जो विचार मनाला गुदगुल्या करीत असतो; कदाचित मनात येण्यास अप्रत्यक्षपणे तुम्हास परवानगीही मागत असतो. त्या विचाराला तुम्ही मनात येण्याची परवानगी दिली किंवा प्रतिसाद दिला तर तो विचार मनात घर केल्याशिवाय राहत नाही. या विचारातील हळुवारपणा आणि परवानगीवाचक सभ्य वागणूक ही संवेदना ठरते. संवेदना सुखाची हळूवार जाणीव करुन देते तसेच दुःखही हळूवारपणे गोंदवित असते. संवेदनेतील सुखद विचार, बागडणाऱ्या फूलपाखरांसारखे असतात. तर संवेदनेतील दुःख, रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर आपणा समोरुन आपली रेल्वे निघून जावी असे असतं. हूरहूर लावणारं, रुखरुख लावणारं... एखादा अनओळखी नंबरचा मिसकॉल यावा असचं ! संवेदनांच्या जाणिवा सुखद आणि दुःखद असतात... काहीशा हळव्याही असतात. अबोल मुक स्वगतासारख्या असतात. बरेच दिवस आपली आवडती व्यक्ती विविध कारणांनी संपर्कात राहू शकत नाही (उदा. नोकरी, उद्योगधंदा, संसारिक अडचणी) ... पण गॅलरीतील कुंडीतील लिलीस अचानकपणे खुप दिवसांनी फूल उमलावे तशी ती व्यक्ती अचानक भेटते तेव्हा... या संवेदनांचे भावविश्व अवर्णणीय असतं... भावनांना फक्त उत्स्फूर्त उद्गार, शब्द देतात... 'अरेरे'... 'व्वाव', 'काय सरप्राईझ'...'आज सुर्य कोणत्या दिशेला उगवला...?' 'ओळखलं का मला?' इत्यादी इत्यादी...!
संवेदना आणि वेदनांच्या विश्वाचा व्याप खूप मोठा आहे. "दूरवर खोल समुद्रातील जहाजांच्या शिडांच्या ढोलकाठीवर एक चिमुकला पक्षी येवून बसतो. त्या पक्षाकडे जहाजेवरील खलाशी मोठ्या उत्सूकतेने पाहतो. हा पक्षी जर किनाऱ्याच्या शोधात इथून उडाला तर किनाऱ्यावर पोहचेल का?" या विचाराने त्या खलाश्याचे मन व्यथित होते.
चिमूकला पक्षी जहाजाच्या शिडाच्या ढोलकाठीवर येवून बसणे ही सुखद संवेदना आहे पण... त्या पक्षाच्या परतीच्या प्रवासाबद्दल विचार करीत असतांना, या सुखद संवेदनेचे वेदनेत रुपांतर होते. माणसांच्या जंगलात संवेदना शोधताना अनेकदा हाती वेदनाच लागतात. आयुष्याच्या रगाड्यात असहाय्य मानवी मनांवर, विचारांवर अती स्वार्थाची जळमटं चढतात आणि बथ्थड होत जाणाऱ्या संवेदना, जळमटात अडकून पडतात... ही एक मोठी बोचणारी वेदनाच आहे. प्रत्येकाच्या सुख-दुःखाच्या संकल्पना सुप्त आणि काहीश्या गुढ असतात. त्यामुळे संवेदना आणि वेदनांचं गूढ हे साहित्यिक व विचारवंतांना तिर्थक्षेत्र झालेलं आहे. संवेदना आणि वेदनांच्या तिर्थक्षेत्राच्या वाऱ्या सातत्याने साहित्यिक व विचारवंत करीत असतात.
कर्तव्य, संवेदना आणि मानवजात यांना मोठ्या कौशल्याने राज्यकर्त्यांना सांभाळावे लागते. कर्तव्य, संवेदना आणि मानव एका पारंपारिक कोड्यातील गोष्टी प्रमाणे अनुक्रमे वाघ, गवताची पेंढी आणि शेळी प्रमाणे आहेत. आयुष्याचा पैलतीर मानवजातीस यशस्वीपणे गाठावयाचा आहे, नावेतून एका वेळी नाविकासोबत कर्तव्य (वाघ), संवेदना (गवताची पेंढी) आणि मानव (शेळी) या पैकी एकजणच प्रवास करु शकत असतो.
अशावेळी त्यांचा कुटुंबप्रमुख (राज्यकर्ता) प्रथम मानवास (शेळीला) पैल तीरावर सोडतो, दुसऱ्या फेरीत तो कर्तव्याला (वाघाला) सोडून, परतीच्या प्रवासात मानवास (शेळीला) सोबत घेवून पूर्वीच्या किनाऱ्यावर येतो. या किनाऱ्यावरील संवेदनेस (गवताच्या पेंढीस) सोबत नेऊन कर्तव्यासोबत (वाघासोबत) सोडतो. म्हणजे पैलतीरावर कर्तव्य (वाघ) आणि संवेदना (गवताची पेंढी) राहतात. पहिल्या किनाऱ्यावर उरलेल्या शेळीस (मानवास) तो कुटुंबप्रमुख (राज्यकर्ता) अलगदपणे पैलतीरावर आणतो.
कर्तव्य, संवेदना आणि मानवजात परस्परांना पुरक नसणाऱ्या विरोधाभासी जीवननिष्ठांची सांगड घालणारा कुटूंबप्रमुख (राज्यकर्ता) विविध कौशल्यांनी परिपूर्ण आणि बुध्दिमान होता, म्हणूनचं... वाघ, शेळी, गवताची पेंढी या विविध परस्पर विरोधी विचारकृती अनुक्रमे कर्तव्य, मानव आणि संवेदना पैलतीरावर सुखरुप पोहचल्या... याचे श्रेय अर्थातच त्या कुटुंबप्रमुखाला (राज्यकर्त्याला) जाते.
स्वातंत्र मिळून आपल्या देशला78 पेक्षा जास्त वर्षे लोटलेली आहेत. विविध भाषा, विविध जाती, धर्म आणि वंशाचे लोक आपल्या देशात राहतात, नांदतात. स्वातंत्र्यप्राप्तीला ५० वर्षे झाली आणि आर्थिक विकास, मुलभूत सोयी, समता, बंधूभाव, सहिष्णुता, राष्ट्रीय एकात्मता या सर्व गोष्टींपासून देशाचे नागरिक दूर जातानाचे चित्र दिवसेंदिवस गडद होत आहे. दहशतवाद, अज्ञान, दारिद्र, दुष्काळ आणि भ्रष्टाचार हेच लोकशाहीचे महत्त्वाचे स्तंभ झालेले आहेत; असे लोक बोलतात. ही सहन न होणारी वेदना आहे. आपली लोकशाही आणि स्वतंत्र देश म्हणजे लग्नाचा मंडप आहे, अन् विविध जातीचे, धर्मांचे, वंशाचे लोक या लोकशाहीच्या लगीनघाईत आपआपली सोय लावण्यात मग्न आहेत असे वाटते.. या मंडपात आपल्या सकट आपआपल्या सग्या-सोयऱ्यांची सोय लावण्यासाठी विविध राजकीय पक्ष, अराजकीय संघटना, धार्मिक संघटना... बळकट करण्यात लोकं मग्न झालेले आहेत. "सरकारी पैशाचे खाजगीकरण करणे म्हणजे देशाची अर्थव्यवस्था बळकट होते असे राजकीय नेत्यांना वाटत असावे." असे ही बोलल्या जाते. देशात फक्त मताचे राजकारण वाढीस लागले आणि राजकारणाचा धंदा झालेला आहे.
देशाच्या दुर्दैवाने, समाजाच्या दुर्दैवाने, बुध्दिवाद्यांच्या दुर्दैवाने अनावश्यक संवेदना निवडूंगासारख्या वाढीस लागल्या आणि सार्वजनिक ठिकाणी भाषणातून बोलताना, वृत्तपत्र, मासिक, नियतकालीकातून विचार व्यक्त करताना बुध्दिवादी विचारवंत दचकू लागले आहेत. देशाचे प्रतिगामीत्व गंडेदोरे, लिंबू-मिर्ची, काळे बिब्बे, उलट्या काळ्या बाहुल्यांचे दाराच्या चौकटीवरील प्रस्थ वाढलेले आहे. भोंदू-साधूंचे प्रस्थ वाढीस लागले आहे.
देशाचा विकास आणि जागतिकीकरणाचा विचार हवा तेवढ्या वेगाने वाढीस लागलेला नाही. मुलभूत सुविधांसाठी देशात नेहमी रडारड चालूच असते. देवावर आणि दैवांवर आयुष्याचा भार टाकून देशातील नागरीक कर्तव्याच्या तावडीतून स्वतःला सोडवू पाहत आहे. या देशाला पुन्हा आर्यभट्ट, व्यास, कौटिल्य, भास, भरतमूनी, भवभूती, दंडी, पाणिनी, भास्कराचार्य या सारखे विचारवंत व अभ्यासू संशोधकांचे संशोधन लाभेल काय? आपल्या देशालाही आईन्स्टाइन, न्यूटन, सॉक्रेटीस, डार्विन, टॉलस्टाय लाभतील काय? ही वेदना मनाला उद्वीग्न करीत असते. उपलब्ध बुध्दिमत्तेचा आणि बुध्दिवाद्यांचा उपयोग या देशासाठी, मानवजातीकरीता झालाच पाहिजे. हा राज्यकर्त्यांचा आग्रह असला पाहिजे, राज्यकर्ते हे लोकाभिमुख हवेत ते सत्ताभिमुख झालेले आहेत.
व्यक्ती मरतात पण त्यांचे चांगले विचार मरत नाहीत. त्यांच्या विचारांचा दिपस्तंभ-नंदादिप या देशाला, समाजाला सतत मार्ग दाखवित राहतो असे इतिहास सांगत आलेला आहे.
धर्मो रक्षिती रक्षीताः ! पण आजचं चित्र काय आहे? समाज, माणसं, धर्मासाठी आणि धर्म माणसांसाठी ! या देशात एव्हढच शिल्लक राहिलेले आहे.
"या प्रगतशील देशात प्रत्येकजण आरक्षणासाठी मागासवर्गीय होवू पाहत आहे." ही या देशाची सर्वात मोठी शोकांतिका आहे. सहिष्णू लोकशाहीची घटना प्रणाली स्विकारुनही देशातील अविचार संपविणाऱ्या वैचारिकांच्या, बुध्दिवाद्यांच्या भारतातच नव्हे तर जगातील विविध देशात हत्या झालेल्या आहेत. ही न संपणारी वेदना आहे.
जीवनात सुख-दुःखाच्या, भोगविलासाच्या हातघाईत... सुख संवेदनांचे अस्तित्व वाऱ्याप्रमाणे अवतीभवती असूनही दुःखाचा टक्का मात्र वाढत आहे... आयुष्याचा प्रवाहात अनेक आवडती माणसं आणि चांगले विचार हरवतात ही वेदना, मनाला क्षणोक्षणी निष्प्राण करीत असते तरीही जॉन ख्रिस्तोफरचे उद्गार मनाला उभारी देत असतात ...
No.... no life is not sad only some moments in it are sad...
वेदनांना सहन करीत असतांना संवेदनांची फूलपाखरं अवतीभवती रुंजी घालीत असतात... निरागस, सुंदर, निकोप मनासाठी... विचारांसाठी, मानवांसाठी! समस्त मानवजातीसाठी ! आपल्या देशासाठीही ! आणि कदाचित जगासाठीही ! सुखासाठी सुखाचेच बियाणे पेरावे लागते आपल्या भारत देशाला भौगोलिक स्वतंत्र मिळाले आहे आर्थिक स्वातंत्र्याचे काय?
ताज्य घडामोडी बद्दल सांगायचे तर अमीरेकेने जगाचे जुऱ्यासिक पार्क केले आहे.
बौद्धिकसंपदेने व संशोधनाने प्रगतशील राष्ट्र जगावार आर्थिक सुबत्ते करिता राज्य करीत आहेत.आपल्या देशात सुमारे 50 % गावात आणि शहरात पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ आहे.आपल्या देशाला समृद्ध सागरी किनारपट्टी आहे.सर्व समुद्र किनारपट्टी वरती समुद्राचे पाणी मानवासाठी पिण्यायोग्य करण्याचे प्रोजेक्ट सुरु केले पाहिजे
©️ विवेक द. जोशी
छत्रपती संभाजी नगर
मो. ९८५०४३३१७८

COMMENTS