ नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी केली जात आहे.*
*डॉ. हंसराज वैद्य यांनी मांडलेल्या १३ प्रमुख मागण्या:-*
*१. ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोमर्यादा ६० वर्षे ग्राह्य धरण्यात यावी.*
*२. '२००७ चा कायदा, २०१० चे नियम आणि २०१३ चे धोरण' यांची राज्यात कडक अंमल बजावणी व्हावी.*
*३. 'लाडके मायबाप योजना' सुरू करून दरमहा ५,००० रुपये पात्र गरीब गरजवंत ज्येष्ठ नागरिकांना मानधन मिळावे.*
*४. ज्येष्ठ नागरिकांना 'राष्ट्रीय संपत्ती' म्हणून घोषित करावे.*
*५. विधान परिषद आणि राज्यसभेवर ज्येष्ठ नागरिकांमधून '१ महिला + १ पुरुष' यांची नियुक्ती व्हावी.*
*६. राज्यामध्ये स्वतंत्र 'ज्येष्ठ नागरिक कल्याण मंत्रालय' स्थापन करण्यात यावे.*
*७. 'महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक आयोग' तातडीने स्थापन करावा.*
*८. ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठांना 'करमुक्त' (Tax Free) करावे.*
*९. सर्व ज्येष्ठ नागरिकांना 'संपूर्ण आरोग्य कवच' लागू करावे.*
*१०. 'आधार कार्ड'च्या आधारे एसटी आणि रेल्वे प्रवास पूर्णपणे मोफत करावा.*
*११. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुसज्ज 'ज्येष्ठ नागरिक भवन' उभारण्यात यावे.*
*१२. सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी 'फक्त आधार कार्ड' हाच एकमेव पुरावा ग्राह्य धरावा.*
*१३. ज्येष्ठ नागरिकांच्या इतर सर्व प्रलंबित मागण्या त्वरित मंजूर कराव्यात.*
*उपोषणाची वेळ येऊ देऊ नका;* *मुख्यमंत्र्यांना साकडे:*
*"८० ते ९० वर्षांच्या वृद्ध माता-पित्यांवर " मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची वेळ राज्य सरकारने येऊ देऊ नये.* *राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत, त्यांच्या एका आदेशाने महाराष्ट्रातील २ कोटी ज्येष्ठांना हक्काचा न्याय मिळू शकतो," असा विश्वास डॉ. हंसराज वैद्य यांनी व्यक्त केला आहे.* *आता आमदार आनंदराव बोंढारकर यांच्या लक्षवेधी सूचनेनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, समाज कल्याण तथा सामाजिक न्याय मंत्री आणि शासन या १३ मागण्यांवर काय सकारात्मक निर्णय घेतात, याकडे राज्यातील संपूर्ण दोन कोटी ज्येष्ठ नागरिकांचे लक्ष लागले आहे.*

COMMENTS