गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रणजितसिंघ कामठेकर यांचे निधन

 

नांदेड/प्रतिनिधी-येथील खालसा कॉलनीतील रहिवाशी, सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव तथा अर्धापूर तालुक्यातील कामठा (बु.) चे उपसरपंच रणजितसिंघ खंड्डासिंघ कामठेकर (वय 60) यांचे खाजगी रुग्णालयात उपचार चालू असतांना सोमवारी दि.13 रोजी दुपारी दीडच्या सुमारास निधन झाले.
गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी त्यांना काहीसा ताप आल्यामुळे त्यांनी घरीच विश्रांती घेतली. त्यांना कालच्या शनिवारी दि.11 रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घरी असतांनाच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे ते जागेवरच कोसळले होते. त्यांना ताबडतोब एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
त्यावेळेस डॉक्टरांनी 72 तास निगरानीखाली ठेवण्याचे ठरविले. हे 72 तास त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचे होते. कालच्या रविवारी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सचखंड गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी, मित जत्थेदार ज्योतिंदरसिंघ बाबाजी, आ.मोहनअण्णा हंबर्डे यांच्यासह अनेक मान्यंवरांनी, शिख व सर्व समाजातील अनेक मान्यंवरांनी दवाखान्यामध्ये भेट दिली होती. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न चालू होते. या दरम्यान रणजितसिंघ कामठेकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याकरीता संबंधित सर्व लोकांनी आणि समाज बांधवांनी प्रार्थंना करावी, असे आवाहन कामठेकर परिवाराने केले होते.
दरम्यान सोमवारी दि.13 रोजी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी देखील दवाखान्यात जावून कामठेकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. वेळ पडल्यास कामठेकर यांना एअर ऍम्बुलन्सने तात्काळ मुंबईला हलविण्याची तयारी देखील सुरु करण्यात आली होती. परंतु दुर्देवाने सोमवारी दुपारी त्यांना हृदयविकाराचे दोन झटके आले. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. ही बातमी समजल्यानंतर नांदेडातील व कामठा व परिसरातील त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने दवाखान्याकडे धाव घेतली.
त्यांच्या निधनाने कामठा आणि परिसरात तसेच खालसा कॉलनीमध्ये शोककळा पसरली आहे. रणजितसिंघ कामठेकर हे कामठा येथील बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. तसेच त्यांना जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस हे पद नुकतेच मिळाले होते. सुमारे चाळीस वर्षांच्या सामाजिक व राजकीय कारकिर्दीनंतर त्यांना प्रथमच पक्षाचे मोठे पद देण्यात आले होते.
त्यांचे पार्थिव त्यांच्या मुळगावी म्हणजे कामठा येथे दुपारी अंत्यदर्शनासाठी नेण्यात आले. त्याठिकाणी हजारो लोकांनी, गावकर्‍यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर त्यांचे पार्थिव सायंकाळी खालसा कॉलनी येथील निवासस्थानी आणण्यात येईल. त्यांची अंत्ययात्रा मंगळवार दि.14 रोजी सकाळी 9 वाजता निघून 10 वाजता नगिनाघाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, एक बहिण, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
टिप्पण्या