नांदेड ( जि.प्र.)
खडकपुरा - वाघी रोडवर मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकावर समाजकंटकांनी हल्ला केला. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नांदेड वाघाळा महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनचे संस्थापक अध्यक्ष कॉ.गणेश शिंगे यांच्या नेतृत्वाखाली निषेध सभा घेण्यात आली. यावेळी हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना अटक करावी. तसेच त्यांची शहरातून धिंड काढावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मध्यवर्ती शासकीय, निमशासकीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण नरमलवार यांनी उपस्थित राहून घटनेचा निषेध नोंदवला आहे.
4 मे रोजी खडकपुरा - वाघी रोडवरील नांदेड मनपाच्या वतीने अतिक्रमण काढण्यासाठी मनपाचे अतिक्रमण हटाव पथक गेले होते. अतिक्रमण हटवत असताना तेथील समाजकंटक व गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी जेसीबी चालक मालू कांबळे यास बेदम मारहाण करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रसन्नजित औताडे हे कांबळे यास वाचविण्यासाठी गेले असता त्यालाही मारहाण करण्यात आली. मालू कांबळेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेच्या निषेधार्थ नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनचे संस्थापक व अध्यक्ष कॉ.गणेश शिंगे यांच्या नेतृत्वाखाली मनपाच्या प्रवेशद्वारासमोर निषेध सभा पार पडली. यावेळी कॉ.गणेश शिंगे यांनी मालू कांबळे, प्रसन्नजित औताडे यांना झालेल्या मारहाणीचा जाहीर निषेध केला. संबंधित आरोपींना अटक करुन त्यांची शहरातून धिंड काढावी. जेणे करून यापुढे समाजकंटक नांदेड मनपाच्या कामगारांवर हात उचलणार नाहीत.
यावेळी सफाई कामगार महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS