ग्रंथ हेच गुरु- महापौर कविता मुळे नांदेड ग्रंथोत्सवाचे उत्साहात उद्धघाटन
नांदेड दि.१४ मार्च :-काय वाचावे या संभ्रमात न राहता माणसाने हाती पडेल ते वाचावे. वाचनामुळे इतिहासाचा मागोवा घेता येतो तसेच भविष्याचा कानोसा घेण्याची दृष्टी मिळते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांनी केले.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन तसेच ग्रंथालय संचालनालय, मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या वतीने आयोजित नांदेड ग्रंथोत्सव उद्घाटन प्रसंगी ते अध्यक्षीय समारोपात बोलत होते.या वेळी नांदेड महानगरपालिकेच्या महापौर सौ. कविता मुळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. व्यासपीठावर ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी, अनिल बाविस्कर, संभाजीराव धुळगंडे, साहित्यिक नारायण शिंदे, प्रताप सूर्यवंशी, निर्मलकुमार सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. सावंत पुढे म्हणाले की, आपण मोठमोठी घरे बांधतो आणि सर्व सोयी उपलब्ध करून देतो; मात्र घरात पुस्तकांसाठी स्वतंत्र जागा ठेवत नाही. घरात पुस्तकांचा कोपरा असणे आवश्यक आहे. पुस्तकांविना घर म्हणजे श्वासोच्छ्वास थांबलेल्या शरीरासारखे आहे. वाचन ही आपली संस्कृती असून ती जपली तर वाचन संस्कृती अधिक वृद्धिंगत होईल.
महापौर सौ.कविता मुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आपण आई-वडील व शिक्षकांना गुरू मानतो. गुरू जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात; परंतु जिथे गुरू मार्गदर्शन करू शकत नाहीत, तिथे ग्रंथ मार्ग दाखवतात. म्हणूनच ग्रंथ हेच खरे गुरू आहेत. आजच्या बाल व तरुण पिढीने मोबाईलपासून दूर राहून वाचनाची सवय लावावी, असे आवाहन त्यांनी केले.
ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर म्हणाले की, वाचन संस्कृती लोप पावत नाही, उलट विविध कार्यक्रमांतील पुस्तक स्टॉलवरील विक्री पाहता वाचनाची आवड वाढत असल्याचे दिसून येते. यापुढे ग्रंथोत्सव तालुका स्तरावर आयोजित करण्याचा विचार असून वाचकांचा गौरव करण्यावर भर दिला जाईल.
पुरपरिस्थितीमुळे राज्यातील ५६ ग्रंथालयांना नुकसान झाले असून त्यापैकी २४ ग्रंथालये नांदेड जिल्ह्यातील आहेत. या ग्रंथालयांना पुस्तके, कपाटे तसेच काही मोठ्या ग्रंथालयांना संगणक उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सकाळी महात्मा फुले पुतळा येथून ग्रंथदिंडी काढण्यात आली.
या ग्रंथोत्सवात शासकीय स्टॉल सहित विविध १५ स्टॉल लावले आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अरविंद सूर्यवंशी यांनी केले तर आभार राज्य ग्रंथालय निरीक्षक प्रताप सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमास ग्रंथालय कर्मचारी, वाचक व ग्रंथप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS