नांदेडमध्ये रंगला ‘नयन बाराहाते स्मृती सन्मान’ सोहळा
‘नयन बाराहाते स्मृती सन्मान’ पुरस्काराने ज्येष्ठ चित्रकार आणि कवी भ. मा. परसवाळे यांचा गौरव
नांदेड :
चित्रकार नयन बाराहाते हा रंग आणि रेषांचा चित्रकथी, आनंदयात्री होता. त्याने आपल्या रंगरेषा, कल्पकता आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून पुस्तकांना केवळ मुखपृष्ठ दिले नाही, तर प्रत्येक कलाकृतीला एक स्वतंत्र असे कलात्मक व्यक्तिमत्त्व बहाल केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांनी केले. ‘नयन बाराहाते स्मृती सन्मान’ सोहळ्यात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. डॉ. सावंत पुढे म्हणाले की, नयन बाराहाते यांची कला ही केवळ चित्रांपुरती मर्यादित नव्हती; तर ती साहित्य, सामाजिक संवेदना आणि मानवी मूल्यांना स्पर्श करणारी होती. त्यांच्या कलाकृतींमधून विचार, भावना आणि सौंदर्य यांचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळत असे. त्यामुळे त्यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील. प्रख्यात चित्रकार, पुस्तक रचनाकार आणि कलंदर कलावंत नयन बाराहाते यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्मरण सोहळ्यात यंदाच्या ‘नयन बाराहाते स्मृती सन्मान’ पुरस्काराने ज्येष्ठ चित्रकार आणि कवी भ. मा. परसवाळे यांचा समारंभपूर्वक गौरव करण्यात आला.
हा सोहळा सृजन कम्युनिकेशन्स आणि नयन अक्षर प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात वक्त्यांनी कला, साहित्य आणि समाज यांच्यातील परस्परसंबंधांवर सखोल चिंतन व्यक्त केले. यावेळी डॉ. अशोक बेलखोडे, डॉ. प्र. दि. जोशी पाटोदेकर आणि डॉ. राजेंद्र गोणारकर यांची विचारपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नयन बाराहाते यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. नयन बाराहाते यांच्या कन्या सायली बाराहाते यांनी प्रास्ताविकातून वडिलांच्या कलासाधनेचा आणि त्यांच्या स्मृती जपण्यामागील भावनेचा वेध घेतला. त्यानंतर डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी मानपत्राचे वाचन केले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर भ. मा. परसवाळे यांनी कला, साहित्य आणि समाज यांच्यातील परस्पर संबंधांविषयी आपले मनोगत व्यक्त करत सर्जनशीलतेची सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली. शिवाजी आंबुलगेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
नयन बाराहाते हे केवळ चित्रकार नव्हते, तर पुस्तकांना आपल्या रंगरेषांतून जिवंत करणारे एक संवेदनशील कलावंत होते. मुखपृष्ठ, आतील मांडणी आणि पुस्तकाची कलात्मक सजावट यामध्ये त्यांनी स्वतंत्र शैली निर्माण केली होती. त्यांच्या स्मरणार्थ गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रातील एका उत्कृष्ट चित्रकाराचा ‘नयन बाराहाते स्मृती सन्मान’ देऊन गौरव करण्याची परंपरा जपली जात आहे.
कार्यक्रमाला नांदेडसह विविध भागांतील साहित्यिक, चित्रकार, पत्रकार, कलाप्रेमी आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नयन बाराहाते यांच्या कलास्मृतींना उजाळा देणारा आणि नव्या पिढीतील कलाकारांना प्रेरणा देणारा हा सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
—————————
फोटो ओळ: ‘नयन बाराहाते स्मृती सन्मान’ पुरस्काराने ज्येष्ठ चित्रकार तथा कवी भ. मा. परसवाळे यांचा गौरव करताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत, डॉ. अशोक बेलखोडे, डॉ. प्र. दि. जोशी पाटोदेकर, ज्येष्ठ चित्रकार तथा कवी भ. मा. परसवाळे, डॉ. राजेंद्र गोणारकर, सायली बाराहाते.
——————-

COMMENTS