लुटीचा ताळेबंद' : चर्चा आणि चिंतन डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

 दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी, आमचे स्नेही प्रा. नारायण शिंदे यांचा 'लुटीचा ताळेबंद' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. अवघ्या सहा-सात महिन्यां...

 दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी, आमचे स्नेही प्रा. नारायण शिंदे यांचा 'लुटीचा ताळेबंद' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. अवघ्या सहा-सात महिन्यांत ह्या कवितासंग्रहावर २५ परीक्षणे लिहून आली. त्याचे एक पुस्तक करण्याची कल्पना प्रा. शिंदे यांनी माझ्याकडे बोलून दाखवली आणि त्याचे संपादन करण्याची विनंती केली. दोघांच्याही तत्परतेमुळे महिनाभरात ते पुस्तक छापून आले आहे.

'लुटीचा ताळेबंद : चर्चा आणि चिंतन' हे समीक्षेचे पुस्तक नांदेडच्या निर्मल प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. त्याला लिहिलेले हे माझे संपादकीय मनोगत :

लुटीचा ताळेबंद' : चर्चा आणि चिंतन 

डॉ. सुरेश सावंत, नांदेड. 

प्रा. नारायण शिंदे यांच्या कवितेचा परामर्श घेणारे 'लुटीचा ताळेबंद : चर्चा आणि चिंतन' हे पुस्तक आपल्या हाती सोपवताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. 

नारायण शिंदे यांच्या कवितेकडे वळण्यापूर्वी कवीची जडणघडण आणि त्यांच्यावर झालेले शेतीमातीचे संस्कार समजून घेणे उपयोगी ठरणार आहे. 

प्रा. नारायण शिंदे यांचे आजोबा एकनाथराव शिंदे हे एक स्वातंत्र्यसैनिक होते. तसेच ते एक मोठे बागायतदार शेतकरी होते. त्यामुळे शिंदे यांना श्रमाचा आणि समाजशीलतेचा वसा आणि वारसा असा रक्तातूनच मिळालेला आहे. त्यांच्या आजोबांना लोक 'माळकरी' आणि 'मळेकरी' म्हणून ओळखत. यातील माळक-याची श्रद्धा आणि मळेक-याची श्रमनिष्ठा महत्त्वाची आहे. दरवर्षी आषाढी कार्तिकीला पढंरपूरची वारी आणि दररोज घरी वारकरी संप्रदायाचे भजन अशी त्यांना बाळघुटी मिळालेली आहे. आजी - आजोबांच्या प्रेमळ आणि सत्शील सहवासात नारायणाचे बालपण समृद्ध होत गेले. 

दररोज सायंकाळी पोथी वाचणे, आजोबांच्या सोबत भजने म्हणणे, पंढरपूरच्या वारीला जाणे असे सगळे संस्कार त्यांच्यावर झाले. येथेच त्यांच्यावर संवेदनशीलतेचे आणि सर्जनशीलतेचे संस्कार झाले असावेत, असे मला वाटते. नारायण शिंदे यांच्या कवितेत संतसाहित्याचे विपुल संदर्भ का येतात, याचे उत्तर इथे सापडते. 


नारायण शिंदे यांचे आठवीपर्यंतचे शिक्षण रोहिपिंपळगाव ह्या जन्मगावी, जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण नांदेडच्या शारदा भवन हायस्कूलमध्ये आणि महाविद्यालयीन शिक्षण यशवंत काॅलेजमध्ये झाले. काॅलेजमध्ये शिकत असताना ते विद्यार्थी संसदेच्या चळवळीत सहभागी झाले. वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी संसदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. विद्यार्थिदशेतच त्यांनी अण्णासाहेब पाटील यांच्या माथाडी कामगार संघटनेत ( मराठा महासंघ) काम केले. अण्णासाहेब पाटील यांनी मुंबईत आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिरात ते सहभागी झाले होते. त्यावेळी ते पदवीचे शिक्षण घेत होते.

अण्णासाहेब पाटील यांच्या अकाली निधनानंतर त्यांनी शरद जोशींच्या शेतकरी संघटनेत काम केले. चांदवड येथे संपन्न झालेल्या महिला अधिवेशनाला ते आवर्जून उपस्थित होते. असा त्यांचा एकंदर चळवळीतील प्रवास राहिला आहे.

नायगाव येथील जनता हायस्कूल - कनिष्ठ महाविद्यालय - येथे वाणिज्य शाखेचे शिक्षक म्हणून त्यांनी सेवा बजावली. याच काळात त्यांनी आविष्कार साहित्य मंडळाच्या माध्यमातून नायगाव परिसरात साहित्यिक चळवळ रुजवली. त्यानंतर यशवंतराव चव्हाण विचारमंचाची स्थापना करून त्यांनी आपल्या गावी विविध उपक्रम कार्यान्वित केले. 

सुरुवातीला 'सह्यगिरीचे हुंकार' ह्या नावाने यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे संकलन प्रकाशित केले. त्यानंतर 'सपनसुगी' हा ग्रामीण कथासंग्रह, यशवंतराव चव्हाण यांचे चरित्र, 'वेणू' ही चरित्रात्मक कादंबरी, 'रंग एकतेचे व काही एकांकिका' आणि 'लुटीचा ताळेबंद' हा कवितासंग्रह असा त्यांचा लेखनप्रवास आहे.

काही गौरवअंकांचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केले. गेल्या चाळीस वर्षांपासून यशवंतराव चव्हाण विचारमंचाच्या माध्यमातून आपल्या गावी आणि परिसरात स्वखर्चाने अनेक उपक्रम त्यांनी एकहाती राबविले. या सर्व प्रवासातील अनुभवाचे बोल म्हणजेच त्यांचे हे लेखन आहे.

प्रा. नारायण शिंदे हे यशवंतराव चव्हाण विचारमंचाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. यशवंतराव चव्हाण हा त्यांच्या कायम अध्ययनाचा आणि नितांत श्रद्धेचा विषय राहिला आहे. मुळातच शेती आणि शेतकरी हा नारायण शिंदे यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. 'लुटीचा ताळेबंद' हा त्यांचा नवीन कवितासंग्रह नांदेडच्या निर्मल प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. पुस्तकाची निर्मिती अतिशय छान केली आहे. नारायण शिंदे हे वाणिज्य शाखेचे अभ्यासक असल्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या 'लुटीचा ताळेबंद' फारच पोटतिडकीने मांडला आहे. ह्या कवितासंग्रहाची पाठराखण मी केली आहे :

'प्रा. नारायण शिंदे यांची ही कविता म्हणजे राखेतला निखारा आहे. 

कधी अतिवृष्टी होते, तर कधी अनावृष्टी होते. शेतकऱ्यांचे शीतल स्वप्न कधी वाहून जाते, तर कधी करपून जाते. 

जो पिकवतो, तो आपल्या उत्पादनाचा भाव ठरवू शकत नाही, ही इथली शोकांतिका आहे. ह्या कवितेत कवीने शेतकऱ्यांच्या 'लुटीचा ताळेबंद' मांडला आहे. सार्वत्रिक घातपाताचे षड्यंत्र व्यवस्थित समजावून सांगितले आहे. 

सध्या लोकशाहीचा नुसता आभास चालू आहे. आपसांत झुंजी लावण्याचा एककलमी कार्यक्रम चालू आहे. दुर्जन दुराचारी लोकांच्या हाती सत्ता गेल्यावर दुसरे काय होणार?

गोरे गेले आणि काळे आले. काय फरक पडला? 

असे प्रश्न उपस्थित करणारी ही कविता म्हणजे अटळ असे प्रश्नोपनिषद आहे. 

पाणवठ्यावर जमलेला गुरांचा कळप म्हणजे राष्ट्रीय एकात्मता नव्हे, याची जाणीव कवीला आहे. 

नात्यांतील प्रदूषणामुळे हा कवी अस्वस्थ आहे. माणसं गावाकडची आणि शहरातली, हा कवीच्या चिंतनाचा विषय आहे. कवीने तुकोबांची काठी आपल्या हाती घेतली आहे. 

ह्या कवितेला उपहास आणि उपरोधाची तीव्र धार आहे. त्यामुळे ही कविता थेट काळजाला हात घालते. 

कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमाविषयी कवीला नितांत आदर आहे. म्हणूनच तो लिहितो :

'आज कळलय मला, मी बरबाद झालो असतो

जर का कृष्णा-कोयनेच्या संगमावर विसावलो नसतो'. 

सशस्त्र क्रांतीचा एल्गार करणारी ही कविता तरुण पिढीला वेळीच सावध होण्याचा इशारा देते आहे'.

(पाठपृष्ठ : 'लुटीचा ताळेबंद') 

लुटीचा ताळेबंद' ह्या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी नांदेड येथे मोठ्या थाटात संपन्न झाला. त्यावेळी झालेली सगळ्यांचीच भाषणे अतिशय अभ्यासपूर्ण होती. पुस्तक प्रकाशनानंतर, मागील सहा महिन्यांत 'लुटीचा ताळेबंद' ह्या कवितासंग्रहावर, विविध माध्यमांत, विविध मान्यवरांचे २५ लेख प्रकाशित झाले. वाचनसंस्कृती आकुंचन पावत चाललेल्या कालखंडात, एखाद्या कवितासंग्रहावर २५ मान्यवरांनी स्वयंस्फूर्तीने लेख लिहिणे, ही अतिशय सुखद आणि आनंदाची गोष्ट आहे. ते सगळे लेख एकत्र करून त्यांचे एक छान पुस्तक करावे, अशी कल्पना समोर आली. त्या कल्पनेचे मूर्त रूप म्हणजे 'लुटीचा ताळेबंद : चर्चा आणि चिंतन' हे पुस्तक होय. एखाद्या कवितासंग्रहाच्या प्रकाशनानंतर, त्याच वर्षात त्या संग्रहाविषयी गंभीरपणे चर्चा आणि चिंतन करणारे पुस्तक प्रकाशित व्हावे, ही मोठीच उपलब्धी आहे! ते भाग्य 'लुटीचा ताळेबंद' ह्या कवितासंग्रहाला लाभले, त्याबद्दल मी कवी नारायण शिंदे यांचे मनापासून, अगदी मनापासून अभिनंदन करतो. 

वाटोळं' ह्या कवितेत नारायण शिंदे यांनी लिहिले आहे :

'मातीतच राबायचं 

मातीमोल व्हायचं

कवडीमोल किमतीचं

जगणं हे जगायचं

पुढं पुढं सरकायला 

येळ कुठं तुझ्याकडं

येडकंडाळाचं जीणं

काय तुझी परवड! 

राजकारणाच्या पायी

झालं गावाचं वाटोळं 

याचा पाय त्याचा पाय

ओढाओढीचाच खेळ'. (लु. ता. पृष्ठ क्र. ५५)

ह्या कवितेत कवीने शेतकऱ्यांच्या मातीमोल आणि कवडीमोल जगण्याचे हुबेहुब वर्णन केले आहे. आपल्या देशात जितके राजकीय पक्ष आहेत, तितके पक्ष प्रत्येक कुटुंबात झाले आहेत. जितकी मते तितकेच मतभेद. राजकारणाच्या पायी गावाचं आणि घराचं वाटोळं झालं, हे कवीचं निरीक्षण आहे. ह्या कवितेत कवीने, सात्त्विक संतापाने एक शिवी योजिली आहे. 'येडकंडाळाचं जीणं' ह्या दोन शब्दांत कवीने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. सभोवतालच्या नकारात्मक परिस्थितीविषयीची ही निषेधात्मक प्रतिक्रिया आहे. ग्रामीण माणसाला स्वहिताची जाणीव नसल्याबद्दलची ही तीव्रतम खंत आहे. संत तुकारामांपासून नामदेव ढसाळांपर्यंत अनेक श्रेष्ठतम कवींच्या कवितेत अशाच सात्त्विक संतापाने युक्त अशा शिव्या आलेल्या आहेत. म्हणून काही ते शब्द अशिष्ट ठरलेले नाहीत. संत तुकारामांसारख्या सत्पुरुषांच्या शिवीलाही ओवीचे मोल प्राप्त झाले होते. संत-सुधारकांच्या कवितेतून जी समाजसुधारणेची तळमळ व्यक्त झाली आहे, तीच तळमळ ह्या कवितेतही दिसून येते. 

प्रा. नारायण शिंदे यांची कविता ही शेतकऱ्यांच्या वेदनेशी घामाचे आणि रक्ताचे नाते सांगणारी कविता आहे. ह्या कवितेला उदास होत चाललेली गावपांढरी आणि उजाड होत चाललेला शेतशिवार यांचा जन्मजात लळा आहे. ह्या कवितेला समष्टीच्या दु:खाचा दंश झालेला आहे. त्यामुळे ही कविता समकालीन समाजाचे चरित्र आणि चारित्र्य यथातथ्य चितारते. ह्या कवितेत कवीने कुठेही वैयक्तिक सुखदुःखांची सूची केली नाही, तर मानवी दु:खाला उद्गार दिला आहे. हे माझे ह्या कवितेविषयीचे आकलन आहे. 

वाणिज्य विषयाच्या अध्यापकाला आर्थिक ताळेबंद मांडण्याची सवय असते. नारायण शिंदे हे वाणिज्य शाखेचे असल्यामुळे त्यांनी आपल्या कवितेतून स्वजीवनाचा, शेतकऱ्यांच्या लुटीचा आणि एकूणच समाजजीवनाचा अक्षरशः ताळेबंद मांडला आहे. यात अजिबात मोघमपणा नाही. 'हा सूर्य आणि हा जयद्रथ' असे ह्या ताळेबंदाचे अतिशय वस्तुनिष्ठ स्वरूप आहे. 

ह्या पुस्तकात समीक्षकांनी केलेल्या समीक्षेवर भाष्य करण्याचा, संपादक म्हणून मला अधिकार नाही, याची मला यथार्थ जाणीव आहे. ते धार्ष्ट्य मी अजिबात करणार नाही. चर्चा आणि चिंतनपर हे सर्व लेख वाचल्यावर एकूण ग्रामीण मराठी कविता, आणि त्या पार्श्वभूमीवर प्रा. नारायण शिंदे यांची कविता समजून घ्यायला मदतच होईल. हे लेख वाचून, मराठी कवितेच्या अभ्यासकांना थोडी जरी मदत झाली, तरी ह्या पुस्तकाचे सार्थक झाले, असे मी समजतो. ह्या पुस्तकाच्या निर्मितीतील माझे योगदान फारच अल्प आहे. 

'फोडिले भांडार। धन्याचा तो माल। 

मी तो हमाल। भारवाही।' 

इतकीच माझी प्रांजळ भूमिका आणि भावना आहे. 

यातील लेख संपादनासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार! 

आमचे स्नेही प्रा. नारायण शिंदे यांना शुभेच्छा देऊन माझ्या संपादकीय मनोगताला विराम देतो. 

डॉ. सुरेश सावंत,

नांदेड.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group