मुंबई/नांदेड़: राज्यभरातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी जनगणना २०२६ च्या पार्श्वभूमीवर राज्य ...
मुंबई/नांदेड़: राज्यभरातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी जनगणना २०२६ च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सन २०२६ च्या सर्वसाधारण बदल्यांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.
बदल्या का थांबवल्या?
केंद्र सरकारच्या गृहसचिवांच्या निर्देशानुसार आणि जनगणना अधिनियम १९४८ अंतर्गत जनगणनेचे काम अत्यंत महत्त्वाचे आणि वैधानिक स्वरूपाचे आहे. हे काम विनाव्यत्यय पार पाडण्यासाठी जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती आवश्यक आहे. त्यामुळेच बदल्यांच्या प्रक्रियेमुळे कामात अडथळा येऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
या कर्मचाऱ्यांवर होणार परिणाम:शासनाच्या आदेशानुसार खालील संवर्गातील बदल्या आता होणार नाहीत:
गट-क मधील सर्व कर्मचारी.
गट-ड मधील सर्व कर्मचारी.
जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षक: जनगणनेच्या कामात शिक्षकांची भूमिका मोठी असल्याने त्यांच्याही बदल्या प्रक्रियेवर आता बंदी असेल.
तात्काळ अंमलबजावणीचे आदेश
उपसचिव (महाराष्ट्र शासन) वैशाली डिगे यांनी यासंदर्भातील अधिकृत पत्र प्रसिद्ध केले आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (CEO) या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि त्याचा अहवाल शासनास सादर करावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
थोडक्यात: जे कर्मचारी यावर्षी बदलीसाठी इच्छुक होते, त्यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जात आहे. आता या कर्मचाऱ्यांना जनगणनेचे काम पूर्ण होईपर्यंत आपल्या सध्याच्याच ठिकाणी कार्यरत राहावे लागणार आहे.

COMMENTS