नांदेड: जिल्हा परिषद शाळा उस्माननगर (ता. कंधार) येथे पगाराचे विवरणपत्र (Salary Statement) देण्यासाठी १२०० रुपयांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापिकेसह दोन सहशिक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे नांदेडच्या शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
श्रीमती विद्या बळवंत वांगे (वय ५५, मुख्याध्यापिका), रामेश्वर शामराव पांडागळे (वय ५६, सहशिक्षक) आणि गौतम जयवंतराव सोनकांबळे (वय ५६, सहशिक्षक) अशी लाच प्रकरणात सापडलेल्या आरोपींची नावे आहेत.
नेमकी घटना काय?
या प्रकरणातील ५६ वर्षीय तक्रारदार आणि त्यांची पत्नी हे जिल्हा परिषद शाळा, उस्माननगर येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. सप्टेंबर २०२५ मध्ये त्यांची बदली झाली होती. दरम्यान, इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी त्यांना २०२५ च्या पगाराच्या विवरणपत्राची आवश्यकता होती. यासाठी तक्रारदाराने मुख्याध्यापिका विद्या वांगे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी दोघांच्या विवरणपत्रासाठी प्रत्येकी ६०० रुपये प्रमाणे एकूण १२०० रुपयांच्या लाचेची मागणी केली.
सापळा आणि कारवाई
तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. २९ जानेवारी रोजी सापळा रचण्यात आला. तक्रारदार शाळेत गेले असता, मुख्याध्यापिका वांगे यांनी त्यांना सहशिक्षक सोनकांबळे यांच्याकडून विवरणपत्र घेण्यास सांगितले. यावेळी सोनकांबळे यांनीही लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले.
त्यानंतर मुख्याध्यापिका वांगे यांनी लाचेची रक्कम सहशिक्षक रामेश्वर पांडागळे यांच्याकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराकडून १२०० रुपये स्वीकारताना पांडागळे यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या गुन्ह्यात तिन्ही शिक्षकांचा सहभाग स्पष्ट झाल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अंगझडतीत सापडली रोकड
आरोपींच्या अंगझडतीत रोख रक्कमेसह मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. आरोपी रामेश्वर पांडागळे यांच्याकडे १२,६०० रुपये तर गौतम सोनकांबळे यांच्याकडे १,७५० रुपये रोख रक्कम आढळून आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक (एसीबी) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक रसूल तांबोळी, आणि तपास अधिकारी पोलीस निरीक्षक करीम खान पठाण यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. याप्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

COMMENTS