नांदेड:( दि.२ मार्च २०२६)
माणसाच्या जीवनात शब्दाचे महत्व अनन्यसाधारण आहे. शब्द शोधला तर अर्थ आहे, शब्द वाढला तर कलह आहे. शब्द हे जादूगार असतात; त्यांनी माणसं जोडली जातात. यशवंत वार्षिक युवक महोत्सवात ९०५ विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग लक्षणीय आहे. आमचे मित्र महेश मांजरेकर, लक्ष्मीकांत बेर्डे हे स्नेहसंमेलनामधून घडले. तरुणाई स्वतःचा शोध युवक महोत्सवातून घेतात. तरुणांना ए.आय.ला सामोरे जावे लागेल. उर्वरित एकविसावे शतक ए.आय.वर चालणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री श्री.डी.पी.सावंत यांनी केले.
यशवंत वार्षिक युवक महोत्सव बक्षीस वितरण व समारोप सोहळ्याच्या अध्यक्षीय समारोपात दि.२८ फेब्रुवारी रोजी ते बोलत होते. या प्रसंगी कलामंचावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद व संस्थेचे कार्यकारिणी सदस्य श्री.नरेंद्र चव्हाण, छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध कवी व वक्ते निलेश चव्हाण, माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे, श्री. घोलप, उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रा. कबीर रबडे, समन्वयक डॉ.नीरज पांडे, संदीप पाटील यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी निलेश चव्हाण यांनी कविता, विनोद, प्रबोधनमय भाष्य करून उपस्थितांची मने जिंकली. खुमासदार शैलीत ते म्हणाले की, इ. स. २००० नंतर जन्मलेली पिढी प्रगत आणि अपडेटेड आहे. तंत्रज्ञान, मोबाईल एक शिडी आहे; त्याचे एक टोक संस्कृतीकडे तर दुसरे टोक विकृतीकडे जाते. सोशल मीडियाचा विधायक उपयोग तरुणांनी करावा. तरुणांना प्रश्न पडली पाहिजेत. माणसाने कितीही प्रगती केली तरी; एक चांगला माणूस बनणे, ही सगळ्यात मोठी उपलब्धता आहे. त्यांनी वेगवेगळ्या कवितांच्या सहाय्याने संपूर्ण महोत्सव आनंदमय आणि उत्साहमय केला. आरसा, दिवाळी, राधा रुक्मिणी संवाद या काव्यरचनांनी सभागृह मंत्रमुग्ध झाले. शेवटी कर्तव्याची व्याख्या सांगताना ते म्हणाले की, कोणीही पाहत नसताना आपण आपले कार्य जबाबदारीने करणे म्हणजे कर्तव्य.
श्री.नरेंद्र चव्हाण यांनी आपला पहाडी आवाज आणि लक्ष्यभेद संवादातून तरुणाईला कर्तव्याची जाणीव करून देत वास्तवाच्या जगात आणले. ते म्हणाले की, खरा शिक्षक हा विद्यार्थ्यांमधील गुणांचा विकास करण्यासाठी धडपडत असतो. आधुनिक काळ हा ए.आय.चा काळ असून यापुढे प्रत्येक क्षेत्रात ए.आय.ला प्राधान्य दिले जाणार आहे. त्याद्वारेच रोजगार प्राप्त होणार आहे. त्यांनी तत्त्वज्ञानात्मक कविता सादर करून श्रोत्यांना आत्मपरीक्षणास बाध्य केले. 'तू अपनी खुबिया ढुंढ, कमीया ढुंढणेके लिए लोग है ना, तू खुदकी पहचान बना, भिड मे चलने के लिए लोग है ना.'
प्रारंभी प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांनी, राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी यशवंत वार्षिक युवक महोत्सवाचे आयोजन केले जाते. विद्यापीठ आविष्कार स्पर्धेमध्ये विद्यार्थी यशस्वी होण्याच्या उद्देशाने पेपर, पोस्टर, मॉडेल इ. स्पर्धांचे आयोजन केले गेले. विकसित भारत २०४७: युवकांची भूमिका या महत्त्वपूर्ण विषयावर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे; हा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी उदासीनता आणि नैराश्यातून बाहेर आले पाहिजे आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज असावे; तरच उज्वल भवितव्य अस्तित्वात येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. संजय जगताप, प्रमुख अतिथींचा परिचय डॉ.विश्वाधर देशमुख आणि शेवटी आभार डॉ.निरज पांडे यांनी मानले.
विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण सूत्रसंचालन प्रा.भारती सुवर्णकार, प्रा. संगीता चाटी, प्रा. जी.एस. हुंडे, प्रा.प्रियांका सिसोदिया, डॉ. कैलास इंगोले, डॉ. मनोज पैंजणे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, डॉ.एम.ए. बशीर, डॉ.मीरा फड, ग्रंथपाल डॉ. कैलास वडजे, डॉ.संदीप पाईकराव, डॉ. शिवराज बोकडे, डॉ.अजय गव्हाणे, डॉ. शिवराज शिरसाठ, डॉ.शिवदास शिंदे, डॉ. पद्माराणी राव, पर्यवेक्षिका प्रा. वंदना बदने, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, पवन पांचाळ, गोदावरी कानशुक्ले, आयुष सोनकांबळे, अंजली मद्रेवार यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS