*प्रजासत्ताक दिन हा केवळ राष्ट्रध्वज फडकविण्याचा सोहळा नसून, संविधानातील मूल्ये प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचा पवित्र दिवस आहे. हाच संदेश प्रत्यक्षात साकार करत धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या हस्ते लहुजी साळवे निराधार-निराश्रित बालकाश्रम, धनगरवाडी रोड, वाडी पाटी, नांदेड येथे ध्वजारोहण करण्यात आले.तिरंगा अभिमानाने आकाशात फडकत असतानाच, त्यांनी अनाथाश्रमातील प्रत्येक मुलाच्या खांद्यावर प्रेमाची व सुरक्षिततेची ऊब ठेवत ब्लँकेटचे वाटप केले. थंडीने कुडकुडणाऱ्या हातात ब्लँकेट देताना त्यांच्या डोळ्यांत मायेचा ओलावा होता, तर मुलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले. त्या क्षणी प्रजासत्ताक दिनाचा खरा अर्थ उपस्थितांना अनुभवता आला.याच दिवशी लहुजी साळवे बालकाश्रम व मुक्ताई नर्सिंग कॉलेज, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. बालाजी थोटवे (प्रांताध्यक्ष – ल.स.क.म.) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमास भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट, प्रासिल कदम, डॉ. सूर्यकांत वाघमारे, दलित मित्र व लेबर फेडरेशनचे संचालक रामराव सूर्यवंशी, बालाजी जांबकर, संस्थेच्या अध्यक्षा सौ. रेखा लालबाजी घाटे, बिसेफचे नेते एच. पी. कांबळे, शंकर भंडारे, वाय. जी. वाघमारे, संस्थेचे संचालक लालबाजी घाटे , बालगृहाचे अधीक्षक साहेबराव गव्हाणकर, सौ. गोणेकर, सौ. जाधव मॅडम, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य निखिल घाटे, नेहा उत्तरवार, तेजस्विनी राठोड, गणेश वडजे सर, मनीषा चोंडीकर, सौ. मीना मॅडम, सौ. शितल मॅडम तसेच संस्थेचे कर्मचारी, पालक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्र्पिता महात्मा गांधी व भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी आपल्या खास विनोदी शैलीत समाजातील विविध प्रसंग उलगडत उपस्थितांना मनसोक्त हसविले. मात्र त्या हास्यामागे त्यांनी अत्यंत गंभीर संदेश दिला.“ही मुले दयेची नाहीत, तर संधीची अपेक्षा करतात. योग्य शिक्षण, संस्कार आणि विश्वास मिळाला तर हीच मुले उद्याच्या भारताची मजबूत पायाभरणी करतील,” असे ते भावनिक शब्दांत म्हणाले.त्यांनी संविधानाने दिलेल्या समानतेच्या, स्वातंत्र्याच्या व बंधुत्वाच्या मूल्यांचा उल्लेख करत सांगितले की, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण व माणुसकी पोहोचली, तरच प्रजासत्ताक दिन साजरा झाल्याचे समाधान मिळते.
कार्यक्रमाच्या सांस्कृतिक सत्रात विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीते, लोकनृत्ये व समूह नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. टाळ्यांचा कडकडाट, हास्याचे फुलणारे चेहरे आणि डोळ्यांत साठलेली स्वप्ने – अशा वातावरणात स्नेहसंमेलन जणू आनंदोत्सवात रूपांतरित झाले.संस्थेच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले. या उपक्रमामुळे समाजात सेवाभाव, सामाजिक बांधिलकी व राष्ट्रप्रेमाचा संदेश अधिक ठळकपणे पोहोचला.

COMMENTS