नांदेड :पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठानतर्फे वर्ष 2022 चा मानाचा “नांदेड भूषण पुरस्कार” नांदेड जिल्ह्याच्या औद्योगिक, सामाजिक व आर्थिक विकासात मोलाचे योगदान देणारे, सूरज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन रमेश पारसेवार यांना जाहीर करण्यात आला आहे.शनिवार, दिनांक २१ फेब्रुवारी रोजी कै. चंद्रभागा केरबा गंजेवार नगरी, नवा मोंढा मैदान, नांदेड येथे होणाऱ्या “नरेंद्र–देवेंद्र महोत्सव” या दोन दिवसीय काव्य मैफिलीत हजारो रसिकांच्या साक्षीने मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती स्वागताध्यक्ष शिवप्रसाद राठी, तसेच संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली.अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा “नांदेड भूषण पुरस्कार” रोख रक्कम रुपये ११,००० ,स्मृतिचिन्ह, मानपत्र व महावस्त्र या स्वरूपाचा आहे.स्वतःच्या कष्टावर उभ्या केलेल्या उद्योगसमूहाच्या माध्यमातून रमेश पारसेवार यांनी केवळ व्यवसायिक प्रगती साधली नाही, तर शेतकरी, मध्यमवर्गीय नागरिक, युवक आणि ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. उद्योगासोबत समाजहिताची बांधिलकी जपणाऱ्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. सूरज ग्रुपची स्थापना ही गुणवत्ता, विश्वास आणि स्वावलंबन या मूल्यांवर आधारित असून, या समूहाने यशस्वी शंभर वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करत असताना रमेश पारसेवार यांनी आधुनिक तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण दृष्टीकोन आणि सक्षम व्यवस्थापन कौशल्याच्या बळावर उद्योगाचा भक्कम विस्तार केला.
नांदेड येथे सिप्टा कोटेड स्टील्स या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर वितरणाचे मजबूत जाळे उभे केले. काही अडचणींमुळे बंद पडलेला प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करून अवघ्या दहा वर्षांत शंभर टक्के क्षमतेने उत्पादन सुरू केले. एका महिन्यात पंधरा हजार मेट्रिक टन उत्पादनाचा विक्रम करत हायएस्ट प्रॉडक्शन पुरस्कारही मिळविला. शेतकरी वर्गाच्या गरजा लक्षात घेऊन सुप्रीम गोल्ड इरिगेशन लिमिटेड या कंपनीची स्थापना करण्यात आली. आयएसआय आणि आयएसओ प्रमाणित पीव्हीसी, यूपीव्हीसी, एचडीपीई पाईप्स, फिटिंग्ज व वॉटर स्टोरेज टँक्सचे उत्पादन सुरू करून जलसिंचन क्षेत्रात विश्वासार्ह ब्रँड निर्माण करण्यात आला. ही उत्पादने आज विविध शासकीय जलपुरवठा योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहेत.आज महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक आदी राज्यांमध्ये सूरज ग्रुपचे डीलर व डिस्ट्रीब्युटर नेटवर्क कार्यरत असून हजारो लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. उद्योगासोबतच शेतकरी मेळावे, जलसाक्षरता, “जल ही जीवन आहे” जनजागृती उपक्रम, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक कार्यातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
कर्तव्यनिष्ठा, पारदर्शकता, चिकाटी आणि सामाजिक संवेदनशीलता या गुणांमुळे रमेश पारसेवार यांची कारकीर्द नांदेडपुरती मर्यादित न राहता संपूर्ण मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात प्रेरणादायी ठरली आहे

COMMENTS