देगलूर प्रतिनिधी : जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशाने रात्रगस्त घालणाऱ्या मरखेल पोलिसांच्या पथकाने हाणेगाव (ता. देगलूर) येथे मोठी कारवाई केली आहे. सराफा दुकान फोडून पळून जाणाऱ्या चोरट्यांचा थरारक पाठलाग करून पोलिसांनी एका आरोपीला मुद्देमालासह रंगेहाथ जेरबंद केले आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक ३० ते ३१ जानेवारी २०२६ च्या दरम्यान रात्री मरखेल पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार हद्दीत गस्त घालत होते. पहाटे ३:०० ते ३:२५ च्या सुमारास हे पथक हाणेगाव येथील मुख्य सराफा मार्केटमध्ये पोहोचले. त्यावेळी अमित आचारे यांच्या 'आचारे ज्वेलर्स' या दुकानाचे शटर अर्धवट उघडे दिसले आणि एक व्यक्ती बाहेर संशयास्पद स्थितीत उभी होती. पोलिसांची गाडी पाहताच त्या व्यक्तीने आतल्या साथीदारांना इशारा केला.
पोलिसांची चाहूल लागताच दुकानातून दोन चोरटे सोन्या-चांदीचे दागिने एका पांढऱ्या पिशवीत भरून पळाले. अंधार आणि झाडाझुडपांचा फायदा घेत ते पळत असताना, पोलीस उपनिरीक्षक विलास पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता त्यांचा पाठलाग केला. या झटापटीत सेवकसिंग रघुसिंग तिलपते (रा. उमरी, जि. नांदेड) याला पकडण्यात पोलिसांना यश आले, तर त्याचे इतर दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
जप्त केलेला मुद्देमाल:
पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून खालील ऐवज हस्तगत केला आहे:
• चांदीचे दागिने (वजन २ किलो ६०० ग्रॅम) - किंमत ७,००,०००/-
• रोख रक्कम - ३०,७९०/-
• सोन्याचे १२ मणी - किंमत १५,०००/-
• एकूण जप्त मुद्देमाल: ७,४५,७९०/- रुपये
पोलीस पथकाचा गौरव:
ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रवी हुंडेकर, पोलीस उपनिरीक्षक विलास पवार, पो.कॉ. रफिक सय्यद, नारायण यंगाले आणि चालक यादव सोनकांबळे यांनी केली.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक नांदेड यांनी सहभागी पाच जणांच्या पथकाला प्रत्येकी १०,००० रुपये, असे एकूण ५०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर करून त्यांचे अभिनंदन केले आहे. अटक आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास पवार करत आहेत.

COMMENTS