नांदेड: महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या गेल्या १५ वर्षांच्या अविरत संघर्षाला अखेर फळ मिळताना दिसत आहे. वृत्तपत्र विक्रेत्या...
नांदेड: महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या गेल्या १५ वर्षांच्या अविरत संघर्षाला अखेर फळ मिळताना दिसत आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र 'कल्याणकारी मंडळा'ची घोषणा झाल्यानंतर आता त्याच्या अंमलबजावणीच्या हालचाली सुरू झाल्या असून, या लढ्यातील महत्त्वाचे शिलेदार आणि संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार यांनी या दीर्घ प्रवासाचा थरार शब्दबद्ध केला आहे.आंदोलन, मोर्चे आणि नांदेडचा तो ऐतिहासिक प्रसंग
वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी संघटनेने राज्यव्यापी मोर्चे, आंदोलने आणि दोन वेळा धरणे आंदोलने केली. या संघर्षाची तीव्रता सांगताना बालाजी पवार यांनी एका घटनेचा विशेष उल्लेख केला. तत्कालीन कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर नांदेडच्या नव्या मोंढ्यात आले असता, बालाजी पवार यांनी गणेश वडगावकर आणि संदीप कटकमवार यांच्यासह त्यांची गाडी अडवून आपल्या मागण्यांचे गांभीर्य प्रशासनाला पटवून दिले होते.
महत्त्वाच्या बैठका आणि समितीची स्थापना
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत कल्याणकारी मंडळाच्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली.
७ मार्च २०१९: शासनाने वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी योजना अभ्यास समिती स्थापन केली.अभ्यास समितीत
दत्ता घाडगे , राजेंद्र टिकार, संजय पावसे, हरिश्चंद्र पवार, रविंद्र कुलकर्णी, विकास सुर्यवंशी होते
१७ डिसेंबर २०१९: कामगार उपायुक्त सुनीता म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सरकारला अहवाल सादर केला. या प्रक्रियेत बालाजी पवार आणि सुनील पाटणकर यांनी सदस्य म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.सरकारचा ऐतिहासिक निर्णय
दीर्घ पाठपुराव्यानंतर १० ऑक्टोबर २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृत्तपत्र विक्रेता आणि पत्रकार यांच्यासाठी दोन स्वतंत्र कल्याणकारी महामंडळांची घोषणा केली. नुकतेच विधीमंडळात आमदार श्रीकांत भारतीय यांनी या विषयावर प्रश्न उपस्थित केला, ज्याला सांस्कृतिक कार्य मंत्री एड. आशिष शेलार यांनी सविस्तर उत्तर दिले. यामुळे या मंडळाची प्रत्यक्ष अंमलबजावणी लवकरच होईल, अशी आशा आता पल्लवीत झाली आहे.
सहकाऱ्यांच्या योगदानाची आठवण
या यशाबद्दल बोलताना बालाजी पवार यांनी दिवंगत कॉम्रेड अनंतराव नागापूरकर यांची आठवण काढली. तसेच पत्रकार वसंत मुंडे, येदू जोशी, अनिल सावंत आणि संघटनेचे राज्य अध्यक्ष हरी पवार, कार्याध्यक्ष सुनील पाटणकर यांच्या सहकार्याचा आवर्जून उल्लेख केला.
आज वृत्तपत्र विक्रेता मोठ्या आर्थिक संघर्षातून जात आहे. १५ वर्षांपूर्वी सुरू झालेला हा लढा आता अंतिम टप्प्यात आहे. लवकरच शिष्टमंडळासह मंत्री महोदयांची भेट घेऊन या महामंडळाची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत." — बालाजी पवार (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना)वृत्तपत्र विक्रेत्यांच्या या विजयाचे संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यात स्वागत होत असून, लवकरच सरकारी योजनांचा लाभ विक्रेत्यांना मिळण्यास सुरुवात होणार आहे.

COMMENTS