नांदेड. (विशेष प्रतिनिधी) दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी तरूणांनी खंजरचा धाक दाखवून एका ३८ वर्षीय पत्रकाराच्या गळ्यामधील १ लाख ५६ हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन बळजबरीने हिसकावून नेली. ही घटना १७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता नवीन नांदेडातील असर्जन परिसरातील भगतसिंग चौक ते हस्सापूर ब्रिजकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील मिराईनगर पाटीजवळ घडली.
नांदेडच्या असर्जन परिसरातील शंकर नगरीतील रहिवासी तथा पत्रकार तुकाराम अनंतराव सावंत हे नेहमीप्रमाणेच १७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्यादरम्यान, मॉर्निग वॉकसाठी भगतसिंग चौक ते हस्सापूर पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याने जात होते. पत्रकार तुकाराम सावंत हे हस्सापुर पुलाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील मिराईनगर पाटीजवळ आले. दरम्यान, त्याठिकाणी, २५ ते ३० वर्षे वयोगटातील दोन अनोळखी इसम थांबले होते. त्यापैकी एकजण लघुशंका करीत होता, तर दुसरा चालू स्थितीतील दुचाकीवर बसून होता. तेवढ्यात पत्रकार सावंत हे चालत-चालत त्यांच्याजवळ पोहोचले. त्याचवेळी, तेथे लघुशंका करीत असलेल्या इसमाने त्याच्याजवळील खंजर काढून आपल्या गळ्याला लावला व आपल्या गळ्यातील तब्बल ३२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन खंजरचा धाक दाखवून बळजबरीनेच तोडून घेतली. त्याचक्षणी, आपण त्याला विरोध केला असता, तेथे दुचाकीवर बसून असलेल्या इसमाने त्याच्या साथीदाराला खंजर खुपस, असे म्हणाला. त्याचक्षणी, आपण घाबरून काहीच हालचाल केली नाही, त्यामुळे 'ते' दोघेहीजण नंबर नसलेल्या दुचाकीवरून वेगात हस्सापूर रस्त्यावरील पुलाच्या दिशेने निघून गेले, असा स्पष्ट उल्लेख पत्रकार तुकाराम सावंत यांच्या तक्रारीत नमूद असल्याची माहिती पोलीस ठाणे अंमलदार प्रविण केंद्रे व मदतनीस अंमलदार जुबेर चाऊस यांनी दिली आहे.
महत्वपूर्ण बाब म्हणजे, या जबरी चोरी प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्याकरिता नांदेड ग्रामीण ठाण्यातील गुन्हे शोध पथकासह स्थानिक गुन्हे शाखेतील विविध शोध पथके सर्वत्र रवाना झाले असल्याचे अत्यंत विश्वसनीय वृत्त आहे. याशिवाय, याप्रकरणामधील आरोपी लवकरच पोलिसांच्या हाती लागतील, असा विश्वास नांदेड ग्रामीण पोलीस आणि नांदेड येथील स्थानिक गुन्हे शाखेतील विश्वसनीय सूत्रांकडून वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान, असर्जन परिसरातील भगतसिंग चौक ते हस्सापूर पुलाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सकाळी फिरायला गेलेल्या पत्रकाराच्या गळ्याला चोरट्यांनी धारदार खंजर लावून गळ्यातील सोन्याची चैन बळजबरीने हिसकावून नेली. या घटनेमुळे फिरायला जाणाऱ्या बहुसंख्य महिला, पुरूष व जेष्ठ नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी नवीन नांदेड परिसरात सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या महिला व पुरूषांना खंजरचा धाक दाखवून लुटणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या तरच सकाळी- सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांच्या मनातील भीतीचे वातावरण दूर होईल. अन्यथा चोरट्यांचे मनोबल वाढेल आणि अशा जबरी चोऱ्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत जाईल, त्यासाठी पोलिसांनी रात्रीच्या पेट्रोलिंगसोबतच सकाळी- सकाळी सर्वत्र पेट्रोलिंग करून जबरी चोऱ्यांचे तथा खंजरचा धाक दाखवून होत असलेल्या लुटालूटीचे प्रमाण कमी करणे अत्यावश्यक आहे.
याप्रकरणी तुकाराम अनंतराव सावंत (रा. शंकरनगर, असर्जन, नांदेड) यांनी दिलेल्या तक्रारीआधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी अनोळखी दोन इसमांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे व त्यांचे सहकारी अधिकारी कर्मचारी हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

COMMENTS